सपना विचारात पडली. HR कार्तिकचा तिला कॉल येऊन गेला होता. Post-CoviD काळात तिने प्रथमच कंपनी स्विच केलेली. "वेल-कम किट" सोबत कंपनी-इंडक्शनमध्ये तिला बेसिक एम्प्लॉयमेंट फॅसिलिटीज तसेच “ग्रुप मेडिकल कव्हर” (Group Medical Cover-GMC) बाबत सांगण्यात आलेले. तिच्या आई-वडिलांना कोरोना होऊन गेलेला. तेव्हा साहजिकच कंपनी देत असलेले मेडिकल कव्हर त्यांच्यासाठी देखील एक्सटेन्ड काय हरकत आहे, असा तिचा विचार स्ट्रॉंग होत होता. पण खरच हे “ग्रुप मेडिकल कव्हर” घेणं, कितपत फायदेशीर असेल, यामुळे अगदी इमर्जन्सी असेल तेव्हा काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना!!! सपनाची मनस्थिती द्विधा झाली होती, त्याचप्रमाणे आपल्या पैकी बहुतेक जणांनी अशा क्षणाचा अनुभव घेतला असेल.
Table of contents [Show]
पालकांसाठी ग्रुप मेडिकल कव्हर पुरेसा ठरेल का?
भारतातील बहुतांश एम्प्लॉयर्स त्यांच्या एम्प्लॉईजना अतिरिक्त लाभ म्हणून “समूह वैद्यकीय विमा” अर्थात Group Medical Cover पॉलिसी देतात. अशा धोरणांमुळे, एम्प्लॉयीज् आणि त्यांचे वर अवलंबून असलेल्या व्यक्ती (Dependents - उदा. त्याची जोडीदार व्यक्ती आणि मुले) यांना आर्थिक सुरक्षितता मिळते. काही कंपनीज् एम्प्लॉयीच्या पालकांना देखील असे मेडिकल कव्हर देतात. कर्मचारी स्वतःच्या पालकांचा समावेश GMC मध्ये करायचा आहे की नाही, हे निवडू शकतो. मात्र असे असले तरी देखील, आपण आपल्या “सिनिअर सिटीझन” असणाऱ्या पालकांना केवळ ग्रुप मेडिकल कव्हरने सुरक्षित करणे, हे एखाद्या हेल्थ-इमर्जन्सी पिरियडमध्ये नुकसानकारक ठरू शकते.
सिनिअर सिटिझन्सना ग्रुप इन्शुरन्समध्ये समाविष्ट करण्याचे फायदे
- ग्रुप इन्शुरन्स अंतर्गत आपल्याला किंवा आपल्या Dependents ना प्री-मेडिकल चेक-अप करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे, विना-अडचण किंवा विना-क्लिनिक-व्हिजिट, इतर डॉक्युमेंटेशन न करता त्वरित वैद्यकीय खर्चापासून संरक्षण मिळते.
- रेग्युलर हेल्थ इन्शुरन्स प्रमाणे, बहुतेक GMC पॉलिसींचा प्रतीक्षा कालावधी शून्य (Zero Waiting Period) असतो. त्यामुळे पॉलिसी सुरू झाल्यापासून आपल्याला आणि आपल्या डिपेंडेंट्सना त्वरित कव्हरेज प्रदान करते.
- जर पालकांना मधुमेहासारखे पूर्व-अस्तित्वात असलेले आजार असतील, आणि ज्याकरिता गंभीर वैद्यकीय मदतीची आवश्यकता नसते, तर ते सहजपणे उपचार घेऊ शकतात. तुम्हाला देखील त्यांच्या उपचारांवर झालेला खर्च GMC कव्हर अंतर्गत क्लेम करता येणे, सहज शक्य होते. GMC मध्ये अशा आजारांवरील उपचारांचा समावेश अगदी पहिल्या दिवसापासून अंतर्भूत असतो.
सिनिअर सिटिझन्सना ग्रुप इन्शुरन्समध्ये समाविष्ट करण्याचे तोटे
- ग्रुप इन्शुरन्स अंतर्गत देण्यात येणारे कव्हर जरी मिळण्यास सोपे असले, तरी देखील त्याचे सातत्य (continuity) ही केवळ आणि केवळ आपल्या एम्प्लॉयरच्या मर्जीवर अवलंबून असते. एम्प्लॉयरने हेल्थ कव्हरेज कमी करण्याचा, ग्रुप पॉलिसी बंद करण्याचा किंवा पालकांना ग्रुप पॉलिसीमध्ये समाविष्ट करण्याचे बेनिफिट्स काढून टाकण्याचा निर्णय घेतल्यास, एकूण मेडिकल कव्हरेज वर परिणाम होतोच.
- एम्प्लॉयी म्हणून आपल्याला GMC अंतर्गत मिळणाऱ्या हेल्थ कव्हरसाठीचा प्रिमिअम निश्चितच खूप कमी असतो. मात्र आपल्या पालकांना जेव्हा आपण GMC मध्ये जोडू पाहतो, तेव्हा त्यांच्यासाठी भरावा लागणारा “अन्युअल प्रिमिअम” हा तुलनेने खूप जास्त असतो.
- वयोमानानुसार वृद्ध व्यक्तींना आजार होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांच्यासाठी “टोटल हेल्थ कव्हर” मधील इन्शुरन्सची अमाऊंट अधिक वापरली जाण्याची शक्यता देखील जास्त असते. असे अनेक क्लेम्स पॉलिसी वर्षामध्ये केले गेल्यास आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना मिळणारे कव्हर देखील कमी रक्कमेचे उरते.
- सर्वांत महत्वाचे म्हणजे जेव्हा आपण आपल्या जॉबमधून ठराविक काळासाठी सबॅटिकल (Sabbatical) घेतो किंवा जॉबच बदलतो, तेव्हा आपल्या एम्प्लॉयरने दिलेली GMC देखील, कंपनी सोडताच समाप्त होते. थोडक्यात हा एक असा काळ असू शकतो, जेव्हा आपल्याला किंवा आपल्या पालकांना, कुटुंबाला “सेफ्टी नेट” म्हणून “हेल्थ कव्हर” नसते.
पालकांसाठी नियमित हेल्थ इन्शुरन्स फायदेशीर
साहजिकच आहे की, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा वैद्यकीय खर्च तुलनेने जास्त असतो आणि म्हणून त्यांना कव्हर करण्यासाठी इन्शुरन्स प्रीमियमची जास्त रक्कम भरावी लागते. तेव्हा आपल्या पालकांना “ग्रुप मेडिकल कव्हर”मध्ये समाविष्ट करण्याऐवजी, त्यांच्यासाठी रेगुलर हेल्थ इन्शुरन्स घेतल्यास केव्हाही उत्तम. अर्थात, वय किंवा आरोग्याशी संबंधित काही बाबींमुळे स्वतंत्र हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी दिली जाणे शक्य नसल्यास मात्र, GMC योजनेमध्ये त्यांचा समावेश करण्याशिवाय पर्याय नसतो.