बेंगळुरू याठिकाणचं स्टार्टअप असलेल्या या कंपनीत इलेक्ट्रिक कारचं उत्पादन होतं. प्रवेग डायनॅमिक्स (Pravaig Dynamics) असं या भारतीय कंपनीचं नाव आहे. प्रवेग आता आपलं उत्पादन यूनिट सौदी अरेबियातही (Saudi Arabia) सुरू करणार आहे. वाढती मागणी लक्षात घेता स्टार्टअप असलेल्या या कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातला सामंजस्य करार पूर्ण झाला आहे. कार बाजारपेठेत लवकरच दाखल होणार आहे.
सौदीसह इतर देशांतही मागणी
प्रवेग डायनॅमिक्सतर्फे सौदी अरेबियात उत्पादनाचं यूनिट सुरू करण्यात येईल. यातून जवळपास 10 लाख इलेक्ट्रिक कारचं उत्पादन करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या भारतीय कारचं आकर्षण केवळ सौदीलाच नाही, तर जगातल्या विविध देशांना आहे. यात युरोपीयन देश तसंच अमेरिकेचादेखील समावेश आहे. त्याठिकाणी कशाप्रकारे सेवा दिली जाणार, याबाबत कंपनीनं अजून काही अपडेट्स दिलेले नाहीत.
काय आहेत कारची वैशिष्ट्ये?
प्रवेश डायनॅमिक्सच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये फीचर्सही दमदार आहेत. सर्वात आधी बॅटरीविषयी जाणून घेऊ. पूर्ण चार्ज झाल्यानंतर कार 500 किमीपर्यंत चालू शकते, असा कंपनीचा दावा आहे. अंदाजानुसार 402 bhp पॉवर असून 210इतकी कारची टॉप स्पीड आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवेग डेफी (Pravaig Defy) 620nmचा पिक टॉर्क जनरेट करते. 4.9 मीटर लांबी आहे. 90.9kWh लिथियम आयन बॅटरी ही काही वैशिष्ट्ये आहेत.
किंमत काय?
प्रवेगच्या या कारची एक्स शोरूम किंमत 39.50 लाख रुपये आहे. ही कार 0 ते 100 स्पीड केवळ 4.9 सेकंदात पकडते असा कंपनीचा दावा आहे. लवकरच याचं उत्पादन सुरू केलं जाणार आहे. यासंदर्भात कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सिद्धार्थ बागरी म्हणाले, की भारतातलं तंत्रज्ञान जागतिक स्तरावर सादर करण्याच्या दृष्टीनं ही एक चांगली संधी आहे. तसंच भारतीय स्टार्टअपसाठी हा एक चांगला संकेत आहे.