भारतीय रुपयाचा शुक्रवारी (30 डिसेंबर, 2022) या वर्षातील शेवटचा ट्रेडिंग दिवस संपला. या वर्षभरात भारतीय रुपयाचे मूल्य एकूण 10.14 टक्क्यांनी घसरले. 2013 नंतर भारतीय रुपयाने 2022 मध्ये सर्वांत वाईट परफॉर्मन्स दिल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रुपयाचे मूल्य कमी होण्यामागे फेडरल रिझर्व्हच्या (अमेरिकेची प्रमुख सेंट्रल बॅंक) आक्रमक चलनविषयक धोरण कारणीभूत होते. यामुळे अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य वाढत होते, तर भारतीय रुपयाचे मूल्य ढासळत होते.
ऑक्टोबर 2022 मध्ये रुपयाने डॉलरच्या तुलनेत 83.29 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला होता आणि अलिकडच्या आठवड्यात तो पुन्हा 83 रुपयांखाली घसरला आहे. शुक्रवारी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 15 पैशांनी वाढून तात्पुरत्या स्वरूपात 82.72 रुपयांवर पोहोचला. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, डॉलर सध्या 2015 नंतरच्या सर्वात मोठ्या दरवाढीच्या मार्गावर आहे.
जुलै-सप्टेंबरमध्ये चालू खात्यातील तोटा उच्चांकावर
कमोडिटीच्या वाढत्या किमती आणि कमकुवत झालेल्या रुपयामुळे जुलै-सप्टेंबर या तिमाहीत भारताच्या चालू खात्यामधील तोटा हा उच्चांकावर पोहोचला होता, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी सादर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. भारतीय चालू खाते (Current Account) म्हणजे, वस्तू आणि सेवांची आयात-निर्यात वजा करून उरलेले ट्रेड. यात निव्वळ घटक उत्पन्नांचा समावेश होतो, जसे की, व्याज, लाभांश आणि फक्त हस्तांतरित देयके म्हणजे परदेशी मदत, यांची बेरीज केल्यावर जे हाती येते. त्याचा हिशोब भारताच्या चालू खात्यात जमा होतो. तर या खात्यातील भारताचा तोटा हा उच्चांकावर पोहोचला होता. जेव्हा एखादा देश काही गोष्टी आयात (Import) करतो. तेव्हा त्या वस्तू आणि सेवांचे मूल्य निर्यात केलेल्या उत्पादनांच्या मूल्यापेक्षा जास्त ठरते. परिणामी त्या देशाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे रुपयाच्या खराब कामगिरी मागे भारताचे आयात-निर्यात धोरण हे ही तितकीच महत्त्वाची भूमिका बजावत असते.
1947 ते 2022 पर्यंत एका डॉलरचे भारतीय मूल्य!
वर्ष | 1 डॉलर = रुपये | वर्ष | 1 डॉलर = रुपये |
1947 | 4.16 | 1990 | 17.5 |
1950 | 4.76 | 2000 | 44.94 |
1960 | 4.76 | 2010 | 45.73 |
1970 | 7.5 | 2020 | 76.38 |
1980 | 7.86 | 2022(30 Dec) | 82.72 |
Source: https://bit.ly/3WYIPQr |
2023च्या पहिल्या तिमाहीत रुपया 81.50 ते 83.50 या टप्प्यात व्यापार करेल, असा अंदाज ट्रेडर्स आणि अॅनालिस्ट यांचा आहे. पण त्यांनी या अंदाजासोबत असेही सावध केले आहे की, जागतिक पातळीवर सुरू असलेल्या भू-राजकीय परिस्थितीमुळे विशेषत: युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धामुळे आणि जगभरात सुरू असलेल्या संभाव्य आर्थिक मंदीच्या चर्चेमुळे बाजाराची दिशा मोजणे कठीण झाले आहे. त्यामुळे येणाऱ्य वर्षात रुपयाचे मूल्य वाढण्याचा अंदाज असला तरी, त्यावेळची परिस्थिती खूप महत्त्वाची ठरणार आहे.
ओव्हरसीज्-चायनीज बॅंकिंग कॉर्पोरेशन (Oversea-Chinese Banking Corporation -OCBC) बँकेचे परकीय चलन बाजार रणनीतीकार क्रिस्टोफर वोंग यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, जरी रुपयाची किंमत वाढली तरी, तो अजूनही आशियाई देशातील इतर चलनांच्या तुलनेत त्याची कामगिरी साधारणच ठरू शकेल. येणाऱ्या वर्षात भारतीय रुपयाचे मूल्य लगेच वाढेल, अशी शक्यता लगेच दिसत नाही.