सतत वाढणाऱ्या महागाईमुळे देशात मोबाईल (Mobile), फ्रिज (Fridge) आणि टीव्ही (TV) या वस्तूंची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे या वस्तू बनविणाऱ्या कंपन्यांनी त्यांचे प्रोडक्शन कमी केले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वाढणाऱ्या महागाईमुळे या वस्तुंच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या वस्तुंच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. या परिस्थितीचा विचार करता उत्पादक कंपन्यांनी त्यांचे उत्पादन 10 टक्क्यांनी कमी केले आहे. देशातील जवळपास सर्व मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या उत्पादन योजनांमध्ये बदल केले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या त्यांच्या इन्व्हेंटरी लेव्हलनुसार त्यांच्या भविष्यातील योजना ठरवतात.
उत्पादन कमी का केले?
अनेक टॉप ब्रँड्ससाठी मोबाईल बनवणाऱ्या जैना ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप जैन म्हणाले की, या वर्षी मोबाईल फोनच्या विक्रीत 30 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे कंपन्यांनी त्यांचे उत्पादन 10 टक्क्यांनी कमी केले आहे. जैना ग्रुप स्वतः कार्बन ब्रँडच्या नावाखाली मोबाईल फोनची विक्री करतात. इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणाऱ्या दोन कंत्राटी कंपन्यांच्या एमडींनी असेही सांगितले की त्यांचे मोबाईल फोन ग्राहकही उत्पादनात कपात करत आहेत. लाइटिंग उत्पादने बनवणाऱ्या कंपन्याही तेच करत आहेत. एका एमडीने सांगितले की ब्रँड्स सावध झाले आहेत आणि उत्पादनात 8 ते 15 टक्क्यांनी कपात करत आहेत. आईडीसी इंडियाच्या (International Data Corporation IDC) म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी शिपमेंटमध्ये पाच टक्क्यांनी घट झाली आहे. बाजारावर वर्चस्व असलेल्या 10 ते 30 हजार रूपये किमतीच्याा मोबाईलवर जास्त परिणाम झाला आहे. .
किमती का वाढल्या
IDC इंडियाचे संशोधन संचालक नवकेंद्र सिंग यांनी सांगितले की, कमी मागणीमुळे ब्रँड त्यांच्या उत्पादन योजनांचा आढावा घेत आहेत. पुरवठ्याची स्थिती चांगली होत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या सहामाहीत मागणीत लक्षणीय वाढ न झाल्यास देशातील स्मार्टफोन बाजाराला यंदा विविध आव्हानांना सामोरे जावे लागेल. अंदाजानुसार, गेल्या वर्षभरात देशात मोबाईल फोन, टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनच्या किमती 9 ते 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. इनपुट आणि लॉजिस्टिक खर्चात झपाट्याने वाढ झाल्याने कंपन्यांना किमती वाढवण्यास भाग पाडले आहे.
चीनमधील लॉकडाऊनचा परिणाम
व्हर्लपूल इंडियाचे अध्यक्ष अरविंद उप्पल यांनी कंपनीच्या नुकत्याच केलेल्या कमाईच्या निवेदनात म्हटले आहे की, महागाईमुळे उद्योगावर परिणाम झाला आहे. कोडॅक, थॉमसन आणि ब्लाउपंक्ट ब्रँड्सची निर्मिती करणाऱ्या एसएसपीएलचे मुख्य कार्यकारी अवनीत सिंग मारवाह म्हणाले की, मागणी नसल्यामुळे तसेच चीनमध्ये लॉकडाऊनमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. पुढील एक-दोन महिने ही स्थिती कायम राहू शकते. यानंतर सणाची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपन्या उत्पादन वाढवू शकतात.
महागाईमुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढत आहेत. याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होत आहे.