प्रस्तावित विलीनीकरणाच्या (Merger) अंतर्गत, आयडीएफसी लिमिटेडच्या भागधारकांना आयडीएफसीमध्ये असलेल्या प्रत्येक 100 समभागांमागे आयडीएफसी फर्स्ट बँकेचे 155 शेअर्स मिळणार आहेत. सोमवारी दिलेल्या एक्स्चेंज फाइलिंगमध्ये, आयडीएफसी फर्स्ट बँकेनं याबद्दल सांगितलं. बँकेच्या संचालक मंडळानं आयडीएफसी लिमिटेड आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांच्यातल्या करारास (Deal) मान्यता दिली आहे. यानुसार प्रस्तावित व्यवहाराची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, हे विलीनीकरण या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Table of contents [Show]
नियामक प्राधिकरणाच्या मंजुरी अद्याप नाही
या विलीनीकरणासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) परवानगी घेणं गरजेचं आहे. याशिवाय सेबी, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, स्टॉक एक्स्चेंज तसंच बीएसई, एनएसई आणि इतर नियामक प्राधिकरणं अशा सर्वांची मंजुरी घेणं आवश्यक ठरणार आहे.
शेअर होल्डिंगमध्ये बदल?
आयडीएफसी लिमिटेडकडे आयडीएफसी फायनान्शियल होल्डिंगद्वारे आयडीएफसी फर्स्ट बँकेत 40 टक्के हिस्सा आहे. आयडीएफसी ही 100 टक्के म्हणजेच पूर्णपणे सार्वजनिक कंपनी आहे. या विलीनीकरणानंतर, आयडीएफसी फर्स्ट बँकेतील आयडीएफसी लिमिटेडचे स्टेकहोल्डिंग संपुष्टात येणार आहे.
HDFC twins to #IDFC First Bank IDFC merger: What #IndiaInc may expect to achieve
— Mint (@livemint) July 4, 2023
Read here: https://t.co/n1u8Ejre5G pic.twitter.com/QeSUj7EK5f
दोन्हींची एकूण मालमत्ता?
मार्च 2023च्या अखेरपर्यंत आयडीएफसी फर्स्ट बँकेची एकूण मालमत्ता 2.4 लाख कोटी रुपये इतकी होती. तिची उलाढाल 27,194.51 कोटी रुपये इतकी होती. आर्थिक वर्ष 2023मध्ये बँकेचा निव्वळ नफा 2437.13 कोटी रुपये होता. दुसरीकडे, आयडीएफसी लिमिटेडची एकूण मालमत्ता 9,570.64 कोटी रुपये होती तर तिची उलाढाल 2,076 कोटी रुपये इतकी होती.
आयडीएफसीच्या शेअर्समध्ये तेजी
शेअर बाजारात आयडीएफसीच्या शेअरनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. आयडीएफसीचा शेअर सोमवारी (3 जुलै) 6.3 टक्क्यांनी वाढून 109.20 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता. दुसरीकडे, आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर 3 टक्क्यांच्या वाढीसह 81.95 रुपये प्रति शेअरवर व्यवहार बंद करण्यात यशस्वी झाला.