जानेवारी 2023 मध्ये देशाची निर्यात आणि आयात सलग दुसऱ्या महिन्यात घसरली. या कालावधीत व्यापार तूट 17.75 अब्ज डॉलरच्या 12 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली. जानेवारी 2022 मध्ये हा आकडा 17.42 अब्ज डॉलर होता. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जागतिक मागणीतील मंदीमुळे जानेवारीत निर्यात 6.58 टक्क्यांनी घसरून 32.91 अब्ज डॉलर झाली आहे. जानेवारी 2022 मध्ये देशातून 35.23 अब्ज डॉलर किमतीच्या वस्तू आणि सेवांची निर्यात झाली. आयातही 3.63 टक्क्यांनी घसरून 50.66 अब्ज डॉलर झाली आहे. यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये निर्यात 12.2 टक्क्यांनी घसरून 34.48 अब्ज डॉलर झाली होती.
Table of contents [Show]
एप्रिल-जानेवारीमध्ये निर्यातीत 8.51 टक्क्यांनी वाढ
2022-23 च्या पहिल्या 10 महिन्यांत म्हणजेच एप्रिल-जानेवारी या कालावधीत देशाच्या एकूण व्यापारी मालाची निर्यात 8.51 टक्क्यांनी वाढून 369.25 अब्ज डॉलर झाली आहे. आयात देखील 21.89 टक्क्यांनी उच्च वाढ नोंदवून 602.20 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. या काळात 233 अब्ज डॉलरची व्यापार तूट होती. या काळात पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तांदूळ, तयार कपडे आणि रसायनांच्या निर्यातीत सकारात्मक वाढ झाली आहे.
रशियाकडून आयात 384 टक्क्यांनी वाढून 37 अब्ज डॉलर
एप्रिल ते जानेवारी या कालावधीत रशियामधून देशाची आयात 384 टक्क्यांनी वाढून 37.31 अब्ज डॉलर झाली आहे. यामध्ये कच्च्या तेलाचा सर्वाधिक वाटा आहे. 2021-22 मध्ये रशिया हा भारताचा 18 वा सर्वात मोठा आयातदार भागीदार देश होता. त्यावेळी 9.86 अब्ज डॉलर्सची आयात होती. आता तो पाचव्या क्रमांकाचा आयात करणारा देश आहे. चीन-अमेरिकेनंतर भारत जगातील तिसरा सर्वात मोठा क्रूड आयातदार आहे. चीनमधून आयात 9 टक्क्यांनी वाढून 83.76 अब्ज झाली आहे. त्यात UAE मधून 23.53 टक्के आणि अमेरिकेतून 25 टक्के वाढ झाली आहे. भारतातून होणाऱ्या निर्यातीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे.
गव्हाच्या घाऊक आणि किरकोळ किमती 5% कमी
खुल्या बाजारात तीस दशलक्ष टन गहू विकण्याच्या केंद्राच्या निर्णयानंतर घाऊक आणि किरकोळ बाजारात गव्हाच्या किमती सुमारे 5 रुपयांनी कमी झाल्या आहेत. सरकार गहू आणि आटा किमतींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी बुधवारी सांगितले. गरज भासल्यास दर कमी करण्यासाठी आणखी पावले उचलली जातील. गेल्या वर्षी मे महिन्यापासून गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर सरकार विचार करत नसल्याचे ते म्हणाले. जानेवारीमध्ये खुल्या बाजार विक्री योजना (OMSS) ची घोषणा झाल्यापासून गव्हाच्या किमती खाली आल्याचे सचिवांनी सांगितले. घाऊक भाव 3 हजार रुपयांवरून 2,हजार 500 रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत. किरकोळ बाजारातही भाव 3,300-3,400 रुपयांवरून 2,800-2,900 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत.
विदेशी व्यापारासाठी रुपयांमध्ये विशेष खाती
एचडीएफसी बँक आणि यूको बँकेसह वीस बँकांनी विदेशी व्यापार रुपयात सक्षम करण्यासाठी विशेष व्होस्ट्रो खाती उघडली आहेत. तसेच, आणखी अनेक देश या व्यवस्थेत स्वारस्य दाखवत आहेत. विदेशी व्यापार महासंचालनालयाचे (डीजीएफटी) प्रमुख संतोष कुमार सारंगी यांनी बुधवारी सांगितले की, वाणिज्य मंत्रालय रुपयात विदेशी व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकांच्या संपर्कात आहे. याशिवाय, वित्तीय सेवा विभाग आणि निर्यातदारही मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. या खात्यांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व प्रमुख बँकांनी त्यांच्या नोडल अधिकाऱ्यांची यादी निर्यातदारांसोबत शेअर केली आहे, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, विदेशी व्यापार रुपयात सुरू करणे ही नवीन व्यवस्था आहे. त्यामुळे काही समस्या असतील, परंतु बँका, आरबीआय आणि निर्यातदारांशी सतत संपर्क ठेवला गेला आहे.