Solar Panel Import: नवीकरणीय ऊर्जा स्रोतांची देशातील मागणी वाढत आहे. भारतात आता घरोघरी रुफ टॉप सोलार पॅनल दिसू लागले आहेत. तसेच शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही सर्रास सोलार पॅनल दिसतात. घरगुती आणि व्यावसायिक स्तरावर सोलारचा वापर वाढला आहे. देशात जेवढी मागणी आहे तेवढ्या प्रमाणात पुरवठा नसल्याने आता सरकारने आयातीवर नजर वळवली आहे.
केंद्र सरकार सोलार पॅनल आयात कर कमी करण्याचा विचार करत आहे. असे केले तर ग्राहकांना स्वस्तात सोलार पॅनल खरेदीसाठी उपलब्ध होतील. नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने कर कपातीसाठी अर्थमंत्रालयाला विनंती केली आहे. सध्या सोलार पॅनल आयातीवर 40% कर आकारला जातो. हा कर 20% करावा, अशी मागणी नवीकरणीय मंत्रालयाने केली आहे.
2021 पासून सोलार पॅनल आयातीवर 12% वस्तू आणि सेवा कर लागू केला आहे. हा GST 5% करावा, अशी मागणी देखील नवीकरणीय मंत्रालयाने केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नाही.
एप्रिल 2022 मध्ये केंद्र सरकारने सोलार पॅनलवर 40% आयात शुल्क लागू केले होते. तर 25% शुल्क सोलार सेल आयातीवर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परदेशातून जे सोलार भारतामध्ये आयात होते त्याचे प्रमाण रोडावले होते. मात्र, आता देशांतर्गत मागणी वाढल्याने सोलार आयातीवर शुल्काचा बोजा कमी करण्याचा विचार सरकार करत आहे.
आयात कर वाढवण्यामागील कारण काय होते?
देशांतर्गत सोलार निर्मिती व्यवसायाला चालना मिळावी यासाठी सोलार आयातीवर जास्त कर आकारला जात होता. सोबतच चीनमधून भारतात मोठ्या प्रमाणात सोलार आयात केले जात होते. ही आयात रोखण्यासाठी भारताने करवाढीचे शस्त्र उगारले होते. प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच देशांतर्गत निर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने आयात कमी करण्यावर भर दिला आहे.
देशांतर्गत सोलार निर्मितीची स्थिती
मागील पाच वर्षापासून देशातली सोलार बाजारपेठ 8% वार्षिक दराने वाढत आहे. गुजरात राज्य सोलार पॅनल निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. सोलार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना सरकारकडून प्रॉडक्शन लिंक्ड इंसेटिव्ह योजनेचा लाभही देण्यात येत आहे. देशात 70 पेक्षा जास्त सोलार पॅनल निर्मिती करणारे उद्योग आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सौरऊर्जेची देशातील क्षमता 365 gigawatts (GW) पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. सोबतच इलेक्ट्रिक वाहने आणि बायो फ्युअलला प्राधान्य देण्यात येत आहे.
स्थानिक उद्योग आणि ग्राहकांवर काय परिणाम होईल?
सोलार आयात स्वस्त झाल्यास स्थानिक उद्योगांवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. बाजारात तीव्र स्पर्धा निर्माण होऊ शकतो. भारतातील सोलार निर्मिती कंपन्या अद्याप बाल्यावस्थेत आहेत. आयात केलेल्या सोलार पॅनलची किंमत कमी झाल्यास स्थानिक उद्योगांनाही दर कमी करावे लागतील. त्यामुळे स्थानिक कंपन्यांचा नफा कमी होण्याची शक्यता आहे. बाजारातील स्पर्धेचा फायदा ग्राहकांना होण्याची शक्यता आहे. सोलार विक्रीत फक्त स्थानिक उद्योगांची मक्तेदारी राहणार नाही. त्यांना आयात उत्पादनांशी स्पर्धा करावी लागेल. देशात घरगुती विजेसाठी आणि पाणी गरम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोलार पॅनल बसवण्यात येतात.