Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गृहकर्ज महागले, ICICI बँकेने चार महिन्यांत चौथ्यांदा कर्जदर वाढवला

Home Loan

ICICI Bank Hike MCLR: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून व्याजदर वाढवले जात आहेत. बँकांनी कर्जदरात आणि ठेवीदरात वाढ केली आहे. बहुतांश बँकांची कर्जे महागल्याने ग्राहकांना घर खरेदीसाठी, वाहन खरेदीसाठी कर्ज घेताना दोनदा विचार करावा लागेल.

खासगी क्षेत्रातील ICICI बँकेने कर्जदरात वाढ केली आहे. ICICI बँकेने MCLR दरात 0.10% वाढ केली आहे. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज अशी बँकेची सर्वच प्रकारची कर्जे महाग झाली आहेत.1 सप्टेंबर 2022 पासून नवीन व्याजदर लागू झाले आहेत. (ICIC Bank Hike MCLR Rate by 10 bps)

मागील चार महिन्यांत सलग चौथ्यांदा बँकेने कर्जाचा दर वाढवला आहे. यामुळे नव्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आता जादा व्याजदराने कर्ज घ्यावे लागेल. त्याशिवाय विद्यमान कर्जदाराना आता मासिक हप्त्यासाठी जादा तरतूद करावी लागेल. यापूर्वी बँकेने जून, जुलै आणि ऑगस्ट असे सलग तीन महिने कर्जदरात वाढ केली होती. ऑगस्टमध्ये बँकेने कर्जाचा दर 0.15% वाढवला होता.

बँकेच्या वेबसाईटनुसार एक रात्र आणि एक महिने या मुदतीसाठीचा मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट (MCLR) 7.75% इतका वाढला आहे. याआधी तो 7.65% इतका होता. तीन महिन्यांसाठी तो 7.80%, सहा महिन्यांसाठी 7.95% आणि एक वर्षासाठी तो 8.00%  इतका झाला आहे.

कालावधी

MCLR

एका रात्रीसाठी

7.75 %

एक महिना

7.75 %

तीन महिने

7.80 %

सहा महिने

7.95 %

एक वर्ष

8.00 %

मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट हा अंतर्गत कर्जदर असून तो रिझर्व्ह बँकेच्या मुख्य व्याजदरानुसार ठरवला जातो, असे ICICI बँकेनं म्हटलं आहे. मागील एक वर्षात आयसीआयसीआय बँकेने MCLR दरात चार वेळा वाढ केली आहे. ऑगस्ट महिन्यात तो 7.90% होता. जुलै महिन्यात तो 7.75% आणि जूनमध्ये तो 7.55 % इतका होता. याच काळात रिझर्व्ह बँकेने देखील रेपो दरात वाढ केली होती. महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50% वाढ केली होती. आरबीआयचा रेपो दर 5.40% इतका वाढला आहे.

MCLR म्हणजे काय?

मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस लेंडिंग रेट (MCLR) हा बॅंकांचा किमान कर्ज दर आहे. या दरापेक्षा कमी दराने बॅंकांना कर्ज देण्याची परवानगी नाही. एमसीएलआर या नवीन प्रणालीमुळे व्यावसायिक बॅंकांसाठी कर्जाचे दर निश्चित करण्याची पद्धत बदलली. आरबीआयने (RBI) 1 एप्रिल, 2016 रोजी MCLR ही प्रणाली लागू केली. बॅंका कर्जावर किती व्याजदर आकारू शकतात, हे निर्धारित करण्यासाठी ही प्रणाली ठरवण्यात आली.