आपण आपले सोन्या-चांदीचे दागदागिने, अतिमहत्वाची कागदपत्रे, मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम इत्यादी मौल्यवान वस्तू चोरी-दरोडे यांसारख्या जोखमीपासून मुक्त ठेवण्याच्या हेतूने भक्कम तिजोरीमध्ये किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यास प्राधान्य देतो. याचप्रमाणे आपण वेळोवेळी घेतलेल्या विविध लाईफ किंवा इतरही इन्शुरन्स पॉलिसीज् डिजिटल स्वरूपामध्ये एकाच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक ड्रॉव्हरमध्ये एकत्र करून ठेवता येऊ शकतात. अशा डिजिटल खात्यांना "इलेक्ट्रॉनिक इन्शुरन्स अकाउंट" (e-IA) म्हणतात.
ज्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन खरेदी-विक्री केलेले विविध कंपन्यांचे सर्व समभाग "डिमॅट अकाउंट" या डिजिटल स्वरूपाच्या ठेवता येतात, त्याप्रमाणे IRDAI म्हणजे "विमा नियामक आणि विकास प्राधिकरण" या इन्शुरन्स क्षेत्रामधील सर्वोच्च नियामक संस्थेने पॉलिसीधारकाला त्याच्या विविध विमा पॉलिसीज् डिजिटल स्वरूपात एकाच इलेक्ट्रॉनिक खात्यामध्ये एकत्रित करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अर्थात या सुविधेचा वापर करून घेण्यासाठी प्रत्येक पॉलिसीधारकाचे स्वतःचे वैयक्तिक "e-IA" अर्थात इलेक्ट्रॉनिक इन्शुरन्स खाते "इन्शुरन्स रिपॉजिटरी" कडे (IR) ओपन करावे लागते. सद्यस्थितीमध्ये NSDL डेटाबेस मॅनेजमेंट लिमिटेड, सेंट्रल इन्शुरन्स रिपॉझिटरी लिमिटेड, कार्वी इन्शुरन्स रिपॉझिटरी लिमिटेड, CAMS रिपॉजिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ह्या ४ रिपॉझिटरीज् पॉलिसीचे डिजिटल रेकॉर्ड्स जतन करण्याचा “परवाना-प्राप्त (licenced) विमा भांडार” म्हणून कार्यरत आहेत.
तंत्रज्ञानाचा सर्वोच्च लाभ घेण्याचा मार्ग म्हणजे केवळ माहितीपुरते मर्यादित न राहता त्याचे व्यवहारातील उपयोजन (application) अनुभवणे. इ-इन्शुरन्स अकाउंट ओपन करणे हे सध्यातरी अनिवार्य केले गेले नसले तरी देखील ती अतिशय सोपी प्रक्रिया आहे.
- पॉलिसीधारकाला इलेक्ट्रॉनिक अकाउंटसाठी एक फॉर्म भरून द्यावा लागतो. हा फॉर्म इन्शुरन्स कंपनी किंवा इन्शुरन्स रिपॉझिटरीकडे उपलब्ध असतो.
- सोबत काही अगदी बेसिक डॉक्युमेंट्स सादर करावे लागतात - फोटो आयडी म्हणून PAN /आधार कार्ड कॉपी, अलीकडील फोटोग्राफ, बँक डिटेल्स म्हणून कॅन्सल केलेला चेक किंवा पासबुक कॉपी इत्यादी.
- कोणत्याही पॉलीसीधारकाला एक आणि एकच e-IA ओपन करता येणे शक्य असते. त्याने सादर केलेल्या डॉक्युमेंट्सच्या आधारे त्याला युनिक अकाउंट नंबर देण्यात येतो. सोबत त्याचा log-in ID आणि पासवर्ड पुरविण्यात येतो. तसेच इलेक्ट्रॉनिक अकाउंट ऑपरेट करावयाची पद्धत देखील देण्यात येते.
- नवीन पॉलिसी खरेदी करताना पॉलिसधारक तो पॉलिसी घेत असलेल्या इन्शुरन्स कंपनीसोबत टाय-अप केलेल्या इन्शुरन्स रिपझिटरीज् (IR) पैकी एक रिपॉझिटरीची निवड करू शकतो. त्याने निवडलेली रिपॉझिटरी त्याला इलेक्ट्रॉनिक अकाउंटची माहिती आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स देते.
- त्याने घेतलेल्या आणि भविष्यातील घेतल्या जाणाऱ्या सर्व पॉलिसीजची डॉक्युमेंट्स आणि इतर सर्व डेटा ती रिपॉझिटरी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जतन करते. तसेच ती इन्शुरन्स रिपॉझिटरी पॉलिसीधारकासाठी पॉलिसी सर्व्हिसिंग संदर्भात रिक्वेस्टही घेते.
- याव्यतिरिक्त पॉलिसीधारकाच्या विद्यमान भौतिक इन्शुरन्स पॉलिसी डॉक्युमेंट्सचे (physical copy) देखील इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये रूपांतर देखील करता येणे शक्य आहे. तसेच भविष्यातील पॉलिसीज् त्याला "ई-आयए"च्या माध्यमातून खरेदी करता येईल. ती पॉलिसी थेट इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्याच्या "डीमॅट" अर्थात “डिमटेरिअलाईझ” खात्यात जमा होईल.
सर्वात महत्वाचे म्हणजे, इलेक्ट्रॉनिक इन्शुरन्स अकाउंट करणे अगदी विनामूल्य सेवा आहे. आपल्याला रिपॉझिटरीकडे असलेल्या पॉलिसीज् सांभाळण्यासही कोणताही खर्च येत नाही. पॉलिसीचे विवरण देखील पॉलिसीधारकाच्या “ई-आयए”च्या माध्यमातून दिले जाते. एवढेच नव्हे तर, मोबाईल पोर्टेबिलिटी सुविधेप्रमाणे पॉलिसीधारकाला एका रिपॉझिटरीमधून दुसर्या रिपॉझिटरीमध्ये पॉलिसी रेकॉर्ड्स वर्ग करता येतात.