भारताच्या राष्ट्रीय संघात खेळणाऱ्या क्रिकेटपटूंप्रमाणेच अंडर-19, रणजी ट्रॉफी सारख्या स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडू देखील देशभरात लोकप्रिय आहेत. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्याही मोठी आहे. मात्र, राष्ट्रीय संघ व देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात मोठा फरक पाहायला मिळतो. रणजी ट्रॉफी, इराणी कप सारख्या देशांतर्गत स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंना किती पगार मिळतो, त्याबाबत जाणून घेऊया.
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा
भारतात दरवर्षी क्रिकेटच्या शेकडो स्थानिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. मात्र, यातील काही ठराविकच क्रिकेट स्पर्धात चर्चेत असतात. देशांतर्गत सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धांमध्ये रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉपी, इराणी कप, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा समावेश आहे.
याच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंना पुढे राष्ट्रीय संघात स्थान मिळते. अनेक डच्चू मिळालेले खेळाडू देखील संघात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी या स्पर्धांमध्ये खेळताना दिसतात.
रणजी ट्रॉफी खेळणारे क्रिकेटर्सची कमाई किती?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे (BCCI) वेळोवेळी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात वाढ केली जाते. रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि इराणी कप सारख्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंना दरदिवसाच्या हिशोबाने पगार दिला जातो.
रिपोर्टनुसार, 2021-22 मध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात वाढ करण्यात आली होती. 40 पेक्षा अधिक सामने खेळलेल्या खेळाडूंना प्रतिदिन 60 हजार रुपये दिले जातात. 20 ते 40 खेळणाऱ्या खेळाडूंचा दिवसाला 50 हजार रुपये दिले जातात.
तर उर्वरित खेळाडूंना दरदिवसाला 40 हजार रुपये पगार मिळतो. याआधी ही रक्कम 35 हजार रुपये होती. सामना न खेळणाऱ्या खेळाडूंना देखील ठराविक रक्कम दिली जाते. तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंना एका सामन्यासाठी 17,500 रुपये दिले जातात.
बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळणाऱ्या महिला खेळाडूंच्या पगारात देखील वाढ केली होती. महिला खेळाडूंना आता प्रत्येक सामन्यासाठी 12,500 रुपयांऐवजी 20 हजार रुपये मिळतात. अंडर-16 ते वरिष्ठ स्तरावर खेळणाऱ्या जवळपास 1500 ते 2 हजार क्रिकेटपटूंचा यामध्ये समावेश होतो. दरवर्षा देशांतर्गत शेकडो सामने खेळले जातात.
राष्ट्रीय संघातील क्रिकेटपटूंची कमाई किती?
बीसीसीआयकडून राष्ट्रीय संघातील खेळाडूंची A+, A, B आणि C अशा चार गटात विभागणी करण्यात आली आहे. A+ श्रेणीतील क्रिकेटपटूंना वर्षाला 7 कोटी रुपये, A श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी रुपये, B श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी रुपये आणि C श्रेणीतील क्रिकेटपटूंना 1 कोटी रुपये पगार मिळतो. याशिवाय, प्रत्येक सामन्यानंतर फी स्वरुपात वेगळी रक्कम देखील दिली जाते.
हे देखील वाचा - विराट, रोहित शर्मा, बाबर आझमला किती पगार मिळतो? रक्कम वाचून धक्का बसेल