म्युच्युअल फंडांत एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये एसआयपीमधून 13306 कोटींची विक्रमी गुंतवणूक झाली होती. मात्र बँक खात्यात पुरेशी रक्कम नसेल तर एसआयपी बाउन्स होणऊ शकतो, सलग तीन महिने एसआयपी बाउन्स झाल्यास गुंतवणूक रद्द होऊ शकते.
सलग तीन महिने एसआयपीमधून गुंतवणूक झाली नाही तर फंड कंपनी एसआयपी रद्द करते. यावर फंड कंपनीकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र ज्या बँकेतून एसआयपीसाठी दर महिन्याला पैसे वजा होतात ती बँक गुंतवणूकदाराला दंडात्मक शुल्काची आकारणी करु शकते. दंडाची रक्कम बँकेनिहाय वेगवेगळी असू शकते. एसआयपी पुन्हा सुरु करण्यासाठी गुंतवणूकदाराने फंड कंपनीला संपर्क करणे आवश्यक आहे. तुम्ही सलग पाच ते सहा महिने एसआयपीमध्ये गुंतवणूक थांबवू शकता आणि नंतर पुन्हा सुरु करु शकता. काही फंड कंपन्या अशा प्रकारची सुविधा देतात.
अनेक गुंतवणूकदारांना सातत्याने परतावा मिळावा असे वाटते. हे गुंतवणूकदार भूतकाळातील कामगिरीच्या आधारावर एसआयपी सुरू करतात मात्र अल्पावधीत एसआयपी गुंतवणुकीत नुकसान झाले तर ते बाहेर पडतात. गुंतवणूकदारांनी इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एसआयपीला कधीही 'नोटा लॉस' साधन मानू नये. तोट्यावर मात करण्याचा आणि संपत्ती निर्माण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमचा पैसा कंपाऊंड करण्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे.
गुंतवणूकदार अल्पवधीतील त्यांच्या SIP कामगिरीची तुलना इतर मालमत्तेशी करतात. त्यांची फंड योजना इतर योजनांच्या तुलनेत खराब कामगिरी करत असेल तर बहुतांश गुंतवणूकदार त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात. मात्र याउलट गुंतवणूकदारांनी आणखी काहीकाळ संयम बाळगून इक्विटीमधील गुंतवणूक चालू ठेवल्यास फायदा होऊ शकतो. गुंतवणूकदारांनी त्यांनी आखलेली आर्थिक उद्दिष्टे आणि त्यांच्या गुंतवणूक योजनांचा नियमित आढावा घेणे आवश्यक आहे. यात वाढलेल्या उत्पन्नाच्या अनुषंगाने, गुंतवणूकदारांनी एसआयपीमधील रक्कम देखील वाढवली तर दिर्घ कालावधील एक चांगली रक्कम जमा होईल.