भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यान मुक्त व्यापार कराराला (Free Trade Agreement) 29 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. आणि याचा थेट फायदा दोन्ही देशांना व्यापार वृद्धीतून मिळणार आहे. येत्या पाच वर्षांत दोन्ही देशांमधला व्यापार (International Trade) 70 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात जाईल असा अंदाज GTRI या अर्थविषयक संशोधन करणाऱ्या संस्थेनं व्यक्त केला आहे.
कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यावर दोन्ही देशांदरम्यान चालणारा 23 अब्ज अमेरिकन डॉलर मूल्याचा व्यापार पहिल्या दिवसापासून ड्युटीफ्री होणार आहे. आणि याचा फायदा उचलण्यासाठी ही देवाण घेवाण वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही देशातले उद्योजक करतील असाच अंदाज आहे.
‘सध्या दोन्ही देशांमध्ये 25 अब्ज अमेरिकन डॉलर इतका द्विपक्षीय व्यापार चालतो. यातला जवळ जवळ 93% व्यापार ड्युटी फ्री झाल्यावर उभय देशातल्या उद्योजकांना व्यापाराची नवी संधी मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे आधीच जगात वस्तू आणि सेवांची पुरवठा साखळी विस्कळीत झालेली असताना असा करार ही मोठीच संधी आहे.’ असं GTRI संस्थेचे सहसंस्थापक अजय श्रीवास्तव यांनी संस्थेकडून काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारतातून 8.3 अब्ज अमेरिकन डॉलरचा माल ऑस्ट्रेलियाला निर्यात झाला. तर 16.75 अब्ज अमेरिकन डॉलरचा माल ऑस्ट्रेलियातून आयात झाला. भारत ऑस्ट्रेलियावर कच्च्या मालासाठी अवलंबून आहे. आणि ही आयात सोपी झाल्यामुळे भारताच्या उत्पादन क्षेत्राला त्याचा मोठा फायदा मिळेल अशी अपेक्षा आहे.
तर भारतातून ऑस्ट्रेलियाला निर्यात होणारा माल कृषि, तयार कपडे, रेल्वे इंजिन, दूरसंचार अशा क्षेत्रातला आहे. ऑस्ट्रेलिया आतापर्यंत बहुतेक आयात चीनमधून करत होता. पण, तिथल्या कोव्हिड परिस्थितीनंतर ऑस्ट्रेलियाला भारतातून आयातीची संधी प्राप्त झाली आहे. तर भारताला निर्यात वाढवण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
भारतातून तयार कपड्यांबरोबरच चामड्याच्या वस्तू आणि चपला, फर्निचर, स्पोर्ट्स वस्तू, दागिने, काही यंत्रं, रेल्वे वॅगन आणि औषधं या वस्तू ऑस्ट्रेलियात निर्यात होतात. आणि ऑस्ट्रेलिया भारताची इंधनाची महत्त्वाची गरज भागवतो. भारत आयात करत असलेल्या कोळशापैकी ¾ कोळसा ऑस्ट्रेलियातून येतो. त्यामुळे भारतातल्या ऊर्जा क्षेत्रासाही या कराराचा फायदा होणार आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            