Think SIP as your Child: सध्याची कुटुंबपद्धती खूपच बदलत चालली आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे भावंडं लग्नानंतरही एकत्र राहत होती. तसेच एका जोडप्याला किमान 3-4 अपत्ये असायची. पण आता तो काळ राहिलेला नाही. सध्या बरेच जण आम्ही दोघे आणि आमची 2 मुले असा ट्रेण्ड सुरू आहे. काही ठिकाणी तर आम्ही दोघे आणि आमचे 1 मूल असेही सुरू आहे. अशा कुटुंबामध्ये त्या दोन किंवा एका मुलावर खूप केंद्रीत खर्च केला जातो. जसे की, त्या मुलांचे शिक्षण, नोकरी-धंदा, लग्न, घर यात काही कमतरता येऊ नये. म्हणून त्या मुलांच्या वयाच्या 25व्या वर्षापर्यंत त्यांच्यावर भरपूर पैसे खर्च केले जातात.
पालकांनी स्वत:च्या भविष्याचाही विचार करावा
अर्थात मुलांच्या भविष्याचा विचार करताना बरेच पालक आपल्या उतारवयातील भविष्याचा पुरेसा विचार करत नाहीत. कारण त्यांना अपेक्षा असते की, आम्ही मुलांसाठी बरेच काही केले आहे, तर ते आमचा सांभाळ करतीलच. पण काही वेळेस असे नाही झाले तर त्या पालकांचे खूप हाल होतात. कारण उतारवयात पुरेशी पेन्शन किंवा किमान खर्चाची रक्कम हाताशी नसेल तर जगणे अवघड होऊ शकते. त्यामुळे अशा पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासोबत आपल्या उतारवयातील भविष्याचाही तेवढाच विचार करणे गरजेचे आहे.
Think SIP as your One More Child
अशावेळी पालकांनी आपल्या 1 किंवा 2 मुलांच्या आर्थिक तरतुदीसोबत आणखी मुलाची जबाबदारी घ्यायला हवी, ती म्हणजे सिपची (SIP). होय SIP-Systematic Investment Planची. एसआयपीला तुम्ही तुमचे दुसरे किंवा तिसरे अपत्य समजा आणि तुमच्या पोटच्या मुलांसाठी जेवढा खर्च करता. तेवढीच गुंतवणूक प्रत्येक वर्षी सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅनमध्ये करा. सलग 20 ते 25 वर्षे अशाच पद्धतीने गुंतवणूक करा.
25 वर्षांनंतर कदाचित तुमची पोटची मुले तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. पण तुमचे एसआयपी रूपी तिसरे अपत्य मात्र तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही. कारण एसआयपीमधून तुम्हाला जगण्यासाठी पुरेशी रक्कम त्याने जमा केलेली असेल, तीही चक्रवाढ पद्धतीने. ही प्रक्रिया आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
समजा प्रत्येक महिन्याला तुम्ही 1000 रुपये एसआयपीमध्ये गुंतवणूक करत आहात आणि सतत 25 वर्षे तुमची ही गुंतवणूक सुरू आहे. या गुंतवणुकीवर बाजारभावाने तुम्हाला वार्षिक 15 टक्के परतावा (Return) मिळत आहे. तर या 25 वर्षांत तुमची गुंतवणूक 3 लाख रुपये असेल आणि तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेचे 15 टक्क्यांच्या परताव्याचे मूल्य 32,84,074 रुपये होईल. पण या 25 वर्षांत महागाई दर सुद्धा वाढेल. आपण हा महागाई दर 6 टक्के घेऊ. त्यानुसार तुमच्या 25 वर्षांतील 3 लाख रुपयांचे मूल्य 11,29,530 रुपये असेल. म्हणजेच तुमच्या संपत्तीत 8,29,530 रुपयांची वाढ होईल.
अशाप्रकारे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे एसआयपीची रक्कम निश्चित करू शकता. एसआयपी कॅल्क्युलेटर (SIP Calculator) प्रत्येक महिन्याला किती रुपये, किती वर्षे गुंतवल्याने तुम्हाला नेमका किती रुपयांचा फायदा होऊ शकतो, हे पाहू येईल.
(डिसक्लेमर: शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. ‘महामनी’ वेबपोर्टल शेअर्स, म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)