Mid-life Entrepreneurship: स्टार्टअप म्हटलं की डोळ्यासमोर नुकतेच कॉलेज पासआऊट झालेल्या विशीतील तरुणांनी सुरू केलेली कंपनी डोळ्यासमोर येते. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता स्टार्टअप सुरू करायचंय असं यंग जनरेशनचं वाक्य सर्रास कानावर पडते. मात्र, ज्यांना कॉलेजनंतर अनेक कारणांमुळे स्वत:चं स्टार्टअप सुरू करता आलं नाही. ते वयाच्या पस्तीशीतही स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात.
कॉलेज पासआऊट होऊन वयाच्या पस्तीशीत येऊपर्यंत जीवनात अनेक बदल झालेले असतात. (How to plan startup in your 35 age) लग्न होऊन कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक ओढतानही अनेकांची होते. तसेच गृहकर्ज, वाहनकर्ज, मुलांचे शिक्षण अशा गोष्टींसाठीही खर्च वाढलेला असताना स्टार्टअप सुरू करण्यासाठी पैसा कसा उभारणार. अचानक नोकरी सोडली तर मासिक खर्च कसा भागवणार. छोटा-मोठा उद्योग सुरू करून जर अपयश आले तर पुढे काय? अशा अनेक प्रश्नांमुळे अनेकजण व्यवसाय सुरू करत नाहीत. मात्र, या लेखात आपण काही जमेच्या बाजू पाहू. त्या तुम्हाला नक्कीची बळ देतील.
कामाचा अनुभव
कॉलेज पासआऊट झाल्यानंतर पस्तीशीत येऊपर्यंत दहा-ते बारा वर्षांचा सरासरी अनुभव गाठीशी असतोच. त्यामुळे एखाद्या फ्रेशरला कंपनी सुरू करताना जेवढ्या अडचणी येतील तेवढ्या तुम्हाला येणार नाहीत. दहा बारा वर्षांमध्ये तुम्ही अनेक प्रकारची कामे करून अनुभव समृद्ध झालेले असाल. अपयशही पाहिलेले असेल. कॉर्पोरेट कामाच्या अनुभवातून तुम्हाला विचारातील स्पष्टता येते. त्यामुळे अनुभव ही सकारात्मक बाब आहे. सध्या टेक्नॉलॉजीचे युग आहे. एखादी गोष्ट तुम्हाला येत नसेल तर अल्प कालावधीत तुम्ही ती शिकू शकता.
लोकांशी असलेला संपर्क
नोकरी करत असताना मार्केटिंग, सेल्स, फायनान्स, ऑपरेशन, बिझनेस प्रोसेसेस याबाबत तुम्हाला चांगली माहिती मिळालेली असते. तसेच विविध लोकांशी संपर्क वाढून स्वत:चे खास नेटवर्क तयार झालेले असते. हे नेटवर्क तुम्हाला स्वत: चा व्यवसाय सुरू करताना कामाला येईल. तुमच्या उद्योगाशी संबंधित कामे तुमच्या नेटवर्कमधील लोकांना कंत्राटी पद्धतीने देऊ शकता किंवा व्यवसायात त्यांना सब वेंडर म्हणून हायर करू शकता. लिंक्डइन, फेसबूक, ट्विटर अशा नेटवर्कचा वापर करून तुमचे नेटवर्क आणखी वाढवू शकता.
आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळताना
उद्योग व्यवसाय सुरू करताना कॅलक्युलेटेड रिस्क घ्यावी असे म्हणतात. त्यामुळे पस्तीशीत तुमच्यावर आर्थिक जबाबदाऱ्या असतील तरीही योग्य नियोजनाने तुम्ही व्यवसायासाठी पैसे उभारू शकता. जर गृहकर्ज किंवा इतर लोन असेल तर पस्तीशीत येईपर्यंत या कर्जाचा बोजा काही प्रमाणात कमी झालेला असू शकतो.
तसेच गुंतवणूकदार आणि वित्तीय संस्था मीड करिअर प्रोफेशनलला कर्ज देण्यास सहज तयार होतात. कारण, व्यवसाय सुरू करून पुढे नेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये एका फ्रेशरपेक्षा जास्त असते. जर तुम्ही भविष्यात स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल तर आर्थिक तयारीला आतापासूनच लागा. सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यापासून ध्येयानुसार गुंतवणूक (गोल बेस्ड इनव्हेस्टमेंट) सुरू करा.
बलस्थाने आणि कमकुवत बाजू माहिती असतात
नोकरी करत असताना मागील दहा बारा वर्षात तुम्हाला तुमच्या कामातील बलस्थाने आणि कमकुवत बाजू चांगल्या प्रकारे लक्षात आलेल्या असतात. त्यामुळे कोणत्या कामाची जबाबदारी स्वत: वर घ्यावी आणि कोणते काम दुसऱ्यांवर सोपवावे याचा अंदाज येतो. सेल्फ अवेअरनेस जास्त असल्याने अडचणीच्या काळातही तुम्ही सहज सोल्यूशन काढू शकता.
स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याआधी कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात
सखोल मार्केट रिसर्च करुन प्रतिस्पर्धी कंपन्या काय करत आहेत याचा अंदाज बांधा. त्यामुळे व्यवसायातील संधी आणि धोके लक्षात येतील.
बचत आणि किती पैसे उभारावे लागतील याचा अंदाज बांधा.
स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल याचा विचार करा. जर तुम्ही स्वत: टेक्निकल बॅकग्राऊंडचे नसाल तर दुसऱ्यांची मदत घ्या.
नवीन शिकण्याबरोबरच आधी शिकलेल्या काही गोष्टी सोडूनही द्यावा लागतात. या प्रक्रियेला लर्निंग आणि अनलर्निंग असे म्हणतात. स्टार्टअप सुरू करताना लवचिक विचारसरणी ठेवा. मग एकाच आयडियाला तुम्ही चिटकून बसणार नाहीत.