Small Saving Schemes: केंद्र सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या अल्प बचत योजनांमधील विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणूक योजनांमध्ये आश्चर्यकारक वाढ झाली. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये (सिनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम) मागील वर्षभरात अडीचपटीने वाढ झाली. या योजनांमधील गुंतवणूक ही 74,625 कोटी रुपयांवर पोहोचली. तर महिलांसाठी आणलेल्या महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेमध्ये 13,512 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी, 2023 पासून रेपो दरामध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक बँकांनी आपल्या मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर जाहीर केले आहेत. त्यात ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज दिले जात आहे. स्मॉल फायनान्स बँकांसह, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकाही एफडीवर 8 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारनेही अल्प बचत योजनेतील ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांवरील व्याजदरात वाढ केली.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 8.2 टक्के
केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 8.2 टक्के व्याज देत आहे. यापूर्वी या योजनेतील गुंतवणूकदारांना 8 टक्के व्याज मिळत होते. उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात Senior Citizen Saving Scheme मधील गुंतवणूक वाढली आहे. त्याचबरोबर महिलांसाठी असलेल्या अल्प बचत योजनांमधील गुंतवणूकदेखील वाढली. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमधील गुंतवणुकीत मागील वर्षभरात अडीचपटीने वाढ होत आहे. ही वाढ सध्या 74,625 कोटी रुपये इतकी झाली. त्याच्या अगोदरच्या वर्षात या योजनेतील गुंतवणूक 28,715 कोटी रुपये एवढी होती.
सिनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS)
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये किमान 1 हजार रुपयांची तर कमाल 30 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. पूर्वी याची कमाल मर्यादा 15 लाख रुपये होती. तसेच या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा असून, तो पुढे 3 वर्षांसाठी वाढवता येणार आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत फॉर्म भरून सुरू करता येते.
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट (MSSC)
महिला आणि मुलींना केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकारने महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट ही योजना सुरू केली. ही योजना फक्त 2025 पर्यंत सुरु राहणार आहे. यात किमान 1 हजार रुपये आणि कमाल 2 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. यावर वर्षाला 7.5 टक्के व्याज दिले जात असून, तिमाही स्तरावर चक्रवाढ पद्धतीने व्याज दिले जाणार आहे. या योजनेतील गुंतवणुकीतही मोठी वाढ झाली आहे. बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनिअन बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये याचे खाते सुरू करता येते.