Purchasing Power: परदेशात नोकरीला जाणाऱ्यांची संख्या मोठी वाढली आहे. काही तरुण तर शिक्षण घेऊन तेथेच नोकरी करण्याच्या हेतूने मोठ्या विद्यापीठांत लाखो रुपये भरून प्रवेश घेतात. दरवर्षी सुमारे 2 लाख 80 हजार विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. तसेच कंपन्यांद्वारे कर्मचाऱ्यांना परदेशात नोकरीची संधीही मिळते.
परदेशात डॉलरमध्ये जास्त पगार मिळेल अशी आशा अनेकांना असते. सरधोपटपणे भारतीय रुपयातील पगार आणि अमेरिकेतील पगाराची तुलना केली जाते. मात्र, अर्थशास्त्रीय भाषेत ते एवढे सोपे नसते.
प्रत्येक देशाच्या चलनाची एक क्रयशक्ती (परचेसिंग पॉवर) असते. सध्या अमेरिकन 1 डॉलरचे मूल्य 83 रुपये आहे. हा दर प्रत्येक मिनिटाला बदलत असतो. प्रत्येक देशाच्या चलनाचा दर वेगवेगळा असतो. जर तुम्ही अमेरिकेत नोकरीसाठी गेले असाल आणि भारतीय रुपयांमध्ये तुम्हाला तेथे 80 लाख रुपयांचे पॅकेज असेल तर भारतामध्ये फक्त 23 लाख रुपयांच्या पॅकजेमध्ये अगदी सेम लाइफ स्टाइल जगू शकता.
परचेसिंग पावर पॅरिटी ( Purchasing Power Parity India Vs USA)
परचेसिंग पावर पॅरिटी (Purchasing Power Parity) म्हणजेच क्रयशक्ती समानता दोन देशांतील चलनामध्ये मोजता येते. उदाहरणार्थ, 10 डॉलर मध्ये अमेरिकेत जेवढ्या वस्तू खरेदी करता येऊ शकतात. तितक्याच मूल्याच्या वस्तू भारतात खरेदी करण्यासाठी किती रुपये लागतील?
समजा, 80 डॉलरमध्ये अमेरिकेत काही किराणा वस्तू विकत घेता येत असतील आणि तेवढ्याच वस्तू भारतात खरेदी करण्यासाठी 800 रुपये लागत असतील तर ही चलनाची क्रयशक्ती झाली. या परिस्थितीत दोन्ही देशातील चलनाचा PPP दर 10 डॉलर इतका होईल. PPP = परदेशातील वस्तूची किंमत/ स्थानिक बाजारातील किंमतीला भागून काढण्यात येते.
दोन्ही देशातील चलनामुळे किंमतीतील फरक
घरभाडे, किराणा, विमा, रुग्णालयातील खर्च, वाहतूक, शिक्षण या गोष्टींसाठीही तेथील चलनात खर्च करावा लागेल. (Basket of Goods to compare PPP) प्रत्येक गोष्टीसाठी जास्त पैसे मोजावे लागल्याने तुम्हाला जास्त पॅकेज मिळाले तरी तुमचा खर्चही त्याच प्रमाणात राहील. त्यामुळे भारतातील पगार आणि अमेरिकेतील थेट पगाराची तुलना करणे बरोबर ठरणार नाही.
परदेशात जाण्यापूर्वी PPP ची माहिती घ्या
सहसा प्रगत देशांमध्ये नोकरी, शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. मात्र, या प्रगती देशातील चलनवाढ, जीडीपीचा परिणाम तुमच्या उत्पन्नावर होतो. युरोपियन देशांमध्येही जर तुम्ही नोकरीसाठी जात असाल तरीही राहाणीमानाचा खर्च जास्त राहील.
त्यामुळे स्थानिक चलनानुसार किती खर्च लागेल हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरेल. त्यानंतरच कोणत्या देशात जायचे, का जायचे? भारतातील पगार आणि PPP नुसार तेथील पगार किती याचा सखोल अभ्यास केल्यानंतरच परदेशात जाण्याचा निर्णय घ्या.