म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक (Investment in Mutual Fund) केली की, तुमची जबाबदारी संपली असे म्हणणे चुकीचे ठरू शकते. गुंतवणुक केली की, वेळोवेळी तिचा आढावा घेणं तितकेच गरजेचं आहे. बहुतांश जण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा एखादा फंड निवडण्यापूर्वी सल्ला घेतात, माहिती घेतात आणि यासाठी विशेष मेहनत घेतात. पण एकदा का गुंतवणूक झाली की, ते त्याच्याबद्दल अधिक माहिती घेणं सोडून देतात.
म्युच्युअल फंडच्या कामगिरीचा आढावा का घ्यावा!
'भूतकाळातील कामगिरी फंडाची भविष्यातील कामगिरी दर्शवत नाही', असा डिस्क्लेमर तुम्ही बऱ्याचवेळा पाहिला असेल. याचा अर्थ तुम्ही गुंतवणुकीच्या खात्रीशीर परताव्याची अपेक्षा करू शकत नाही. म्हणून, म्युच्युअल फंडाचे मूल्यांकन करण्यासाठी, तुम्हाला मागील वर्षांच्या परताव्याच्या पलीकडे पाहणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे; जेणेकरून तुम्ही माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला अधिक परतावा मिळू शकतो.
साधारणत: देशाची आर्थिक परिस्थिती बदलत असताना किंवा मोठे आर्थिक बदल होत असताना भांडवली बाजारात चढ-उतार होत असतात, हे तुम्हाला माहितच आहे. असे बदल तुमच्या पोर्टफोलिओच्या अपेक्षित परताव्यात अडथळे ठरू शकतात. उदाहरणार्थ, मार्केटमध्ये आलेल्या एका रॅलीमुळे इक्विटी आणि डेब्टमध्ये सुरूवातीला असलेले 50:50 चे प्रमाण नंतर 60:40 असे बदलू शकते. अशावेळी तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गरजेनुसार बदल करणे अपेक्षित आहे.
तुमच्या पोर्टफोलिओमधील फंडाचे वेळोवेळी मूल्यमापन केल्यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या कामगिरीची इतर फंडांशी तुलना करता येऊ शकते. या मूल्यमापनामुळे तुम्हाला फंड मॅनेजरने केलेले विविध बदलांमुळे किंवा तुमच्या फंडाच्या मूलभूत वैशिष्ट्यांमुळे गुंतवणुकीवर परिणाम होत आहेत, याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. म्हणून पोर्टफोलिओमधील जोखीम टाळण्यासाठी किंवा परताव्याची शक्यता अधिक वाढवण्यासाठी वेळोवेळी म्युच्युअल फंडाचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे.
म्युच्युअल फंडाच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे 6 मार्ग
म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या कामगिरीचे अनेक मार्गांनी मूल्यांकन करता येऊ शकते. आज आपण निवडक 6 मार्गांचा अवलंब कसा करायचा हे पाहणार आहोत.
1. फंड फॅक्ट शीट (Fund Fact Sheet)
फंड फॅक्ट शीट हा असा एक माहितीपूर्ण दस्तऐवज आहे; ज्यामध्ये प्रत्येक म्युच्युअल फंड हाऊसच्या विविध योजनांची माहिती असते. फंड हाऊस प्रत्येक महिन्याला अशी शीट प्रसिद्ध करत असते. ही शीट वाचण्यासाठी खूपच सोपी असते. यामध्ये योजनेचा परफॉर्मन्स दिलेला असतो. जसे की वर्षिक वाढ किती आणि कशी झाली. तुम्ही गुंतवलेले पैसे कंपनीने कुठे गुंतवले आहेत. तसेच प्रत्येक सेक्टरमध्ये प्रत्यक्ष किती गुंतवणूक केली आहे, याची इत्यंभूत माहिती यात दिलेली असते.
2. अल्फा रेशो (Alfa Ratio)
अल्फा रेशोद्वारे फंड मॅनेजरचे या योजनेबाबत धोरण काय आहे आणि यापूर्वी त्याची कामगिरी कशी राहिली आहे, याची माहिती यात असते. ती नेहमी फंडाच्या खर्चाच्या गुणोत्तरापेक्षा अधिक असावी. याशिवाय, तुमच्या फंडचा अल्फा हा बीटापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
3. खर्चाचे प्रमाण (Expense Ratio)
प्रत्येक फंड हाऊस हा तुमचा म्युच्युअल फंड व्यवस्थापित करण्यासाठी एक शुल्क तुमच्याकडून आकारत असते. हे खर्चाचे प्रमाण तुमच्या फंडाच्या पैशाचे मूल्य अधोरेखित करत असते. या फंड व्यवस्थापन शुल्कामध्ये इतर सर्व व्यवस्थापन खर्चाचा समावेश असतो आणि याचा परिणाम तुम्हाला मिळणाऱ्या फायनल पेमेंटवर होत असतो.
4. बेंचमार्क (Benchmark)
कोणत्याही फंडाच्या कामगिरीची किंवा कार्यक्षमतेची त्याच्या बेंचमार्कशी तुलना करणे आवश्यक असते. हे बेंचमार्क म्युच्युअल फंडासाठी परफॉर्मन्स स्टॅण्डर्ड म्हणून काम करत असतात. जर तुमच्या फंडाने बेंचमार्क मागे टाकला असेल, तर तुमचा फंड चांगली कामगिरी करत आहे, असे तुम्ही समजू शकता. तुम्ही एक विशिष्ट कालावधील घेऊन सेम कॅटेगरीतील दुसऱ्या फंडातून मिळणाऱ्या परताव्याची तुलना करू शकता.
5. पोर्टफोलिओ होल्डिंग्ज (Portfolio Holdings)
पोर्टफोलिओमधील फंडांमध्ये होणारे बदल लक्ष्यपूर्वक पाहत जा. त्यात होणारे महत्त्वपूर्ण बदलांची नोंद घ्या. फंडाने गुंतवणूक केलेले शेअर्स चांगले आहेत का? त्यांनी गुंतवलेल्या रकमेच सकारात्मक वाढ होत आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. तसेच फंड मॅनेजरने गुंतवलेली रक्कम त्या उद्दिष्टानुसार होत आहे की, नाही याची खात्री करा.
6. शार्प गुणोत्तर (Sharpe Ratio)
तुम्ही घेतलेल्या अतिरिक्त जोखमींतून तुम्हाला किती परतावा मिळी शकतो, याचे प्रमाण शार्प गुणोत्तर दाखवत असते. अधिक जोखमीसाठी अधिक भरपाई, हा जगजाहीर असा नियम आहे. यातून तुम्हाला अतिरिक्त परतावा देखील मिळू शकतो. हा परतावा नेमका किती असेल, हे शार्प रेशो सांगते.
कोणत्याही गुंतवणुकीची कामगिरी तपासण्याचे अनेक पैलू असतात. पण ते लागू करण्यापूर्वी विशेषत: म्युच्युअल फंडसाठी तुम्हाला किमान 6 महिने वेळ द्यायला पाहिजे, असे सल्लागार सांगतात. म्युच्युअल फंड योजनेच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी एक महिना किंवा तीन महिने हा कालावधी खूप लवकर ठरू शकतो. म्युच्युअल फंडाचे मूल्य दाखवण्यासाठी आणि गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्याला थोडा वेळ दिला पाहिजे.