हल्ली गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. असे असले तरीही लोकांची सर्वाधिक पसंती रिअल इस्टेट क्षेत्राला पाहायला मिळत आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लोक गुंतवणूक करू लागले आहेत. यासंदर्भातील एक अहवाल रेटिंग एजन्सी आयसीआरएने (Rating Agency ICRA) जाहीर केला आहे. या अहवालानुसार भारतातील 7 शहरांमध्ये मालमत्ता खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण 11 टक्क्यांनी वाढले असून बहुसंख्य लोकांनी 7 शहरांना पसंती दर्शवली आहे. आयसीआरएचा अहवाल नेमका काय सांगतोय? कोणती शहरं यामध्ये समाविष्ट आहेत, याची माहिती जाणून घेऊयात.
रेटिंग एजन्सी आयसीआरएने मालमत्तेच्या गुंतवणुकी संदर्भात एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार तिसर्या तिमाहीत, 7 शहरांमध्ये एकूण 149 दशलक्ष चौरस फूट निवासी मालमत्तेची विक्री करण्यात आली आहे. जी गेल्या 10 वर्षातील तिमाहीच्या तुलनेने सर्वात जास्त आहे. दरवर्षी हे प्रमाण वाढत जाऊन 11 टक्क्यांपर्यंत ही गुंतवणूक पोहचली आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत 7 शहरांमधून 412 दशलक्ष चौरस फूट निवासी मालमत्तेची विक्री केली आहे. मागील वर्षी हा आकडा 307 दशलक्ष चौरस फुटांपर्यंत मर्यादित होता.
या शहरात वाढली निवासी मालमत्तेची विक्री
आयसीआरएच्या अहवालानुसार बेंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद, कोलकाता, मुंबई, दिल्ली, एनसीआर क्षेत्र आणि पुणे याठिकाणच्या निवासी फ्लॅटची विक्री सर्वाधिक नोंदवण्यात आली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या महिन्यात वरील 7 शहरांमध्ये लक्झरी आणि मध्यम फ्लॅटची विक्री 16 ते 62 टक्क्यांनी वाढल्याचे पाहायला मिळाले. हे प्रमाण 2020 मध्ये 14 ते 36 टक्क्यांवर होते.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्येही वाढ कायम राहील
आयसीआरएचे वाईस प्रेसिडेंट अनुपमा रेड्डी यांनी सांगितले की, वर्ष 2022-23 प्रमाणे 2023-24 या वर्षांमध्येही हे प्रमाण वाढणार आहे. या वर्षात निवासी मालमत्तेत 8 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळेल. हीच वाढ 2024 मध्ये 14 ते 16 टक्क्यांपर्यंत पोहचेल अशी आशा आहे. महत्त्वाचं म्हणजे मोठ्या शहरांमध्ये मोठी घरं खरेदी करण्याकडे लोकांचा कल पाहायला मिळत आहे.
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ (RBI Repo Rate Hike) केल्यामुळे बँकांनी त्यांच्या व्याजदरात वाढ केली आहे. याचा थेट परिणाम लोकांच्या गृहकर्जावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरीही मोठ्या प्रमाणावर लोक रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत.
आयसीआरएचा अहवाल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.