जीवनशैलीत वेगाने होत असलेले बदल खर्चाचे नवनवीन पर्याय आपल्यासमोर मांडत असतात. गेल्या काही वर्षात झालेल्या बदलांमुळे वाढीव खर्च होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. आज आपण काही सवयींबाबत जाणून घेणार आहोत. ज्या अवाजवी खर्चावर नियंत्रण मिळवून तुमच्या खिशासाठी फायदेशीर ठरतील.
खर्च व उत्पन्न यात समतोल साधण्यात अनेकांचे आयुष्य निघून जाते. तुलनात्मक जीवनशैलीमुळे इच्छा नसतानादेखील आपल्याला काही गोष्टी खरेदी कराव्या लागतात. यामुळे आपले आर्थिक गणित बिघडते. आपल्यातील प्रत्येकाच्या दैनंदिन गरजा कालांतराने बदलत असतात. यामुळे वाढता खर्च लक्षात घेऊन आपण वेळीच बचतीची सवय लावणे गरजेचे आहे.
नियोजन करून खर्च करणे
मासिक उत्पन्नानुसार आपण खर्चाचे नियोजन करणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजन न करता खर्च केल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक लोक पैसे कामावण्याआधीच ते खर्च करतात. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून लोक सहज खरेदी करतात ही अतिशय चुकीची सवय आहे. यामुळे संपूर्ण आर्थिक नियोजन करून खर्च करावा जेणेकरून तुम्हाला पैशांची चणचण भासणार नाही.
जाहिरातीला बळी पडू नका
सोशल मिडियामुळे डिजिटल मार्केटिंगचे प्रमाण वाढले आहे. यामाध्यमातून जाहिरातींचा भडिमार केला जातो. सतत वस्तुचे मार्केटिंग करून तुम्हाला ते खरेदी करण्यास कंपन्या प्रवृत्त करतात अनेकवेळी आपण बचत व किमतीशी तडजोड करून वस्तू विकत घेतो. मात्र नंतर आपल्या लक्षात येते की ही वस्तू आपल्या विशेष उपयोगाची नाही. यामुळे जाहिरात बघून वस्तू खरेदी करणे अत्यंत चुकीचे ठरू शकते.
खरेदीचा विचार आल्यास थोडे थांबा
अनेकदा एखादी वस्तू खरेदी करण्याची आपल्याला घाई झालेली असते. आपण योग्य संशोधन न करता ती खरेदी करण्याचा निर्णय घेतो. ती खरेदी केल्यानंतर त्या वस्तुचे फायदे-तोटे जाणून घेईपर्यंत उशीर झालेला असतो. त्यामुळे एखाद्या वस्तुची खरेदी करण्याचा विचार मनात आल्यास थोडे थांबा, विचार करा आणि गरज असेल तरच खरेदी करा.
कुठलाही खर्च करताना योग्य नियोजन व आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. चैनीच्या किंवा सोयीसुविधेच्या वस्तु खरेदी करताना आपण अनेक जीवनावश्यक वस्तुंकडे दुर्लक्ष करत असतो. भविष्याच्या दृष्टीने पैसे बचतीचे गांभीर्य समजणे गरजेचे आहे. दर महिन्याला आपण ठराविक रकमेची बचत करून खर्चाला लगाम घालू शकतो.