इंडियन रेल्वे बोर्डाने भारतातील पायाभूत सोयीसुविधांचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टिने पुढाकार घेतला आहे. यासाठी प्रामुख्याने रेल्वे प्रशासनाने सुरूवातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यास सुरूवात केली आहे. जागतिक पटलावर भारतातील रेल्वे स्टेशन्स आणण्याच्या दृष्टिने त्यांचे नुतनीकरण केले जाणार आहे. नुतनीकरणाबरोबरच प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर रेल्वे प्रशासनाचा भर असणार आहे.
रेल्वेने हाती घेतलेल्या या प्रकल्पांमुळे फक्त रेल्वे प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा मिळतील असे नाही. तर याचे अनेक फायदे होणार असून त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायद होणार आहे. या प्रकल्पांमुळे रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होणार आहेत. तसेच नवीन उद्योगधंदे सुरू होण्यासही वाव असणार आहे. एकूणच रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पांच्या माध्यमातून लोकांसाठी सोयीसुविधा, रोजगार निर्मिती आणि भविष्यातील उद्योग-व्यापार हे केंद्रित ठेवून या प्रकल्पांना चालना देण्याचे योजले आहे.
रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेल्या या उपक्रमांमध्ये कोणत्या स्टेशन्सचा समावेश असणार आहे; तसेच त्यामध्ये कोणते बदल केले जाणार आहेत. हे आपण पाहणार आहोत.
Table of contents [Show]
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई (CSMT, Mumbai)
देशातील पहिले, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला आहे. या रेल्वे स्थानकाच्या माध्यमातून दररोज हजारो लोक प्रवास करत आहेत. पर-राज्यातील प्रवाशांबरोबरच परदेशातील प्रवासीही मोठ्या संख्येने येथे येतात. जागतिक वारसा असलेल्या या रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास केला जात आहे. या स्थानकावरील गर्दीचा भाग कमी करून येथील अत्याधुनिक सेवासुविधांमध्ये वाढ करण्यावर रेल्वे प्रशासनाचा भर असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा पुनर्विकास हा ईपीसी (Engineering, Procurement & Construction-EPC) मॉडेलद्वारे केला जाणार आहे. यासाठी 1,813 कोटी रुपयांहून अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. या पुनर्विकासात स्टेशनवर सोलर एनर्जी, वॉटर कन्झर्वेशन आणि रिसायकलिंग आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची सोय केली जाणार आहे. तसेच हे स्टेशन मेट्रो लाईन 3 सोबत जोडले जाणार आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच पुनर्विकास करण्याच्या योजनेला डिसेंबर 2021 मध्येच तत्त्वत: मान्यता देण्यात आली होती. या प्लॅनला संबंधित विभागाकडून मान्यता देण्यात आली असून यासाठी 4 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या स्टेशनच्या पुनर्विकासात स्टेशनची इमारत 6 मजली असणार असून, त्यात दोन मोठे घुमट असणार आहेत. तसेच हे स्टेशन दिल्लीतील मेट्रोच्या यलो लाईन आणि एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनशी जोडले जाणार आहे.
जयपूर जंक्शन (JP)
जयपूर जंक्शन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 716.88 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. या स्टेशनच्या पुनर्विकासाचे काम दिल्लीतील गिरधारी लाल कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. या कामासाठी या कंपनीला 578 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. हे काम 42 महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकावर होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग तयार केला आहे.
जम्मू-तावी रेलवे स्टेशन (JAT)
जम्मू-काश्मीरमधील जम्मू-तावी रेल्वे स्थानक हे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनच्या पुनर्विकासाचे काम जोमाने सुरू आहे. या स्टेशनच्या पुनर्विकासासाठी 258.57 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या पुनर्विकासाच्या प्रकल्पाच्या पाहणीचे काम टाटा कन्सल्टिंग इंजिनीअरिंग कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. या रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी प्रशासनाला सुमारे 195 झाडे तोडण्याची परवानगीही मिळाली आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने 2023-24 या आर्थिक वर्षात सुमारे 1,275 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. अमृत भारत स्थानक योजना (Amrit Bharat Station Scheme) योजनेंतर्गत या स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाला 2.41 लाख कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे.