मोबाइल उत्पादन (Phone production) क्षेत्र हे दिवसेंदिवस विस्तार होणारं क्षेत्र आहे. भारत मागच्या काही काळापासून बेरोजगारीच्या समस्येशी झुंज देतोय. दुसरीकडे चीनसारखा देश मोबाइलसह इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस (Electronic device) बनवण्यात आघाडीवर असून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही चीनमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. अशावेळी भारतातही या संधी उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झालीय. द इकॉनॉमिक टाइम्सनं यासंबंधीचं वृत्त दिलंय. अॅपल, सॅमसंग, फॉक्सकॉन, नोकिया आणि टाटा यांसारख्या बलाढ्य कंपन्यांकडून रोजगार निर्मितीसाठी योगदान अपेक्षित आहे, असा दावा यात करण्यात आलाय. एकूण नोकऱ्यांपैकी 30,000-40,000 नोकऱ्या थेट मिळण्याची शक्यता आहे, असं याविषयीच्या अहवालात नमूद करण्यात आलंय.
अॅपलनं भारतावर केंद्रित केलं लक्ष
विविध इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांसह आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे अॅपल. 2023-24 या आर्थिक वर्षात अॅपल भारतात 1 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याची शक्यता आहे. अॅपलनं भारतावर आपलं लक्ष केंद्रित केलंय. येत्या 36 महिन्यांत उत्पादन आणि किरकोळ विक्रीवर लक्ष केंद्रित करून एकूण 1.2 लाख नोकऱ्या अॅपल निर्माण करू शकतं, असा कयास आहे. अॅपलच भारतावर वाढलेलं लक्ष देशात एकूण 1,20,000 नोकर्या वाढवू शकतं. यापैकी साधारणपणे 40,000 नोकऱ्या थेट स्वरुपात मिळणार आहेत. आर्थिक वर्ष 2023-24पर्यंत अॅपलनं निर्माण केलेल्या नोकऱ्यांची संख्या 3 लाखांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. यापैकी एक तृतीयांश नोकऱ्या प्रत्यक्ष असतील तर आणखी 2 लाख अप्रत्यक्ष स्वरुपातल्या असणार आहेत.
पुढच्या 36 महिन्यांत अतिरिक्त 1 लाख थेट नोकऱ्या
भारतातल्या अॅपलच्या कंत्राटदाराद्वारे वाढत्या मागणीची वाट आम्ही पाहत आहोत. अतिरिक्त प्लांट्स, कारखान्यांचं नियोजन केलंय. त्यामुळे पुढच्या 36 महिन्यांत अतिरिक्त 1 लाख थेट नोकऱ्या निर्माण होतील, असं टीमलीज् सर्व्हिसेसचे स्टाफिंगचे मुख्य कार्यकारी कार्तिक नारायण यांनी सांगितलं. सरकारनं जाहीर केलेल्या उत्पादन-संबंधित प्रोत्साहन योजनेद्वारे हा रोजगार निर्माण केला जाईल. त्यामुळे अॅपलनं भारतावर लक्ष केंद्रित केल्यानं 2026पर्यंत सुमारे 2 लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा निर्माण झालीय.
आयफोनचं उत्पादन सुमारे 25 टक्क्यांपर्यंत वाढवलं जाणार
अॅपल पुरवठादारांनी पीएलआय योजनेद्वारे 1 जानेवारी 2023पर्यंत भारतात जवळपास 50,000 प्रत्यक्ष नोकर्या निर्माण केल्या आहेत. ही योजना ऑगस्ट 2021मध्ये लागू झाली. याशिवाय, 1 लाख अप्रत्यक्ष नोकऱ्यादेखील निर्माण झाल्या. भारतात फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन हे अॅपल आयफोनचे कंत्राटी उत्पादक आहेत. 2025पर्यंत अॅपल भारतात आयफोनचं उत्पादन सुमारे 25 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. सध्या ते 5 ते 6 टक्के आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अॅपलनं भारतीय एक स्वतंत्र विक्री बाजार बनवण्यासाठी आपल्या व्यवस्थापनात फेरबदल केले आहेत. दरम्यान, या महिन्याच्या अखेरीस मुंबईत अॅपलचं रिटेल स्टोअरही सुरू होणार आहे. भारतातलं हे पहिलं रिटेल स्टोअर असणार आहे. उत्पादनांच्या पलीकडे ग्राहक सेवा टचपॉइंट म्हणून हे काम करणार आहे.