भारतात 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. 19 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंडसह 10 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंबाबत देखील चाहत्यांना जाणून घ्यायचे असते. विराट कोहलीपासून ते रोहित शर्मापर्यंत प्रत्येक गोष्ट चाहते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंना वर्षाला किती पगार मिळतो, तुम्हाला माहितीये का? वर्ल्ड कपच्या निमित्ताने भारतासह इतर संघाच्या खेळाडूंना किती पगार मिळतो, त्याबद्दल जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
भारतीय क्रिकेटपटूंना मिळतो सर्वाधिक पगार
बीसीसीआयद्वारे क्रिकेटपटूंशी वार्षिक करार केला जातो. बीसीसीआयने वार्षिक प्लेयर रिटनेरशिपचे 4 गटात विभागणी केली आहे. A+, A, B आणि C अशा चार श्रेणीत खेळाडूंची विभागणी करण्यात आली असून, याच आधारावर वार्षिक वेतन ठरवले जाते.
A+ श्रेणीमधील खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये दिले जातात. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाचा समावेश आहे. A श्रेणीमध्ये हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, आर. आश्विन, रिषभ पंत, अक्षर पटेल या खेळाडूंचा समावेश असून, त्यांना वर्षाला 5 कोटी रुपये दिले जातात.
तसेच, B आणि C श्रेणीमधील खेळाडूंना अनुक्रमे 3 कोटी रुपये आणि 1 कोटी रुपये वेतन दिले जाते. B श्रेणीमध्ये चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिलचा समावेश आहे. तर C श्रेणीमध्ये उमेश यादव, शिखर धवन, इशान किशान, युझवेंद्र चहलसह 11 खेळाडूंचा समावेश आहे. वार्षिक पगाराव्यतिरिक्त क्रिकेटपटूंना मॅच फी आणि बोनस देखील मिळतो.
पाकिस्तानच्या खेळाडूंना किती मिळते वेतन?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील खेळाडूंची विभागणी A, B, C आणि D श्रेणीमध्ये केली आहे. या श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला अनुक्रमे जवळपास 3.75 कोटी रुपये, 1.5 कोटी रुपये, 60 लाख रुपये आणि 16 लाख रुपये पगार मिळतो. ए श्रेणीत बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहिन आफ्रिदी या खेळाडूंचा समावेश आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंना मिळणारी रक्कम पाहता भारतीय क्रिकेटपटू वर्षाला कितीतरी अधिक पट कमाई करतात.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू करतात सर्वाधिक कमाई
कमाईच्याबाबतीत ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सर्वात आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हे वर्षाला जवळपास 16 कोटींपासून ते 3 कोटी रुपयांपर्यंत कमाई करतात. सर्वाधिक कमाई करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची कमाई
दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख खेळाडू वर्षाला जवळपास 2 कोटींपासून ते 60 लाख रुपयांपर्यंत कमाई करतात. यामध्ये टेम्बा बवुमा, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, कगिसो रबाडा या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा पगार किती?
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंची टेस्ट कॉन्ट्रॅक्ट, व्हाइट बॉल कॉन्ट्रॅक्ट आणि इंक्रिमेंट कॉन्ट्रॅक्ट अशा तीन श्रेणीमध्ये विभागणी केली आहे. टेस्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये बेन स्टॉक्स, मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, जो रूट सारख्या खेळाडूंचा समावेश असून, या क्रिकेटपटूंना वर्षाला जवळपास 9 कोटी रुपये पगार मिळतो. तर व्हाइट बॉल कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंना 8 कोटी रुपये आणि इंक्रिमेंट कॉन्ट्रॅक्ट खेळाडू दीड कोटींपासून ते 5 कोटी रुपयांपर्यंत कमाई करतात.