केंद्र सरकारच्या ताज्या अहवालानुसार देशात जवळपास 364 इन्फ्रो प्रोजेक्ट्स काही ना काही कारणास्तव रखडले आहेत. प्रकल्प रेंगाळल्याने या प्रकल्पांचा खर्च प्रचंड वाढला असून तो 4.52 लाख कोटी इतका झाला आहे. या प्रकल्पांमध्ये प्रत्येकी किमान 150 कोटींची गुंतवणूक झाली आहे.
सांख्यिकी विभागाने रखडलेल्या प्रकल्पांचा ताजा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार 1476 प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यापैकी 364 प्रकल्पांची डेडलाईन चुकली असून 756 प्रकल्पांची रखडपट्टी झाली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने त्यांचा उभारणी खर्च 21.69% ने वाढला आहे. कोव्हिड-19 मधील कठोर टाळेबंदी आणि निर्बंधांचा देखील या प्रकल्पांला फटका बसल्याचे अहवालात म्हटले आहे.
सर्वच्या सर्व 1476 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 2084124.75 कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र शेकडो प्रकल्प काही ना काही कारणास्तव रखडले आहेत. ज्यामुळे आता हे सर्व प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 2536179.03 कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे. यात मूळ खर्चाच्या तुलनेत 21.69% वाढ होणार आहे. अर्थात 452054.48 कोटी रुपये वाढीव खर्च करावा लागणार आहे.
नोव्हेंबर 2022 अखेर या प्रकल्पांवर 1367245.45 कोटी खर्च करण्यात आले आहेत. यात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे 456 प्रोजक्ट्स अद्याप सुरुच झालेले नाहीत. त्यांच्या कामाला कधी सुरवात होणार याबाबत देखील स्पष्टता नाही. रखडलेल्या 756 प्रकल्पांपैकी 144 प्रकल्प हे 1 ते 12 महिन्यांपर्यंत रखडले आहेत. 117 प्रकल्प 13 ते 24 महिन्यांपर्यंत लांबणीवर पडले आहेत.363 प्रोजक्ट्सना तब्बल 25 ते 60 महिने उशीर झाला असून 132 प्रोजेक्ट्स 61 महिन्यांपहून अधिक काळ अपूर्णावस्थेत आहेत. पाच वर्ष प्रोजेक्ट पूर्ण न झाल्याने त्याचा खर्च कित्येक पटीने वाढला आहे.
इन्फ्रा प्रोजेक्ट्स रखडण्याची कारणे (Reason's behind Delay)
- पायाभूत सेवा प्रकल्प (इन्फ्रा प्रोजेक्ट्स) रखडण्याची अनेक कारणे आहेत.
- मंजूर झालेल्या प्रकल्पांचे जमीन अधिग्रहण वेळेत न होणे हे प्रकल्प रखडण्यामागचे सर्वात मोठे कारण आहे.
- पर्यावरण आणि वन विभागाची मंजुरी वेळेत मिळत नसल्याने प्रकल्पाच्या कामांना फटका बसतो.
- बऱ्याचदा ज्या ठिकाणी काम सुरु असते अशा ठिकाणी पायाभूत सुविधांची वानवा असते.
- प्रोजक्ट फायनान्सिंगमध्ये होणारा उशीर, अर्थात योग्य वेळी निधी न मिळाल्याने प्रोजेक्टचे काम थांबते.
- काम सुरु असताना मशीनरी उशीरा पोहोचणे, रि-टेंडर काढणे अशा कारणांमुळे बऱ्याचदा मोठे प्रकल्प रखडतात.
- कोव्हिड-19 मधील कठोर टाळेबंदी आणि निर्बंधांचा देखील या प्रकल्पांला फटका बसला होता.