• 02 Oct, 2022 09:33

नाती आणि पैसा दोन्ही कसे सांभाळायचे?

money

नातेवाईकांना आर्थिक मदत करतेवेळी किंवा कर्ज देताना भावनिक न होता आपल्या आर्थिक परिस्थीचा अंदाज घेऊन वस्तुस्थितीची जाणीव समोरच्याला करून दिल्यास नातं आणि पैसा दोन्ही वाचू शकतो.

नात्यात किंवा मैत्रीत पैसे आले की, नात्यात वितुष्ट येण्याची अनेक उदाहरणे आपण रोजच्या जीवनात अनुभवतो. नातं टिकाव म्हणून अनेक मोठी माणसं व्यवहार आणि नातं वेगळं ठेवतात. पण काही वेळा आपण पैसे की नातं याच्या कात्रीत सापडतो आणि सगळंच अवघड होऊन जातं. अशावेळी समोरच्याची गरज बघून मदत करण्याचा सल्ला अनुभवी व्यक्ती देतात. कारण नात्यासोबतच पैसेही वाचवणे गरजेचे असते. एक जुना वाक्यप्रचार आहे, ‘कोणतही सोंग आणता येतं पण पैशाचे सोंग आणता येत नाही.’ त्यामुळे कोणालाही पैशाची मदत करण्याआधी आपल्याकडे असणारे पैसे आणि समोरच्याला लागणारी रक्कम याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

कॉन्टिनेंटल फायनान्शिअल सर्व्हिसेस ग्रुपचे ग्रुप मॅनेजर गुरचरण सिंग मेहता म्हणतात, “जेव्हा नातेसंबंध आणि पैशांचा व्यवहार एकमेकांत गुंतलेला असतो, तेव्हा तो योग्यरीत्या हाताळला नाही तर नातं आणि पैसा असं दोन्ही गमावण्याचा धोका असतो. याचा अर्थ असा नाही की, आपण मदत करू नये. अशावेळी व्यावहारिक विचार करून निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.

 

अमेरिकेत करण्यात आलेले सर्वेक्षण

अमेरिकेत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, सुमारे 60 टक्के अमेरिकन लोकांनी आपल्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्याला पैसे परत मिळण्याच्या अपेक्षेने रोख कर्ज देऊन मदत केली. त्यातील 17 टक्के नागरिकांनी त्यांचे क्रेडिट कार्ड दिले. तर 21 टक्के लोकांनी कर्जासाठी साक्षीदार म्हणून सह्या केल्या आहेत. यातील 35 टक्के लोकांचे पैसे बुडाले. उलट मदत करूनही काही जणांचा क्रेडिट स्कोर खराब झाला, काही जणांच्या नात्यात अडी निर्माण झाली, अशा प्रकारच्या नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागल्याचे सर्वेक्षणात दिसून आले.

मागितलेली पैशाची मदत कशी हाताळायची 

help
 

जर नातेवाईक किंवा मित्रपरिवारातील कोणी आर्थिक मदत मागत असेल तर काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. आर्थिक मदत करताना घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये. नातेवाईकांना कर्ज देताना तुमच्या आर्थिक परिस्थितीचा आणि भविष्यातील गरजांचा विचार करणे महत्त्वाचे असल्याचे दुबईतील सेंच्युरी फायनान्शियलचे मुख्य बाजार विश्लेषक अरुण लेस्ली जॉन म्हणतात. अशावेळी तुमची बचत पुरेशी नाही किंवा तुमचा खूप खर्च येत आहे, हे कर्जदाराला पटवून देणे महत्त्वाचे असल्याचे जॉन यांचे म्हणणे आहे.

आर्थिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्या  

loan
हॉक्सटन कॅपिटल मॅनेजमेंटच्या भागीदार सोफिया भाटी यांच्या म्हणण्यानुसार, कर्ज देताना आपली वर्तमान आणि भविष्यातील गरज विचारात घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही दर महिन्याला नातेवाईकांना मदत म्हणून निधी बाजूला ठेवत असाल, तर मदत करायला काहीच हरकत नाही. 

  • तुमच्याकडे निधी नसल्यास, विनंती नाकारणे तुमच्या हिताचे आहे. 
  • तुमच्या नातेवाईकांना आधार देण्यासाठी कर्जबाजारी होऊ नका. 
  • योग्य विचार केल्यानंतर, नातेवाईकांना तुमचा निर्णय लवकरात लवकर कळवा. 
  • समोरची व्यक्ती घेतलेले पैसे वेळेत परत देऊ शकेल तरच मदत करण्याचा शब्द द्या. 
  • बोलण्यात स्पष्टता ठेवल्याने  नात्यातील संबंध बिघडणार नाहीत.

विनम्र पण दृढ रहा

जेव्हा नातेवाईक किंवा मित्रपरिवारातील कोणी आर्थिक मदत मागत असेल तेव्हा आपण अडचणीत सापडतो. अशावेळी मदत देण्यासाठी किंवा कर्जासाठी लगेच होकार देऊ नये. जर तुमची आर्थिक परिस्थितीचा मागितलेली  रक्कम आणि परतफेडीची वेळ याचा विचार करता शक्य असल्यास मदत करावी. अन्यथा, नम्रपणे नाही म्हणावे.

कर्ज घेऊ नका 

नातेवाईकांना मदत करण्यासाठी मुलांसाठी किंवा घरासाठी बाजूला काढलेला निधी नातेवाईकांसाठी खर्च करू नका. तसेच मदत करायची म्हणून कर्जही काढू नये. कारण समोरून तुम्हाला कधी पैसे परत मिळतील याची हे सांगता येत नाही. तसेच तुम्ही पैसे मिळवण्यासाठी विचारनाकेली तर नातेसंबंध खराब होऊ शकतात. पैसे नसतानाही मदत करायची असल्यास, इतर मार्ग आहेत का ते शोधा. शक्य असल्यास, त्यांना इतर मार्गांकडे वळवा.

मदत करण्याचे इतर मार्ग शोधा

help
 

आर्थिक मदत करणे शक्य नसल्यास नातेवाईकांना इतर मार्ग शोधण्यास मदत करू शकता. कोणत्या उपायाने मदत करता येईल ते बघा. शक्य असल्यास, आपल्या नातेवाईकांसाठी नोकरी शोधण्यात मदत करण्याचा प्रयत्न करा. करिअरच्या संधी किंवा व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येईल का याचा विचार करा. त्यांच्या आर्थिक अडचणींवर हा दीर्घकालीन उपाय असेल. तसेच त्यांना अर्थसाक्षर करून आर्थिक नियोजन कसे करता येईल याचा विचार करावा.  

पैसे का मागत आहेत ते समजून घ्या

समोरचा व्यक्ती का पैसे मागत आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय अडचण असल्यास मदत करण्यास काही हरकत नाही. ती रक्कम तुम्ही मागू शकता. पण जर परत न घेण्यासाठी मदत केली असेल तर तुमचे नातेसंबंध टिकून राहतात. पण हीच मदत कोणाला घर घेण्यासाठी किंवा तत्सम कारणासाठी असेल तर तुम्ही स्वतःचा विचार करून निर्णय घेऊ शकता. कारण अशा खर्चासाठी अनेक ठिकाणाहून कर्जाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी तुमची बचत खर्ची करण्याची गरज नसते.

परतफेडीच्या अटी स्पष्ट करा

जर तुम्ही एखाद्या नातेवाईकाला पैसे कर्ज देण्याचे ठरवले तर, अटी स्पष्ट असाव्यात. परिस्थिती अस्पष्ट असल्यास, भविष्यात वाद होऊ शकतात. तसेच त्या लिखित स्वरूपात असतील तर कर्ज घेणाऱ्याला आणि देणाऱ्यांना अशा  दोघांनाही सोयीचे जाते. शाब्दिक आर्थिक करार हे कुटुंब आणि नातेवाईक यांच्यातील गैरसमज आणि मतभेदांचे मुख्य कारण असते. पैसे कसे फेडले जातील, कोणत्या कालावधीत आणि किती हप्ते याविषयी सुरुवातीलाच चर्चा केली पाहिजे. भविष्यातील तारखेला एकरकमी रकमेची वाट पाहण्यापेक्षा नियमित पेमेंट करणे चांगले असते. तसेच उधार दिलेले पैसे अधिक कालावधीसाठी देऊ नये.

पैसा सगळ्यांसाठीच महत्वाचा असतो. त्यामुळे तो जपून वापरावा. तसेच नातं आणि पैसा नेहमी वेगळा ठेवलेलेच बरा. कारण पैसा येत-जात असतो नाती टिकवणे महत्त्वाचे असते.