इन्शुरन्स खरेदी करण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की, पॉलिसीधारकाचा दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर त्याच्या निर्भय असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक सुरक्षितता देणे. पण ही आर्थिक सुरक्षितता देताना पॉलिसीधारकाने इन्शुरन्स कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो पाहणे गरजेचे आहे. कारण या क्लेम रेशोवर आधारित पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला कितपत आर्थिक मदत मिळू शकते. याचा अंदाज लावला जावू शकतो. नुकताच भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) प्रसिद्ध केलेल्या 2021-22च्या वार्षिक अहवालात इन्शुरन्स कंपन्यांच्या क्लेम सेटलमेंटची आकडेवारी दिली आहे.
भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारतातील इन्शुरन्स कंपन्यांनी 2021-22 मध्ये वैयक्तिक डेथ क्लेम सेटलमेंटमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. म्हणजे 2021-22 मध्ये दाखल करण्यात आलेल्या दाव्यांपैकी सेटलमेंट झालेल्या दाव्यांची टक्केवारी किंचित वाढली आहे. 2020-21 मध्ये दावे सेटलमेंट झालेल्याची टक्केवारी 98.39 टक्के होती. ती 2021-22 मध्ये 98.64 टक्के झाली.
क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे काय? What is CSR?
क्लेम सेटलमेंट रेशो हा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी इन्शुरन्स कंपनीची विश्वासार्हता आणि ग्राहकांना किती प्रमाणात क्लेम मिळतो, याची तपासणी करण्याचा एका महत्त्वाचे निकष आहे. क्लेम सेटलमेंट रेशो हा कंपनीने दाखल केलेल्या दाव्यांच्या एकूण संख्येपैकी निकाली काढलेल्या दाव्यांची संख्या दर्शवत असतो. ज्या कंपन्यांचे रेशो अधिक त्या कंपनीची क्लेम सेटलमेंटची क्षमता अधिक आहे, असे मानले जाते. त्यामुळे नवीन पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी किंवा सुरू असलेली पॉलिसी रिन्यूव्ह करण्यापूर्वी इन्शुरन्स कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो तपासणे आवश्यक आहे.
Max Life Insurance कंपनीने सर्वाधिक म्हणजे 99.34 टक्के दावे निकाली काढले आहेत. त्यानंतर Exide Life Insurance, Bharti Axa Life Insurance या कंपन्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर 14 हून अधिक कंपन्यांचे दावे 98 टक्के निकाली आहेत.
सर्व खाजगी लाईफ इन्शुरन्स कंपन्यांनी मिळून 2.37 लाख मृत्यूचे दावे निकाली काढण्यात आले. तर एकट्या एलआयसीने 13.49 डेथ क्लेमचे दावे निकाली काढले आहेत. खाजगी कंपन्यांनी 2021-22 मध्ये एकूण 17,410 कोटी रुपये तर एलआयसीने 28,408 कोटी रुपये पॉलिसीधारकांच्या कुटुंबियांना दिले. एलआयसीचा क्लेम सेटलमेंट रेशो 98.74 टक्के आहे. एलआयसीकडे 13,67,104 दावे दाखल झाले होते. त्यातील 13,49,865 दावे निकाली काढण्यात आले.