Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Card Payment: क्रेडिट कार्डचं बिल थकवलं तर 'या' परिणामांना रहा तयार

Credit card payment

Image Source : Credit card payment

तुम्ही जर क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास सतत दिरंगाई करत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. याचा परिणाम तुमच्या आर्थिक निर्णयांवर होऊ शकतो. प्लास्टिक मनीचा वापर सोपा झाला असला तरी त्याचे दुष्परिणामही आहेत. क्रेडिट कार्डचे बिल थकवल्याचे काय परिणाम होऊ शकतात. हे या लेखात पाहू.

Credit Card Payment: प्लास्टिक मनीचा वापर भारतात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खिशात पैसे नसतानाही तुम्ही पाहिजे ती शॉपिंग करू शकता. क्रेडिट कार्ड अडचणीच्या काळात अनेकांच्या उपयोगी येते. तसेच बँकांकडूनही नोकरदारांना, व्यावसायिकांना क्रेडिट कार्ड विकण्यासाठी चढाओढ लागलेली असते. (Delay in Credit card payment) दिवसांतून दोन-तीन वेळा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कॉल सेंटरचे फोन येतात. अनेकांकडे तर चार पाच बँकांचे क्रेडिट कार्ड असतात. मात्र, जेव्हा क्रेडिट कार्डचे बील भरण्याची वेळ येते तेव्हा अनेकजण दिरंगाई करताना दिसतात.

क्रेडिट कार्डचा वापर केल्यानंतर काहीजण बिल भरत नाहीत. मग बँकेकडून सारखे फोन येणं सुरू होतात. या पलीकडे जाऊन काहीजण सर्व पुरावेच नष्ट करून उडवाउडवीची उत्तरे देतात. मात्र, त्यांना हे माहिती नसतं, की बँकेकडे त्यांची पॅनकार्ड आणि इतर सर्व कागदपत्रे आहेत. त्याचा परिणाम तुमच्या पुढच्या आर्थिक निर्णयावर होईल. त्यामुळे कधीही वेळेवर क्रेडिट कार्डचे बिल भरणे योग्य आहे. (Credit card payment) अन्यथा तुम्हाला भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. बिल थकवल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात. ते आपण या लेखात पाहू.

1) जर तुम्ही क्रेडिट कार्डचे पेमेंट थकवले तर तुम्हाला विलंब शुल्क म्हणजेच लेट फी भरावी लागते. अनेक बँकांकडून एक दिवस जरी बिल पे करण्यास उशीर झाला तरी मोठी लेट फी आकारण्यात येते. जर तुम्ही कायमच बिल थकवत असाल तर ही लेट फी मोठी असू शकते. बिलाची रक्कम जेवढी जास्त तेवढी लेट फी जास्त, हे सोपे गणित आहे.

2) क्रेडिट स्कोरवर परिणाम - जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल थकवत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो. हा नेगेटिव्ह स्कोअर सात वर्षांपर्यंत तुमच्या रिपोर्टमध्ये दिसत राहील. त्यामुळे भविष्यात तुम्हाला कर्ज घेण्यासोबतच इतरही बँकिंग सुविधा मिळवण्यात अडचणी येतील. कारण, बँका कर्ज देण्यापूर्वी क्रेडिट स्कोअर तपासतात.

3) चढे व्याजदर - तुम्ही क्रेडिट कार्डची जी रक्कम थकवता, त्यावर बँकांकडून व्याजही आकारले जाते. त्यामुळे जर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी बिल थकवत असाल तर तुम्हाला चढ्या व्याजदराने आकारलेली एकूण रक्कम माघारी करावी लागेल.

4) तुम्ही जर क्रेडिट कार्डचे बिल थकवले असेल तर तुम्हाला बँकेकडून सतत फोन येऊ शकतात. त्यातून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. बँकाकडून बिल भरण्यासाठी तगादा लावण्यात येतो. यात तुमची बरीच शक्ती वाया जाऊ शकते. अनेक जण बँकांची फोन उचलत नाहीत. मात्र, बँकेत दिलेल्या पर्यायी क्रमांकावर किंवा तुमच्या नातेवाईकांच्या क्रमांकावर फोन करुनही बँक तुमचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करते.

5) तुम्ही जर सतत क्रेडिट कार्ड बिल थकवत असाल तर त्यातून तुमची आर्थिक स्थिती दिसून येते. तुमची खराब क्रेडिट हिस्ट्री पाहून कोणतीही आर्थिक संस्था तुम्हाला भविष्यात कर्ज देणार नाही. वाहन कर्ज, गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज अडचणीच्या वेळी कामाला येते. मात्र, जर तुमची क्रेडिट हिस्ट्री खराब असेल तर बँक लोन देणार नाही.

6) कायदेशीर कारवाईची शक्यता- जर तुमचे क्रेडिट कार्डचे बिल जास्त असेल तर बँक किंवा ज्या संस्थेकडून तुम्ही क्रेडिट कार्ड घेतले असेल ती तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकते. शुल्क आणि पेमेंट वसुलीसाठी न्यायालयाकडून बँक आदेश मिळवू शकते. ही कायदेशीर नोटीस तुमच्या घरीसुद्धा येते. बिल थकवून सतत उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्यांवर बँक कायदेशीर कारवाई करण्याचे पाऊल उचलते.

7) क्रेडिट स्कोअर तुमची आर्थिक स्थिती दाखवतो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा कमी असल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. पूर्वी कर्ज फेडण्यास किंवा वेळेवर पेमेंट करण्यास तुम्ही दिरंगाई केल्याचे यातून सूचित होते. यातून तुमची पत खराब होते. जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा पैसे जर बँकेकडून मिळावे असे वाटत असेल तर क्रेडिट कार्ड बिल भरण्यास दिरंगाई करू नका.