मुलांचा सांभाळ करताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लसीकरण. जन्म झाल्यापासून ते 6 वर्षांचे होईपर्यंत बाळाला लस देणे गरजेचे आहे. लसीकरणामुळे बाळांचे विविध आजारांपासून रक्षण होते.
लहान मुलांना कधी व कोणत्या प्रकारच्या लसी द्यायला हव्यात व यासाठी किती खर्च येतो? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
मुलांना लस देणे खरचं आवश्यक आहे का?
प्रत्येक लहान मुलाचे लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरणामुळे प्राणघातक रोगांपासून बाळांचे संरक्षण होते. तसेच, लसीकरणामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढून आजारांशी लढण्यास मदत मिळते. भविष्यात एखाद्या आजाराची लागण झाली तरी शरीर अशा आजारांशी लढा देते.
लाखो लोकांचे प्राण वाचण्यात लसीचा मोठा वाटा आहे. यूनिसेफनुसार, केवळ गोवर लसद्वारे वर्ष 2000 ते 2017 या कालावधीत 21 दक्षलक्ष लोकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे प्रत्येक पालकाने मुलांचे लसीकरण करायला हवे. लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित असते.
लहान मुलांना लस कधी द्यावी?
लहान मुलांना जन्मल्यापासून ते 5 वर्षांचे होईपर्यंत विविध टप्प्यात लस देणे गरजेचे आहे. बाळ जन्माला आल्यानंतर 24 तासांच्या आत हेपॅटिटीस व ओपीव्ही लस लस द्यायला हवी. तसेच, जन्म झाल्यावर एक वर्षाच्या आत बीसीजी लस देणे आवश्यक आहे. त्यानंतर सहा, दहा व 14 आठवड्यांच्या कालावधीत ओपीव्ही – 1,2,3, डीटीपी 1,2,3 आणि हेपॅटीटीस B 1,2 3 या लसी देऊ शकता. तसेच, बाळ एक वर्षाचे होण्या अगोदर गोवरची लस द्यावी.
बाळ 16 महिन्यांचे झाल्यानंतर तुम्ही डीटीपी, ओपीव्ही आणि व्हिटामिन बूस्टर डोस देऊ शकता. तसेच, 10 ते 16 वर्षांच्या मुलांना टीटीची लस द्यावी. महिला गर्भवती असतानाही टीटीची लस घेऊ शकतात. बालकांना या व इतर कोणत्याही प्रकारची लस देताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच मुलांना लस द्यावी.
मुलांच्या लसीकरणासाठी येणारा खर्च
सरकारद्वारे बालकांसाठी विविध लसीकरण मोहिमा राबवल्या जातात. अनेक प्रकारच्या लसी या सरकारी हॉस्पिटल व उपचार केंद्रामध्ये मोफत उपलब्ध असतात. विशेष म्हणजे अनेक महत्त्वाच्या लसींसाठी एकही रुपया खर्च करण्याची गरज नसते. मात्र, तुम्ही बालकांना खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून लस देत असाल तर अशावेळी जास्त खर्च येऊ शकतो.
खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून एक लस देण्यासाठी सर्वसाधारणपणे 500 रुपयांपासून ते 4 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. एमएमआर लस देण्यासाठी जवळपास 500 रुपये खर्च येतो, तर सिन्फ्लोरिक्स (पीसीव्ही) व गार्डसिल या लस देण्यासाठी 2 ते 3 हजार रुपये खर्च येतो.