शेअर बाजाराच्या (Bombay Stock Exchange) माध्यमातून लाखो-करोडोंची कमाई करणाऱ्या काही ट्रेडर्समध्ये राधाकिशन दमानी (Radhakishan Damani), राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala), रामदेव अग्रवाल (Raamdeo Agrawal), रमेश दमानी (Ramesh Damani) तसंच विजय केडिया (Vijay Kedia) अशा काही ट्रेडर्सचा समावेश आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसनं याचा आढावा घेतलाय. पाहूया याच उद्योजकांविषयी...
Table of contents [Show]
राधाकिशन दमानी
‘मिस्टर व्हाइट अँड व्हाइट’ म्हणूनही राधाकिशन दमानी यांना ओळखलं जातं. भारतातले सर्वात श्रीमंत स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर म्हणून त्यांची ओळख आहे. याशिवाय डी-मार्टचे मालक आहेत. लो प्रोफाइल आणि साध्या पोशाखासाठी दमानी ओळखले जातात. बॉल बेअरिंग ट्रेडर म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी शेअर बाजारात एन्ट्री केली. तेव्हापासून युनायटेड ब्रेवरीज, 3M इंडिया, अस्त्र मायक्रोवेव्ह उत्पादनं आणि बीएफ युटिलिटीज सारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी यशस्वी गुंतवणूक केली.
दिवंगत राकेश झुनझुनवाला
"द बिग बुल" म्हणून ओळखले जाणारे एक प्रसिद्ध आणि यशस्वी भारतीय शेअर बाजारातले गुंतवणूकदार म्हणून राकेश झुनझुनवाला प्रसिद्ध होते. इंट्राडे ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून त्यांनी आपलं भविष्य घडवलं. सुरुवातीला फक्त 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून त्यांनी सुरुवात केली. 2021पर्यंत त्यांची संपत्ती 41,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त होती. त्यांच्या लोकप्रिय होल्डिंग्समध्ये टायटन कंपनी, स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स, मेट्रो ब्रँड्स आणि टाटा मोटर्स यांचा समावेश होता. 14 ऑगस्ट 2022ला राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं.
रामदेव अग्रवाल
मोतीलाल ओसवाल समुहाचे सह-संस्थापक रामदेव अग्रवाल हेदेखील भारतीय शेअर बाजारातले एक प्रमुख मानले जातात. ग्रोथ, क्वालिटी, दीर्घायुष्य त्याचबरोबर सौद्याचं मूल्य यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणुकीवर त्यांचा विश्वास आहे. बेंजामिन ग्रॅहम यांचं 'द इंटेलिजेंट इन्व्हेस्टर' आणि पीटर लिंच यांचं 'वन अप ऑन वॉल स्ट्रीट' ही त्यांची आवडती पुस्तकं आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओमधल्या लोकप्रिय होल्डिंग्समध्ये मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिस, महाराष्ट्र स्कूटर्स आणि भारत वायर रोप्स यांचा समावेश आहे.
रमेश दमानी
भारतातील प्रमुख शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांपैकी आणखी एक नाव म्हणजे रमेश दमानी. 1990च्या दशकात सेन्सेक्स जेव्हा 600 अंकांवर होता तेव्हा त्यांनी आपण श्रीमंत व्हायचं, असा निश्चय केला. कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमधून त्यांनी एमबीए केलं. त्यांनी इन्फोसिसची भविष्यातली क्षमता ओळखली. 1993मध्ये जेव्हा ते सार्वजनिक झालं तेव्हा त्यांनी त्यात 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली. गोल्डियम इंटरनॅशनल, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स आणि पनामा पेट्रोकेम यांचा त्यांच्या लोकप्रिय होल्डिंगमध्ये समावेश आहे.
विजय केडिया
शेअर बाजारात यश मिळवणाऱ्यांच्या यादीतलं एक नाव विजय केडिया होय. ब्रोकरेज कुटुंबातच त्यांचा जन्म झाला. शेअर बाजारात यश मिळवतांना त्यांनी अनेक आव्हानांना तोंड दिलं. वयाच्या 14व्या वर्षापासूनच त्यांना स्टॉक मार्केटमध्ये स्वारस्य निर्माण झालं. वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाच्या स्टॉक ब्रोकरेज फर्ममध्ये ते सहभागी झाले. त्यावेळी त्यांचं वय 19 होतं. सुरुवातीला अडचणी आल्या. मात्र नंतर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये त्यांना चांगलं यश मिळालं. महिंद्रा हॉलिडेज, रेप्रो इंडिया आणि इलेकॉन इंजिनिअरिंग ही त्यांची लोकप्रिय होल्डिंग्स आहेत.
देशातले हे काही ट्रेडर्स आहेत ज्यांनी आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर शेअर बाजारातून भरपूर कमाई केली. त्यांचं अनोखं गुंतवणूक तत्वज्ञान, बाजाराची जाण, धाडसी गुंतवणूक निर्णय यामुळेच आपला एक वेगळा ठसा त्यांनी उमटवलाय. फायनान्सच्या या जगात ज्यांना स्वत:चं काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न, नाव कमावण्याची आकांक्षा असेल, अशा सर्वांसाठी ते प्रेरणा म्हणूनच काम करतात.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            