Foreign Travel: कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवास पुन्हा सुरळीत झाला आहे. पर्यटन, शिक्षण, उद्योग आणि व्यवसायासाठी परदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. परदेशात जाताना तुम्ही किती परदेशी चलन बरोबर नेऊ शकता याबाबत काही नियम आहेत. या नियमांचे पालन करून तुम्हाला प्रवास करावा लागतो. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आंतरराष्ट्रीय प्रवास करताना सर्वसामान्यपणे पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे या लेखात पाहूया.
किती कॅश बरोबर घेऊन तुम्ही प्रवास करू शकता?
एका ट्रिपसाठी जाताना प्रवासी 3000 डॉलर सोबत घेऊन जाऊ शकतो. इतर रक्कम स्टोअर व्हॅल्यू कार्ड्स, ट्रॅव्हलर चेक किंवा बँक ड्राफ्ट स्वरुपात नेऊ शकतो. इराक आणि लिबिया यास अपवाद आहेत. या दोन्ही देशात जाताना 5 हजार डॉलरपर्यंत रक्कम नेता येते. हज यात्रेला जाताना हज कमिटीद्वारे निर्धारित केलेली रक्कम किवा कॉइन्स घेऊन जाता येतात.
परदेशातून भारतात पुन्हा माघारी येताना किती रक्कम जवळ ठेवता येते?
परदेशात तात्पुरत्या काळासाठी वास्तव्यास राहून माघारी येताना 25 हजारांपेक्षा जास्त भारतीय चलनातील रक्कम जवळ बाळगू शकत नाही. नेपाळ आणि भूतानमधून भारतात येत असताना वेगळे नियम आहेत.
भारतात येताना किती परदेशी चलन सोबत आणू शकता?
परदेशातून भारतात येताना फॉरेन एक्सचेंज (परदेशी चलन) आणण्यावर मर्यादा नाहीत. मात्र, जर चलनी नोटा, चेक मिळून एकूण रक्कम 10,000 डॉलरच्या पुढे जात असेल तर सीमाशुल्क विभागाकडे Currency Declaration Form (CDF) नमूद करावे लागेल. ही रक्कम नंतर बँकेत जमा करावी लागते.
उपचारासाठी परदेशात जात असाल तर नियम काय?
वैद्यकीय ट्रिटमेंटसाठी परदेशात जाताना तुम्ही 50,000 अमेरिकन डॉलर सोबत घेऊन जाऊ शकता. रुग्णालयाने खर्चाची अदांजित रक्कम दिली असेल तर बँकही 50,000 डॉलर रक्कम देते. रुग्णाच्या प्रवासासाठी, मदतनीसासाठी आणखी 25,000 हजार डॉलर सोबत नेता येतात.
परदेशात शिकण्यास जात असाल तर नियम काय?
परदेशात शिकण्यासाठी जात असाल तर तुम्ही 30,000 डॉलरची रोकड सोबत नेऊ शकता. तसेच विद्यापीठाने खर्चाची अंदाजित रक्कम दिली असेल तर तेवढी रक्कम नेता येईल. मात्र, 30 हजार डॉलरपेक्षा जास्त नसावी.
कॅश शिवाय परदेशात पैसे नेण्याचे इतर पर्याय कोणते?
इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ट्रॅव्हलर्स चेक, बँक ड्राफ्ट द्वारे तुम्हाला पैसे परदेशात वापरता येतील. क्रेडिट कार्डद्वारे, लॉटरी तिकिट, बंदी घातलेल्या वस्तू विकत घेता येणार नाहीत.
परदेशातून आल्यानंतर परकीय चलन तुम्ही भविष्यातील ट्रॅव्हलसाठी जवळ ठेवू शकता का?
2 हजार डॉलरपर्यंत चलनी नोटा किंवा ट्रॅव्हलर्स चेक तुम्ही जवळ बागळू शकता. इतर रक्कम तुम्हाला 90 दिवसांच्या आत बँकेत जमा करावी लागते.
परदेशात जाताना किती सोन्याचे दागिने नेऊ शकता?
याबाबत सीमाशुल्क विभागाचे नियम आहेत. पुरुष 20 ग्रॅम सोने बरोबर नेऊ शकतो तसेच महिला असेल तर 40 ग्रॅम सोने बरोबर घेऊन जाऊ शकते.