Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget Friendly Trip to Kedarnath: कमी खर्चात केदारनाथ सोलो ट्रीप कशी कराल?

Kedarnath

Kedarnath Dham Yatra: संपूर्ण प्रवासाचा खर्च 10 हजारांपेक्षा जास्त नसेल, विशेषत: जर तुम्ही ग्रुपमध्ये प्रवास करत असाल तर प्रति व्यक्ती खर्च सुमारे 9000 रुपयांपर्यंत येईल. त्यामुळे तुम्हीही केदारनाथ आणि बद्रीनाथची यात्रा कमी खर्चात पूर्ण करू शकता. पण लक्षात ठेवा की वेळ आणि नियोजन खूप महत्वाचे आहे. तुमचा प्रवास किमान 5 दिवसांचा असायला हवा.

आजकाल तुम्हाला सोशल मीडियावर केदारनाथ (Kedarnath Dham) आणि बद्रीनाथचे (Badrinath Dham) बरेच फोटो पाहायला मिळत असतील. ही ठिकाणे अशी आहेत की नुसती चित्रे बघूनच तुमचे मन म्हणेल की याठिकाणी गेलंच पाहिजे! येत्या 25 एप्रिलपासून केदारनाथ मंदिर भक्तांसाठी खुले होणार आहे. अनेकांनी या यात्रेला जाण्याचा प्लॅन देखील बनवला असेल किंवा बनवत असाल. ढगांनी वेढलेले पर्वत, ट्रेकिंग करत मंदिरात पोहोचण्याची तळमळ, नयनरम्य रस्ते, नद्या, संस्कृती, धर्म आणि भटकंती या सगळ्यांचा तुम्ही या प्रवासात  आनंद घेऊ शकता.

यात्रेला जाण्याआधी यात्रेकरू नोंदणी आवश्यक

सर्व प्रथम केदारनाथ आणि बद्रीनाथसाठी नोंदणी आवश्यक असेल. ज्यासाठी उत्तराखंड सरकारने सोप्या पद्धतीने नोंदणीची मोफत सुविधा दिली आहे. यात्रेची नोंदणी केल्याशिवाय यात्रेची योजना बनवणे हे काही समंजस पाऊल म्हणता येणार नाही, त्यामुळे पुढील संभाव्य समस्यांना रोखण्यासाठी सरकारी नियमांचे पालन करा आणि मगच यात्रेचे प्लॅन करा. उत्तराखंड टुरिजमच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता. ही नोंदणी निशुल्क आहे.

केदारनाथची चढाई गौरीकुंडापासून (Gauri kund) सुरू होते, त्यासाठी सोनप्रयाग (Son Prayag) गाठावे लागते. जर तुमचा प्रवास मुंबईपासून सुरू होत असेल आणि पहिला थांबा ऋषिकेश हा असेल. रेल्वेने डेहराडूनपर्यंत आलात तरी तेथून ऋषिकेशला जाण्यासाठी कायम टॅक्सी, बस सुरू असतात. मुंबई ते डेहराडून हा रेल्वेप्रवास 700-800 रुपयांमध्ये होतो.ऋषिकेशला पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही उत्तराखंड परिवहनची 'जनरथ बस' देखील निवडू शकता. अशा बससाठी तिकीटाची किंमत फक्त 500 रुपये आहे. जर तुम्ही सकाळी 9 वाजताची बस पकडली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता ऋषिकेशला पोहोचाल. मग ऋषिकेशहून 4 तासांचा प्रवास करून तुम्हाला रुद्रप्रयाग किंवा सोनप्रयागला जाण्यासाठी बस मिळेल.

बसने ऋषिकेशहून सोनप्रयागला जाण्यासाठी सुमारे 500 रुपये खर्च करावे लागतील. ऋषिकेश ते सोनप्रयाग हा रस्ता 8 तासांचा आहे. ज्यामध्ये सुंदर रस्त्यांसोबतच विशाल पर्वत, सुंदर नद्या आणि स्वादिष्ट गढवाली खाद्यपदार्थांची चव चाखता येते.

सोनप्रयाग बसस्थानकापासून सुमारे 300 मीटर चालत गेल्यावर तुम्हाला गौरीकुंडसाठी बोलेरो टॅक्सी मिळेल. ज्यामध्ये प्रति व्यक्ती 50 रुपये देऊन 5 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 15-20 मिनिटांत पूर्ण करता येतो. यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचाल जिथून बाबा केदारच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी 18 किलोमीटरचा प्रवास सुरू होतो.

ऋषिकेश ते गौरीकुंडपर्यंत अन्नसुविधा सामान्य खर्चात करता येते. गौरीकुंडानंतर आपण जसजसे वर जाऊ, तसतशी वस्तूंची किंमत वाढत जाते. पाण्याची बाटली 50 ते 60 रुपये आणि मॅगी 60 रुपयांना, डाळ भात 160 रुपयांना आणि 4 चपाती आणि भाजी 120 रुपयांना मिळेल.

साधारणपणे, गौरीकुंड ते केदारनाथ हा मार्ग जंगलपट्टी, भिंबली, रामबाडा, लिंचोली आणि रुद्र पॉइंटमधून जातो, ज्याला 8-10 तास लागू शकतात, परंतु काही लोकांना त्याहूनही जास्त वेळ लागतो. खेचराने प्रवास करणाऱ्यांना सरकारी दरानुसार 2500 रुपये एकमार्गी द्यावे लागतात. तर पालखीचे दर 8000-10000 रुपयांपर्यंत आहेत. यासोबतच पिठूवर चढण्यासाठी 6500-7000 रुपये मोजावे लागतात.

विशाल सुंदर हिमालयाच्या कुशीत बाबा केदारचे भव्य मंदिर आहे, विहंगम दृश्याची झलक इथे तुम्हांला बघायला मिळेल.

दर्शन झाल्यानंतर परत खाली उतरताना केदारनाथहून साधारणपणे 5-6 तासांत गौरीकुंडला पोहोचता येते. मंदिरातून खाली उतरताना, खेचराने येण्याचे दर 1700 रुपये, पिठूने येण्याचे दर 5000 रुपये इतके आकारले जातात. उतरताना घसरण्याची शक्यता जास्त असते, त्यासाठी काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे. खेचरांद्वारे जर खाली उतरत असाल तर खेचर चालविणाऱ्याला देखील सावकाश खाली उतरण्याच्या सूचना दिल्या पाहिजेत.

सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुन्हा तुम्ही पायथ्याशी पोहोचाल. त्यानंतर येथून बद्रीनाथचा प्रवास सुरू करा. सोनप्रयागहून बद्रीनाथला जाण्यासाठी गुप्तकाशी, चोपटा, गुप्तेश्वर, चमोली, पिपळकोटी पार करावे लागते.

सुंदर मैदाने, महाकाय पर्वत यांतून चालत दुपारपर्यंत बद्रीनाथ मंदिरात पोहोचता येते. संध्याकाळपर्यंत बाबा बद्रीनाथचे दर्शन घ्या. त्यानंतर ऋषिकेशला परतीचा प्रवास सुरू करा.

तसे, ऋषिकेश ते डेहराडून 3000-5000 रुपयांपर्यंत कार बुक करता येते. या संपूर्ण सहलीचा खर्च 10 हजारांपेक्षा जास्त नसेल, विशेषत: जर तुम्ही ग्रुपमध्ये प्रवास करत असाल तर प्रति व्यक्ती खर्च सुमारे 9000 रुपयांपर्यंत येईल. त्यामुळे तुम्हीही केदारनाथ आणि बद्रीनाथची यात्रा कमी खर्चात पूर्ण करू शकता. पण लक्षात ठेवा की वेळ आणि नियोजन खूप महत्वाचे आहे. तुमचा प्रवास किमान 5 दिवसांचा असायला हवा.