सध्या पावसाळा सुरु झाला आहे. सगळीकडे श्रावणाच्या आगमनाची चाहुल लागली आहे. याच महिन्यात सगळीकडे वृक्षारोपणाचा हंगाम देखील सुरु होतो. तुम्ही देखील असाच काही वृक्षारोपण कार्यक्रमाचा विचार करत असाल आणि त्यासाठी झाडे, रोप आणायचे कुठून हा प्रश्न जर तुम्हांला सतावत असेल तर ही बातमी जरूर वाचा. तुम्हांला महाराष्ट्र सरकारकडून अल्पदरात आणि मोफत अशी काही झाडे मिळू शकतात. काय म्हणता, विश्वास बसत नाहीये? अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
महाराष्ट्र सरकारच्या वन रोपवाटिकेतून मोफत रोपे मिळवणे व त्याचे रोपण करणे हा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्वाचा विषय आहे. महाराष्ट्र सरकारच्या नर्सरीमधून मोफत रोपे कशी मिळवायची याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
Table of contents [Show]
परिसरानुसार रोपाची निवड
तुम्ही ज्या परिसरात वृक्षारोपण करायचा विचार करत आहात त्यासाठी आवश्यक असलेल्या वनस्पतींचे प्रकार आधीच ठरवून ठेवा. म्हणजे पाणथळ जागेत, अवर्षणप्रवण क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली जातात. परिसरानुसार झाडांची निवड करा. तुमच्या प्रदेशातील हवामान आणि मातीच्या परिस्थितीसाठी योग्य असलेल्या विशिष्ट झाडांची यादी काढा.
स्थानिक वन विभागाशी संपर्क साधा
तुमच्या स्थानिक वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधा. तुम्ही करत असलेल्या उपक्रमांची त्यांना माहिती द्या. एक लेखी पत्र त्यांना द्या आणि कोणकोणती झाडे तुम्हांला हवी आहेत याची यादी आणि संख्या देखील त्यांना कळवा. तसेच तुम्ही कुठे वृक्षारोपण करणार आहात ताची देखील माहिती त्यांना द्या.
वन विभाग तुमच्या अर्जावर विचार करतील आणि हा अर्ज एकदा मंजूर झाल्यानंतर, ते तुम्हाला पुढील सूचना आणि रोप कधी उपलब्ध होतील याची माहिती देतील.
अत्यल्प किंमतीत रोपे
सामाजिक वनीकरण नावाने महाराष्ट्रात वृक्षरोपणाची एक मोहीम चालवली जाते. आपापल्या परिसरात झाडांची लागवड करणाऱ्या संस्था, संघटना, ग्रामपंचायत आणि नगरपालिकांना या मोहिमेअंतर्गत मोफत रोप दिले जातात. मात्र सगळीच रोपे मोफत दिली जात नाही.
ज्या रोपांची निगा राखण्यासाठी, देखभाल करण्यासाठी वन विभागाला खर्च आलेला असतो ती झाडे 5-10 रुपये प्रति नग या दराने विक्रीसाठी उपलब्ध असतात. यात आंबा, बांबू व इतर फळझाडांचा समावेश आहे. व्यावसायिक वापरासाठी किंवा खाजगी वापरासाठी वन विभागाकडून कुणालाही झाडे दिली जात नाही.
नर्सरीमधून रोप नेण्याची जबाबदारी ही तुमचीच असेल हे लक्षात घ्या. त्यासाठीचा वाहतूक खर्च तुम्हालाच करायचा आहे, तेव्हा हा वाहतूक खर्च तुमच्या बजेटमध्ये सेट करून घ्या.
वन विभागाकडून पाठपुरावा
तुम्ही केलेल्या वृक्षारोपणाची माहिती तुम्हांला वन विभागाला द्यावी लागते. तसेच ज्या दिवशी वृक्षारोपण करणार असाल त्यादिवशी वन विभागाला देखील निमंत्रण द्यायला हवे. यामुळे व्यवहारातील पारदर्शकता दिसेल आणि वन विभागाला देखील तुमच्या कामाविषयी आणि भूमिकेविषयी आस्था निर्माण होईल. भविष्यात या सगळ्या गोष्टी कामी येतील. वन विभाग तुम्हाला वृक्षारोपण संबंधी कागदपत्रे किंवा लागवड केलेल्या रोपांच्या प्रगतीबद्दल वेळोवेळी अपडेट देण्यास सांगू शकतात.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या विशिष्ट धोरणांनुसार मोफत झाडे द्यायची किंवा नाही याबाबत निर्णय बदलला जावू शकतो. रोपांच्या उपलब्धतेनुसार देखील यात बदल होऊ शकतात. त्यामुळे थेट नजीकच्या वन विभागाच्या नर्सरीशी संपर्क करावा आणि माहिती घ्यावी.