अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली तर चीनचे लष्कर शांत बसणार नाही, असा इशारा चीनने अमेरिकेला दिली आहे. नॅन्सी पेलोसी या सिंगापूरच्या पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर चीनने लगेच ही धमकी दिली आहे. नॅन्सी पेलोसी या तैवानला भेट देणार असल्याच्या वृत्तानंतर चीनचा संताप झाला आहे. विशेष म्हणजे पेलोसी या चीनच्या धोरणांचा कडाडून विरोध करणाऱ्या अमेरिकी नेत्या आहेत. पेलोसी यांनी तैवानला भेट दिली तर मागील 25 वर्षात भेट देणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकन राजकीय नेत्या ठरतील.
गुंतवणूक आणि व्यापाराच्या बाबतीत चीन हा तैवानसाठी मोठा पार्टनर देश आहे. (China is Taiwan's largest trading partner) दोन्ही देशांमध्ये अब्जावधी डॉलर्सचा व्यापार आहे. मात्र कोणताही राजकीय संबंध नाही. नेमकी हीच बाब ओळखून चीननं तैवानची कोंडी करण्यास सुरवात केली आहे. तैवानवर अप्रत्यक्ष मालकी दाखवणारा चीन अमेरिकेच्या तैवानमधील लुडबुडीने खवळला आहे. त्याचाच एक भाग म्हणून चीनने तैवानच्या अनेक निर्यातदारांवर निर्बंध घातले आहेत. सोमवारी 1 ऑगस्ट 2022 रोजी तैवानच्या 100 हून अधिक अन्नधान्य पुरवठादारांवर बंदी घातली. त्याशिवाय तैवानच्या नेत्यांना, उद्योजकांना चीनमध्ये प्रवेश करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. मात्र तैवान चीनच्या व्यापारी दृष्टीने तितकाच महत्वाचा देश आहे. तैवानमधील सेमी कंडक्टरच्या पुरवठ्यावर चीनच्या बऱ्याच कंपन्या अवलंबून आहेत. त्यामुळे सरसकट तैवानच्या मालावर बंदी घालणे चीनला परवडणारे नाही.
नॅन्सी पेलोसी या अमेरिकेच्या लष्करी विमान C-40C मधून सिंगापूरला पोहोचल्या असून त्यांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली हसियन लूंग यांची भेट घेतली. नॅन्सी पेलोसी या सिंगापूर, मलेशिया, जपान आणि साऊथ कोरियाला भेट देणार आहेत. त्याचसोबत त्या तैवानला भेट देणार असल्याची शक्यता आहे. मात्र त्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आक्षेप घेतला आहे. चीनने तैवानवर लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे अमेरिकी नौदल आणि वायूसेनेसह तैवानचे लष्कर देखील सज्ज झाले आहे.
यापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी तैवानच्या स्वातंत्राबाबत मोठं विधान केलं होतं. तैवानच्या सार्वभौमासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचे बायडन यांनी म्हटले होते. अमेरिका तैवानाला सर्वतोपरी मदत करेल अशी भूमिका बायडन यांनी घेतली आहे. यामुळे चीन आणि अमेरिके दरम्यान कमालीचा तणाव वाढला आहे. गेल्या आठवड्यात बायडन आणि शी झिंगपींग यांच्यात फोनवरुन तब्बल 2 तास 17 मिनिटं चर्चा झाली मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी दोन्ही देश आता तैवानवरुन समोरासमोर उभे ठाकले आहेत. दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा आर्थिक आणि व्यापारी निर्बंध एकमेकांवर लावले जातील, असे चित्र निर्माण झाले आहे.
रशिया- युक्रेनप्रमाणे चीन तैवानवर कारवाई करणार
दरम्यान, तैवानवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न चीनकडून केला जाऊ शकतो, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. ज्याप्रकारे रशियाने युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी लष्कराचा वापर करुन युद्ध पुकारले. तशाच प्रकारे चीन तैवानच्या बाबत कारवाई करण्याची भीती जागतिक पातळीवर व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तैवानबाबत अमेरिका सावध झाली आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं चार युद्धनौका तैवानच्या उत्तरेकडे फिलपाईन्सच्या समुद्रात सज्ज ठेवल्या आहेत. चीनची लढाऊ विमाने मागील काही दिवसांपासून तैवानच्या सीमेनजीक घिरटया घालत आहेत. त्याशिवाय चीनने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका सज्ज ठेवल्या आहेत.