2022 वर्षात भारतामध्ये उच्चांकी गृहखरेदी झाली. याआधी 2014 साली सर्वात जास्त गृहखरेदी झाली होती. तो रेकॉर्ड 2022 साली मोडला आहे. व्याज आणि मॉर्गेजेसचे दर वाढत असतानाही घराची विक्री वाढत आहे. देशातील मोठ्या सात शहरांमध्ये 3.65 युनिट्सची खरेदी झाली. कोरोना साथीनंतर रियल इस्टेट क्षेत्राने पुन्हा उभारी घेतली आहे. घरांच्या किंमतीत 4 ते 7 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून गृहनिर्माण प्रकल्पाच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. तरीही सदनिका खरेदीला नागरिकांची पसंती आहे.
सात शहरांतील आकडेवारी
गृहनिर्माण क्षेत्रातील मागणी पुरवठ्याची आकडेवारी अनरॉक प्रॉपर्टी कन्सलटंट कंपनीने जारी केली आहे. त्यातून ही माहिती पुढे आली आहे. सदनिकांच्या विक्रीमध्ये 54 टक्क्यांनी वाढ झाल्याचे असून 2022 वर्षात 3 लाख 64 हजार 900 युनिट्सची विक्री झाली होती. 2021 मध्ये ही संख्या 2 लाख 36 हजार 500 एवढी होती. दिल्ली, मुंबई मेट्रोपोलिटन रिजन, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे शहरांतील आकडेवारीचा यामध्ये समावेश आहे. याआधी 2014 साली गृह खरेदीमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली होती. तेव्हा या सात शहरांमध्ये 3 लाख 43 हजार सदनिकांची विक्री झाली होती.
मुंबईमध्ये सर्वात जास्त गृहखरेदी
मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये सर्वात जास्त म्हणजे 1 लाख 9 हजार 700 सदनिकांची विक्री झाली. त्याखालोखाल दिल्लीत 63,700 सदनिकांची विक्री झाली. दिल्लीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत गृह खरेदी 59 टक्क्यांनी वाढली आहे. तर मुंबई शहामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 44 टक्क्यांनी गृहखरेदी वाढली. तर बंगळुरू शहरात 50 टक्क्यांनी वाढ झाली.
संपूर्ण जगभरात मंदीची परिस्थिती निर्माण झाली असली तरी भारतातील गृहनिर्माण क्षेत्र तेजीत आहे. बंगळुरू शहरात गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. व्याजदर वाढत असतानाही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून नागरिकांकडून स्थावर मालमत्तेतील गुंतवणूकीला प्राधान्य देण्यात येत आहे. पुढील वर्षातही गृहनिर्माण आणि व्यावसायिक प्रकल्पांना मोठी मागणी असेल असे मत व्यक्त केले जात आहे. कोरोनाची साथ संपल्यानंतर व्यावसायिक प्रकल्पांची मागणी, भाडेवाढही झाली. गृहनिर्माण क्षेत्रातील कच्च्या मालाच्या किंमती वाढत असल्याने घरांच्या किमतीही येत्या काळात जास्त राहतील, अशी शक्यता आहे.