Bank of Baroda FD Rates Hike: बँक ऑफ बडोदाने मुदत ठेवींवरील व्याजदरात 50 बेसिस पॉईंटने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांना मुदत ठेवींवर 7.40 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.90 टक्के व्याज दिले जाणार आहे. हे नवीन व्याजदर आजपासून (दि. 9 ऑक्टोबर) लागू झाले आहेत.
मागील आठवड्यात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक झाली. या बैठकीत समितीने रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला. समितीने सलग 4 वेळा रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्वसामान्य कर्जदारांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर बँकांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केली असती, तर बँकांनाही कर्जाच्या व्याजदरात वाढ करावी लागली असती. आरबीआयने रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कर्जाचे व्याजदर तसेच ठेवले आहेत. त्याचबरोबर मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.
बँक ऑफ बडोदाने मुदत ठेवींच्या व्याजदरात 50 बेसिस पॉईंटने वाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मुदत ठेवींवर 7.40 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.90 टक्के व्याजदर मिळणार आहे. हे नवीन दर सोमवार दि. 9 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. हे व्याजदर 2 कोटीपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींसाठी लागू आहे. बँकेने यापूर्वीही मे मध्ये मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती.
बँकेने 2 वर्षांचा कालावधी असणाऱ्या मुदत ठेवींसाठी 6.75 टक्के व्याजदर निश्चित केला होता. तो तसाच असणार आहे. तर 2 आणि 3 वर्षांमधील मुदत ठेवींसाठी बँक आता 7.25 टक्के देणार आहे. तर 3 वर्षे आणि 10 वर्षे या कालावधीतील मुदत ठेवींसाठी 6.50 टक्के व्याज दिले जाणार आहे.