जगात एलन मस्क यांची कंपनी असलेली टेस्ला (Tesla) कार पसंत केली जाते. मात्र टेस्ला ही एक महागडी कार म्हणून गणली जाते. भारतात तर केवळ चारच जणांकडे टेस्ला कार आहे. आता मात्र ही संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतात दरवर्षी 5 लाख इलेक्ट्रिक वाहनं (Electric vehicles) तयार करण्याचं लक्ष्य कंपनीनं ठेवलं आहे. टेस्लानं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
Table of contents [Show]
सप्लाय चेन स्थापन करणार टेस्ला
टेस्लानं भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी सरकारशी चर्चा सुरू केली आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या (ET) मते, कंपनीनं देशात स्वतःची इलेक्ट्रॉनिक पुरवठा साखळी स्थापन करण्याबाबत आणि कर सूट देण्याबाबत सरकारशी चर्चा केली आहे. एका सरकारी अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, टेस्लाने आपली पुरवठा साखळी इको-सिस्टम भारतात आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर सरकारनं कंपनीला देशातल्या विद्यमान ऑटो कॉम्पोनंट सप्लाय चेनचं मूल्यांकन करण्यास सांगितलं आहे.
कंपनीचे स्वतःचे पुरवठादार
एका अधिकाऱ्यानं सांगितलं, की आम्ही टेस्लाला त्यांच्या गरजा विचारल्या आहेत आणि त्यांना भारतीय इको सिस्टमद्वारे आपल्या गरजा पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. कंपनीचे स्वतःचे पुरवठादार आहेत. ही सुरुवातीची चर्चा आहे, म्हणून आम्हाला आशा आहे, की कंपनी याबद्दल नक्कीच विचार करेल.
Tesla in talks with India to set up factory with up to 500,000 annual capacity - report https://t.co/Cah178Ns0A pic.twitter.com/vh6ihaQHsl
— Reuters (@Reuters) July 13, 2023
काय बोलणी?
अलीकडेच दिल्लीतल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सच्या (SIAM) बैठकीत टेस्लानं सांगितलं होतं, की ते स्वतःचे पुरवठादार भारतात आणण्यास इच्छुक आहेत. यासोबतच टेस्ला इंडियाच्या अधिकाऱ्यांनी भारतात त्यांचे उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी सरकारकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाची माहिती घेतली आहे. उत्पादन योजनेसह टेस्लानं आपल्या कारची किंमतही उघड केली आहे. परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारची किंमत 20 लाख रुपये असेल, असा त्यांचा दावा आहे. तर ही अगदीच सुरुवातीची किंमत असणार आहे. आगामी काळात त्यात बदल होऊ शकतो, असं सांगण्यात आलं.
मोदी आणि मस्क यांची झाली होती भेट
मागच्या महिन्याच्या सुरुवातीला एलन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. यानंतर मस्क म्हणाले होते, की भारतात शाश्वत ऊर्जेच्या भविष्यासाठी सौर-पवन ऊर्जेसाठी चांगली क्षमता आहे. मी मोदींचा चाहता आहे, लवकरच टेस्ला भारतात येणार आहे.
सौर आणि पवन उर्जेचा वापर
आम्ही भारतात सौर आणि पवन उर्जेच्या माध्यमातून विजेचं उत्पादन आणि बॅटरीमध्ये ऊर्जा साठवणुकीची क्षमता वाढवणं यावरही विचार करत आहोत. आम्ही भारतात स्टारलिंक घेऊन जाण्याचादेखील विचार करत आहोत. या माध्यमातून भारतातल्या दुर्गम भागात इंटरनेट पुरवण्यात मदत होऊ शकेल.