आजकाल प्रत्येकाच्या हाती मोबाईल (Mobile) आहे. हा मोबाईलदेखील साधा नाही, तर स्मार्टफोन (Smartphones)... मोठ्या स्क्रीनचा हा मोबाईल झोपेची वेळ वगळता दिवसभर लोकांच्या हाती असतो. त्यामुळे मोबाईल इंडस्ट्री वरचेवर वाढत चालली आहे. अशावेळी मोबाईलशी संबंधित व्यवसायही चांगले पैसे मिळवून देऊ शकतात. असाच एक व्यवसाय आहे; मोबाईल बॅक कव्हर प्रिंटिंगचा (Mobile cover printing). मोबाईलची विक्री ज्या प्रमाणात होते, त्या प्रमाणात किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रमाणात मोबाईलचे कव्हर विकले जातात.
साहित्य काय?
मोबाईलचे विविध कंपन्यांचे विविध स्टायलिश मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत. अनेकांना आपल्या मोबाईलला आकर्षक कव्हर बसवायचे असते. म्हणजे आपला मोबाईल अधिक चांगला वाटावा. त्यासाठी प्रिंटेड कव्हर्सना मोठी मागणी आहे. अशा या व्यवसायासाठी तुम्हाला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप, सब्लिमेशन मशीन, सब्लिमेशन पेपर असं काही प्राथमिक साहित्य लागेल. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप नसेल तर मोबाईलवरही हे काम करता येऊ शकतं.
जागेचा खर्च असा वाचवा
या व्यवसायासाठी वर सांगितलेल्या मशीनव्यतिरिक्त कच्चा माल, कागद आणि इतर काही साहित्य अंदाजे 60 ते 65 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध होते. तुमचे बजेट कमी असेल तर छोट्या मशीनपासून आधी सुरुवात करावी लागते. मशीनची किंमत साधारणपणे 15,000 रुपयांपासून सुरू होते. 3 ते 4 मोबाईल एकावेळी प्रिंट होऊ शकतात. हे कव्हर प्रिंट होण्यासाठी अंदाजे 10 मिनिटे वेळ लागू शकतो. यानुसार तुम्ही किती मोबाईल कव्हरचे प्रिंट करू शकता, याचा अंदाज बांधा.
व्यवसाय कसा वाढवणार?
सुरुवातीला छोट्या स्वरुपात हा व्यवसाय सुरू करता येईल. अधिक नफा मिळायला लागल्यानंतर कामात अधिक सुधारणा करता येईल. तुम्ही तयार केलेले हे कव्हर्स विकण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म गरजेचा आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे हा व्यवसाय करता येणार आहे. ऑनलाईन प्लॅटफर्मवर हा व्यवसाय करायचा असेल तर जागेचा खर्च वाचणार आहे. प्लॅटफॉर्मला मात्र त्यांचे कमिशन द्यावे लागेल. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, मिशो यासह इतर अनेक छोट्या-मोठ्या ऑनलाईन सर्व्हिसेसद्वारे याची विक्री करता येईल. तर दुसरीकडे, स्वत:चं शॉपदेखील सुरू करता येईल.