Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

General Motors Plant: जनलर मोटर्सचा पुण्यातील प्लांट ह्युंदाईच्या ताब्यात; GM कामगार संघटनेचा लढा अद्यापही सुरूच

General Motors pune plant

Image Source : www.citypng.com/ www.motorbeam.com

जनरल मोटर्सचा पुण्यातील तळेगाव येथील प्रकल्प ह्युंदाई मोटर्सने खरेदी केला. या व्यवहारावर आज (बुधवार) शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, जनरल मोटर्सची कामगार संघटना अद्यापही हक्कासाठी लढत आहे.

General Motors Plant: अमेरिकेतील बलाढ्य वाहन निर्मिती कंपनी जनरल मोटर्सने 2017 साली भारतीय बाजारपेठेतून माघार घेतली. तेव्हापासून पुण्यातील तळेगाव येथील प्रकल्प बंद होता. मात्र, आता हा प्रकल्प ह्युंदाई मोटर्सने विकत घेतला आहे. प्रकल्पाची इमारत, जमीन आणि काही मशिनरीचा या व्यवहारात समावेश आहे.

जनरल मोटर्स प्रकल्प बंद झाल्यानंतर कंपनीचा कामगार युनियन सोबत न्यायालयीन वादही सुरू आहे. अद्याप यावर तोडगा निघाला नाही. कंपनीने प्रकल्प बंद केल्यानंतर कामगारांना योग्य आर्थिक मोबदला दिला नाही, असा आरोप केला आहे. यासंबंधी महामनीने वृत्त दिले होते.

जनरल मोटर्सच्या कामगारांची मागणी काय?

2017 साली जनरल मोटर्सचा प्लांट बंद झाल्यानंतर अडीच हजारांपेक्षा जास्त कामगारांच्या हाताचे काम गेले. कंपनीने कामगारांना चांगले पॅकेज द्यावे किंवा प्रकल्प ज्या कंपनीस विक्री कराल त्या कंपनीत नोकरीवर घ्यावे, अशी मागणी केली होती. प्रकल्प इतर कंपनीला विकताना तसा करारात समावेश करावा अशी कामगारांची मागणी होती. मात्र, तसे झाले नाही. 

हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहचले आहे. मात्र, अद्याप तोडगा निघाला नाही. जनरल मोटर्सच्या एकूण कामगारांपेकी सुमारे एक हजार पूर्णवेळ (परमनंट) कामगार होते. त्यांची संघटना अद्यापही न्यायासाठी लढत आहे, असे जनरल मोटर्सच्या एका माजी कर्मचाऱ्याने महामनीशी बोलताना सांगितले.

ह्युंदाई मोटर्सच्या व्यवस्थापकीय संचालक उनसो किम यांच्या उपस्थितीत हरियाणातील गुरगाव येथे खरेदी करारावर सह्या झाल्या. ह्युंदाई मोटर्स तळेगाव येथील प्रकल्पातून इलेक्ट्रिक वाहनांचीही निर्मिती करणार आहे. वार्षिक 10 लाख गाड्यांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जनरल मोटर्सचा प्रकल्प विकत घेतला आहे. 

जगातील टॉप 3 ऑटोमोबाइल मार्केटपैकी भारत एक आहे. (Hyundai and General Motors deal) मागील वर्षी ह्युंदाई कंपनीने भारतात 552,511 गाड्यांची विक्री केली. वाहन विक्रीतील कंपनीचा वाटा 14.5 टक्के आहे. यात आणखी वाढ करण्यासाठी निर्मिती क्षमता वाढवण्यात ते आहे. तामिळनाडूतही ह्युंदाईचा वाहन निर्मिती प्रकल्प आहे. 

तळेगाव प्रकल्पातून किती गाड्यांची निर्मिती होणार

जनरल मोटर्सच्या तळेगाव येथील प्रकल्पातून दरवर्षी 1 लाख 30 हजार गाड्या तयार होऊ शकतात. हा प्रकल्प विक्री करण्यासाठी कंपनी योग्य खरेदीदार मागील काही वर्षांपासून शोधत होती. मात्र, चांगली किंमत मिळत नसल्याने व्यवहार झाला नाही. दरम्यान, या व्यवहाराचे मूल्य समजू शकले नाही.