विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने म्हणजेच IRDA (Insurance Regulatory and Development Authority) ने एक महत्वाचा निर्णय घेतलाय. इरडा येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला नवीन सुविधा देऊ करणार आहे. सामान्य नागरिकांना परवडणारी विमा सुविधा, 'बिमा सुगम' लवकरच जाहीर होणार आहे. येत्या ऑगस्टपर्यंत ही सुविधा सुरू करण्याचा IRDA चा विचार होता, मात्र ही सुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी काही सुधारणा केल्या जात असल्याचे IRDA चे म्हणणे आहे.
ऑनलाइन विमा बाजार सुरु होणार
सध्या वेगवगेळ्या खासगी पोर्टलद्वारे विमा पॉलिसींची जाहिरात केली जाते आणि त्याबदल्यात ते नफा देखील कमावतात. अनेकदा नफा कमावण्याच्या नादात सामान्य ग्राहकांना विम्याबद्दल सविस्तर माहिती दिली जात नाही आणि काही प्रकरणात ग्राहकांची फसवणुक देखील झाल्याचे समोर आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर IRDA ने ‘बिमा सुगम’ नावाने हे पोर्टल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मप्रमाणे एक ऑनलाइन विमा बाजार म्हणून हे पोर्टल काम करेल. याद्वारे विमा कंपन्यांना त्यांची उत्पादने सादर करण्याची आणि त्याची विक्री करण्याची संधी मिळेल. याद्वारे, ग्राहक एकाच ठिकाणी त्यांना हव्या त्या विमा योजनांची खरेदी किंवा नूतनीकरण करू शकतील. एवढेच नाही तर ग्राहक त्यांच्या विम्याचे त्यांचे दावे देखील या पोर्टलवरून सादर करू शकतील आणि इतर संबंधित सेवांचा लाभ घेऊ शकतील.
विम्याचे दावे लवकर निकालात काढणार
विम्यासंबंधी दावे विमा धारकांना त्यांच्या संबंधित कंपनीकडे सादर करावे लागतात. परंतु अनेकवेळा हे दावे निकाली काढण्यास विमा कंपन्या उशीर करतात, त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यासंबंधी अडचणी, तक्रारी नंतर ग्राहक IRDA कडे घेऊन येतात, तेव्हा त्यावर कारवाई करण्यास आणखी उशीर लागतो. ज्या खासगी पोर्टलद्वारे ग्राहकांनी विमा खरेदी केलेला असतो, ते देखील अशावेळी ग्राहकांना मदत करत नाहीत. परंतु ‘विमा सुविधा’च्या माध्यमातून आता थेट विमा नियामक आणि विकास प्राधिकरणच या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवणार आहे. ज्याचा थेट फायदा सामान्य नागरिकांनाच होणार आहे.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) चे अध्यक्ष देबाशिष पांडा यांनी गेल्या महिन्यात मुंबईतील एका कार्यक्रमात ‘बिमा सुगम’ या प्रकल्पाबाबत माहिती दिली होती. तसेच 1 ऑगस्टपासून ही सुविधा ही सुविधा सुरु होणार अशी माहिती त्यांनी दिली होती. मात्र आता हे पोर्टल सुरु करण्यास विलंब होणार असल्याचे खुद्द त्यांनीच जाहीर केले आहे.