बाजारात व्यवहार करताना आपण नोटांचा सर्रास वापर करतो. तो करत असताना बऱ्याचवेळा खऱ्या नोटांसोबत बनावट नोटाही सहजपणे चलनात वापरल्या जातात. त्यावेळी आपल्याला त्याची कल्पनाही नसते. पण आपण जेव्हा बॅंकेत जातो किंवा जिथे नोटा तपासण्याची मशीन असते. तिथे गेल्यावर आपल्याला धक्का बसतो की, आपल्याला कोणीतरी बनावट नोट दिली. मग अशावेळी प्रश्न पडतो की, अशा खोट्या किंवा बनावट नोटा ओळखायच्या कशा? यानिमित्ताने खरी नोट कशी ओळखावी याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.
अशा ओळखा खऱ्या नोटांवरील सुरक्षा खुणा
महात्मा गांधी यांचे चित्र असणाऱ्या नवीन नोटांच्या मालिकेतील 100, 500 आणि 2 हजार रुपये मूल्याच्या नोटांवरील क्रमांकातील प्रत्येक क्रमांक चढत्या आकाराने छापण्यात आला आहे. यातील पहिल्या तीन संख्या मात्र समान आकारात आहेत.
खरी नोट ओळखण्यासाठी नोटेच्या कडेला तिरक्या रेघा देण्यात आल्या आहेत. 2 गटात विभागून 4 रेघा असल्यास 100 रुपयांची नोट, 5 रेघा 3 गटांत असतील तर 500 रुपयांची नोट आणि 7 रेघा 5 गटांत असतील तर 2 हजार रुपयांची नोट अशी ओळखता येईल.
महात्मा गांधी यांचे चित्र असलेल्या मालिकेतील नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र वॉटरमार्कच्या स्वरूपात दिसते.
नोटेमध्ये सुरक्षा धागा असतो. यावर पृष्ठभागावर हिंदीमध्ये 'भारत' असे तर पार्श्वभागावर 'आरबीआय' असे लिहिलेले असते. हा सुरक्षा धागा महात्मा गांधी यांच्या चित्राच्या डाव्या बाजूला असतो.
नोट डोळ्यांच्या पातळीत जमिनीला समांतर धरल्यास नोटेच्या मागील बाजूस महात्मा गांधी यांच्या उजव्या बाजूला त्या नोटेचे मूल्य सांगणारे चित्र अस्पष्ट दिसते. हे गुप्त चित्र नोटेचा खरेपणा वाढवते.
अत्यंत सूक्ष्म अक्षरांत आरबीआय असे नोटेवर लिहिलेले असते. हे केवळ भिंगाच्या साह्यानेच दिसू शकते.
नोटेचा खरेपणा सिद्ध व्हावा यासाठी गव्हर्नरांची सही आणि अशोकस्तंभ हाताला स्पर्श होईल असा जाणीवपूर्वक छापलेला असतो.
प्रत्येक नोटेवर त्याच्या मूल्यानुसार ओळखचिन्ह असते. आयत, त्रिकोण, गोल अशा विविध आकारात हे चिन्ह नोटेवर ठळकपणे छापलेले असते.
नोटेवरील क्रमांक फ्लुरोसंट शाईने छापलेले असतात. ते केवळ अल्ट्रा-व्हायोलेट किरणांमध्येच दिसतात.
नोटेवर फुलाचे चित्र असते. मात्र पृष्ठभागावरून पाहिल्यास ते रेखाचित्राच्या रूपात, तर मलपृष्ठावर भरीव स्वरूपात दिसते.
रिझर्व्ह बॅंकेने खऱ्या नोटा कशा ओळखाव्यात यासाठी https://paisaboltahai.rbi.org.in/ या वेबसाईटवर विविध मुल्यांच्या नोटांची चित्रे ठेवली आहेत. त्यातून आपण बनावट आणि खऱ्या नोटांमधील फरक ओळखू शकतो.
तुमच्याकडे बनावट नोटा आढळल्यास काय करावे?
तुम्ही प्रथमत: सतर्क राहिल्यास आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेतल्यास बनावट नोट स्वीकारण्यापूर्वीच ती ओळखता येऊ शकते. तुमच्याकडे जर चुकून किंवा काही कारणाने बनावट नोट आली तर तुम्ही जवळच्या दंडाधिकारी किंवा पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.
समजा तुम्ही बॅंकेत पैसे जमा करताना बँकेला त्यात एखादी बनावट नोट आढळली तर बँक तुमच्या उपस्थितीत ती बनावट नोट जप्त करेल आणि तुम्हाला एक प्रमाणित केलेली पावती देईल. त्यानंतर बँक जप्त केलेली नोट पुढील कारवाईसाठी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकडे पाठवेल. जर तुम्ही बॅंकेत जाऊन पैसे भरत असाल तर तुम्हाला त्याचे मूल्य परत मिळत नाही. पण तुम्हाला एखादी बनावट नोट बँकेतून किंवा बॅंकेच्या ATM मधून मिळाल्याचे तुम्ही सिद्ध करू शकला तर तुम्हाला ती बदलून मिळू शकते.