गेल्या काही वर्षांपासून भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत (Forex Reserve) सातत्याने वाढ होताना दिसते आहे. जागतिक बाजारपेठेत भारताची उत्तम कामगिरीमुळे हे चित्र आता दिसू लागले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार भारताचा परकीय चलन साठा 588.78 अब्ज डॉलर इतका झाला आहे. सर्वात जास्त परकीय चलन साठा असलेलेल्या जगातील पहिल्या 5 राष्ट्रांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. असे असले तरी आतापर्यतच्या सर्वाधिक परकीय चलन साठ्यापेक्षा हा आकडा कमीच आहे असे म्हणावे लागेल.
Table of contents [Show]
2021 मध्ये होता सर्वाधिक Forex Reserve
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2021 मध्ये देशाचा परकीय चलन साठा 645 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. आताचा आपला परकीय चलन साठा 57 अब्ज डॉलरने कमी आहे. असे असले तरी जागतिक पातळीवर अन्य देशांपेक्षा हा चलन साठा अधिकच आहे.
फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे काय?
परकीय चलनाचा साठा हा कोणत्याही देशासाठी आपत्कालीन निधीसारखा असतो. हा साठा देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे असतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे जमा केलेला पैसा हा देखील परकीय चलनाच्या साठ्याचा एक भाग आहे. जगभरातील देशांकडे अशाप्रकारच्या परकीय चलनाचा साठा असतो. मुख्यत्वे हे चलन यूएस डॉलरमध्ये असते. जागतिक बाजारपेठेत हे चलन प्रचलित असून, इतर देशांशी व्यवहार करताना तो यूएस डॉलरमध्येच होत असतो. पेट्रोल, डीझेल, सोने, खाद्यतेल आणि इतर महत्वाच्या वस्तूंची आयात करताना फॉरेक्स रिझर्व्हच वापरला जातो.
? India Ranks @ 5th Position In Holding Largest Forex Reserve ?#forexreserved #munim #India #Dollar #Forex #RBI #Economy pic.twitter.com/K8QJn6iLYr
— Munim (@themunim22) May 4, 2023
आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीत हाच निधी देशाची अर्थव्यवस्था शाबूत ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडत असतो. त्यामुळे ज्या देशाकडे जितका जास्त परकीय चलनाचा साठा असेल तो देश तितका जास्त आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल असे मानले जाते.
या 5 देशांमध्ये सर्वाधिक परकीय चलन साठा आहे
- चीन - 3379 अब्ज डॉलर्स
- जपान - 1,257 अब्ज डॉलर्स
- स्वित्झर्लंड - 899 अब्ज डॉलर्स
- रशिया - 598 अब्ज डॉलर्स
- भारत - 588.78 अब्ज डॉलर्स
परकीय चलनसाठा वाढेल
येत्या एकाही वर्षात भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात वाढ होईल असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा दबदबा असून भारत देश हा अनेक महत्वाच्या वस्तूंचा प्रमुख आयातदार आणि निर्यातदार देश आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेवर अनेक देशांची नजर आहे आणि भारताशी व्यापार करण्यासाठी देखील ते उत्सुक आहेत.
भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2020-21 या आर्थिक वर्षात 61 हजार 305 कोटी यूएस डॉलर रुपये विविध वस्तूंच्या आयातीवर खर्च केले होते. जवळपास 261 देशांशी भारताने आर्थिक व्यवहार केले होते. यापैकी सर्वात जास्त 15.42% खरेदीचे व्यवहार चीनसोबत करण्यात आले होते. तसेच सौदी अरबसोबत 7.31%, अमेरिकेसोबत 7.06% आणि इराकसोबत 5.20% आर्थिक व्यवहार केले गेले होते. हे सर्व व्यवहार भारताच्या परकीय चलनसाठ्यातून केले जातात.
परकीय चलन साठ्यात सध्या घट का?
2021 च्या तुलनेत 2022 मध्ये,अमेरिकेच्या सेन्ट्रल बँकेने, यूएस फेड रिझर्व्हने व्याजदर वाढवले आहेत. यामुळे परदेशी गुंतवणूकदार त्यांच्या ठेवी काढू लागले आहेत. याचा थेट परिणाम भारतीय रुपयावर झालेला पाहायला मिळाला होता. डॉलरच्या तुलनेत रुपयाही जवळपास 10 टक्क्यांनी घसरला आहे.
अशा परिस्थितीत रुपयाला आधार देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला डॉलर विकावे लागले होते, त्यामुळे 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये परकीय चलनाच्या साठ्यात घट नोंदवली गेली आहे.