• 28 Nov, 2022 17:51

India Sees Sharp Decline in Exports : निर्यात घटतेय, कर्मचाऱ्यांनो नोकऱ्या सांभाळा!

Indian Export Down, Indian Economy, Recession

India Sees Sharp Decline in Exports : निर्यात कमी होण्यास अभियांत्रिकी, पेट्रोलियम उत्पादने, रत्ने आणि दागिने, वस्त्रोद्योग, रसायने, औषधी, सागरी उत्पादने, चामड्याची तयार उत्पादने या उद्योगांची सुमार कामगिरी दिसून आली.

जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत अडकल्यानंतर त्याचे पडसाद भारतात उमटू लागले आहेत. ऑक्टोबर महिन्यात भारतातील निर्यातीत घट झाल्याने केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.  निर्यातीशी संबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या टिकवून ठेवण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने नुकताच निर्यातीची आकडेवारी जारी केली आहे. मंदीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेतून मागणी घटल्याचा हा परिणाम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये भारताची निर्यात 29.78 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे. यात 16.65 टक्क्यांची घसरण झाली आहे. यामुळे व्यापार तुटही 26.91 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. याधी ती 17.91 अब्ज डॉलर इतकी होती. 

‘या’ क्षेत्रावर झाला परिणाम 

देशातील काही प्रमुख निर्यात उद्योग क्षेत्रांवर याचा परिणाम जाणवला. ज्यामध्ये अभियांत्रिकी, पेट्रोलियम उत्पादने, रत्ने आणि दागिने, वस्त्रोद्योग, रसायने, औषधी, सागरी उत्पादने, चामड्याची तयार उत्पादने या क्षेत्रांचा समावेश आहे. निर्यात कमी झाल्याने या क्षेत्राचा विकास खुंटला आहे. परिणामी या क्षेत्रावर मंदीचे ढग दाटू लागले आहेत.

दोन वर्षांनी झाली मासिक आधारावर घसरण 

जवळपास दोन वर्षांनंतर, भारताच्या वस्तू निर्यातीत मासिक आधारावर घसरण झाली आहे. 2020 मध्ये कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. जागतिक अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम झाला होता. यामुळे नोव्हेंबर २०२० मध्ये देशाच्या वस्तू निर्यातीत 8.74 टक्के इतकी  घट झाली होती.  

नोकऱ्या टिकवणे आवश्यक 

जागतिक व्यापार संघटनेने याविषयी आपला अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार,  2022 मध्ये जागतिक व्यापार वाढ 3.5% आणि 2023 मध्ये ती केवळ 1% वाढू शकेल. एकीकडे ही अशी स्थिती असली तरी सेवा क्षेत्राच्या निर्यातीत येत्या काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती पाहता निर्यातीशी संबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या सांभाळणे आणि बचतीकडेही लक्ष देण्याचा सल्ला अर्थतज्ज्ञ देत आहेत.