आजच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे इतरांशी स्पर्धा करताना व दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येणे गरजेचे आहे. अनेकदा पाहायला मिळते की, ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे अवघड जाते. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर न केल्यास वृद्धांना अनेक कामे करताना समस्या येऊ शकते.
सध्या प्रवासापासून ते आर्थिक व्यवहारापर्यंत सर्व गोष्टी तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच होतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करायला हवा व याचे फायदे काय आहेत? याविषयी जाणून घेऊयात.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा
सध्याच्या काळात कोणतेही काम करताना तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनीही याचा वापर करणे गरजेचे आहे. घरातील तरूण व्यक्तींनी वृद्धांना तंत्रज्ञानाचा वापर कशाप्रकारे करावा, याबाबत माहिती दिल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. स्मार्टफोनच्या माध्यमातून कॅब बुकिंग, ऑनलाइन पेमेंट, ईमेल, डॉक्टर अपॉइमेंट कशी करावी, याबाबत त्यांना माहिती द्यावी.
ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञानाचा पर कसा करावा, हे माहित असल्यास कोणत्याही कामासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. यामुळे त्यांना कामे जलद व घरबसल्यास करता येतील.
ज्येष्ठ नागरिकांसाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा?
इतरांशी संवाद साधण्यासाठी | ज्येष्ठ नागरिक तंत्रज्ञानाचा वापर हा कुटुंबातील सदस्य, मित्र-मैत्रिणींशी संवाद साधण्यासाठी करू शकतात. व्हॉट्सॲप, फेसबुक आणि ईमेलच्या मदतीने इतरांच्या संपर्कात राहता येईल. तसेच, स्मार्टफोनच्या माध्यमातून इतर शहरात राहत असलेल्या मित्र-मैत्रिणींशी व्हीडिओ कॉलच्या मदतीनेही संवाद साधता येईल. सर्वसाधारणपणे वृद्ध नागरिकांचा इतरांशी संवाद कमी झालेला असतो व त्यांना एकाकीपणा जाणवतो. अशावेळी तंत्रज्ञानाचा वापर करून ते इतरांच्या संपर्कात राहू शकतात. |
आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी | वयस्कर व्यक्ती चांगल्या आरोग्यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. ऑनलाइन माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला घेता येईल. ऑनलाइन औषधे मागवू शकतात. याशिवाय, योगा व इतर व्यायामाचे क्लास ऑनलाइन माध्यमातून करता येईल. थोडक्यात, निरोगी व आनंदी राहण्यासाठी तंत्रज्ञान उपयोगी ठरू शकते. |
आर्थिक व्यवहारासाठी करा वापर | वृद्ध नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी वारंवार बँकेत जाणे शक्य होत नाही. अशावेळी त्यांना ऑनलाइन आर्थिक व्यवहारांची माहिती असल्यास एका क्लिकवर कोणालाही पैसे पाठवू शकतात अथवा रिसिव्ह करू शकतात. |
ऑनलाइन शिक्षणासाठी होईल मदत | वृद्ध नागरिक ऑनलाइन माध्यमातून नवनवीन गोष्टी शिकू शकतात. नवीन कला शिकण्यापासून ते आर्थिक विषयांबाबत माहिती घेण्यापर्यंत सर्वकाही ऑनलाइन उपलब्ध आहे. याशिवाय, पुस्तके वाचू शकतात, व्हीडिओ पाहू शकतात. |
प्रवास करताना करा वापर | प्रवास करतानाही तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. विमानापासून ते रेल्वेपर्यंत कोणत्याही प्रकारे प्रवास करायचा असल्यास मोबाइलच्या एका क्लिकवर तिकीट काढू शकता. याशिवाय, उबर, ओला सारख्या कॅब सर्व्हिसचाही वापर करता येईल. |
ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःची सुरक्षा
ज्येष्ठ नागरिकांनी तंत्रज्ञानाचा वापर कसा करायला हवा, हे शिकण्यासोबतच ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःची सुरक्षा कशी करावी? याबाबतही जाणून घ्यायला हवे. वयस्कर व्यक्ती तंत्रज्ञानाच्या अपुऱ्या माहितीमुळे ऑनलाइन फसवणुकीस बळी पडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशी फसवणूक कशाप्रकारे टाळावी व सुरक्षितरित्या आर्थिक व्यवहार कसे करावे, हे जाणून घेणे गरजेचे आहे.