महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या (MHADA) घरांच्या सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. बुधवारी दि. 25 मे रोजी गृहनिर्माण विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरे म्हाडातर्फे उभारली जातात. पण आता म्हाडानेही उत्पन्न मर्यादेत वाढ केली आहे. नवीन उत्पन्न मर्यादेनुसार अत्यल्प उत्पन्न गटाची (EWS) उत्पन्न मर्यादा वार्षिक 6 लाख रुपये तर अल्प उत्पन्न गटासाठीची (Lower Income Group - LIG) उत्पन्न मर्यादा 6,00,001 ते 9,00,000 रुपये करण्यात आली आहे. मध्यम उत्पन्न गटासाठीची (Middle Income Group - MIG) मर्यादा 9,00,001 ते 12,00,000 रुपये आहे. उच्च उत्पन्न गटाची (Higher Income Group - HIG) मर्यादा 12,00,001 ते 18,00,000 रुपये अशी करण्यात आली आहे. यापुढे म्हाडाच्या विभागीय मंडळाकडून काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी ही उत्पन्न मर्यादा लागू असणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) तसेच 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना ही उत्पन्न मर्यादा लागू असणार आहे.
उर्वरित महाराष्ट्रासाठी उत्पन्न मर्यादा
उर्वरित महाराष्ट्रासाठी ही उत्पन्न मर्यादा बदलण्यात आली आहे. त्यानुसार आता अत्यल्प गटासाठी (EWS) वार्षिक 4,50,000 रुपये, अल्प गटासाठी (LIG) वार्षिक 4,50,001 ते 7,50,000 रुपये, मध्यम गटासाठी (MIG)वार्षिक 7,50,001 ते 12,00,000 रुपये आणि उच्च गटासाठी (HIG) 12,00,001 ते 18,00,000 रुपयांपर्यंत उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
घरांच्या क्षेत्रफळात वाढ (Carpet area Increased)
उत्पन्न गटानुसार सोडतीतील घरांच्या अनुज्ञेय क्षेत्रफळातही (Carpet area) बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार आता अत्यल्प गटातील(EWS) घरांसाठी 30 चौरस मीटर, अल्प गटातील (LIG) घरांसाठी 60 चौरस मीटरपर्यंत, मध्यम गटातील (MIG) घरांसाठी 160 चौरस मीटर आणि उच्च गटासाठी (HIG) 200 चौरस मीटर असे क्षेत्रफळ यापुढे लागू असेल.
पूर्वीची उत्पन्न मर्यादा
म्हाडाची नवीन उत्पन्न मर्यादा लागू होण्यापूर्वी अत्यल्प गटासाठी मासिक उत्पन्न 25,000 रुपयांपर्यंत, अल्प गटासाठी 25,001 ते 50,000 रुपयांपर्यंत तर मध्यम गटासाठी प्रति माह 50,001 ते 75,000 रुपये आणि उच्च गटासाठी रुपये 75,001 च्या पुढे अशी उत्पन्न मर्यादा होती. आता यात बदल करत ही उत्पन्न मर्यादा वाढविण्यात आली आहे.
म्हाडा सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च असे उत्पन्न गट आहेत. संबंधित अर्जदाराला उत्पन्न मर्यादेनुसारच अर्ज भरावा लागतो.