Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंडमधील परतावा कशाप्रकारे गणला जातो?

Types of Mutual Fund Returns

शेअर बाजारातील थेट जोखीम घ्यायची नसेल तर म्युच्युअल फंडच्या (Mutual Fund) माध्यमातून गुंतवणूक करून चांगला परतावा (Good Returns) मिळवू शकतो. म्युच्युअल फंडमधून मिळणारा परतावा हा किती प्रकारचा असतो आणि तो कशाप्रकारे गणला जातो, हे आपण समजून घेऊ या.

चांगला परतावा देणार्‍या योजनेमध्ये म्युच्युअल फंडचा प्रामुख्याने समावेश केला जातो. म्युच्युअल फंड योजना या दीर्घकाळात चांगला परतावा देतात. एवढेच नाही तर अनेकदा शॉर्ट टर्म किंवा एक दोन वर्षात देखील यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. म्युच्युअल फंड योजनांच्या परताव्याचे आकलन अनेकप्रकारे करण्यात येते. परंतु ही गणना म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओवर अवलंबून आहे. उदा. एकापेक्षा अधिक वर्षांसाठी गुंतवणूक केली असेल तर त्याचे आकलन वार्षिक आधारावर केले जाते. पण गुंतवणूक काही दिवसांसाठीच असेल तर त्याची गणना इतर मार्गाने केली जाते.

Types of Mutual Fund Returns

म्युच्युअल फंडच्या परताव्याचे प्रकार (Types of Mutual Fund Returns)

म्युच्युअल फंडच्या परताव्याचे वार्षिक परतावा (Annualized return), परिपूर्ण परतावा (absolute return), एकूण परतावा (total return), पॉईंट टू पॉईंट रिटर्न (point-to-point return), ट्रेलिंग रिटर्न (Trailing returns), रोलिंग रिटर्न (Rolling returns) अशा 6 पद्धतीने करता येते.

वार्षिक परतावा (Annualized return) 

वार्षिक परताव्याचा अर्थ म्हणजे आपल्या गुंतवणुकीतून एका वर्षातून किती कमाई होते, याप्रमाणे वार्षिक परताव्याचे आकलन केले जाते. या परताव्याचे तात्पर्य म्हणजे मूळ रक्कमेत वर्षभरात किती वाढ झाली. उदा. एखाद्या व्यक्तीने एक जानेवारी 2021 मध्ये एक लाख रुपये एकरकमी म्युच्युअल फंडमध्ये टाकले असतील तर तीन वर्षात त्याचा परतावा हा 40 हजार रुपयांपर्यंत असेल तर त्या हिशोबाने त्याचा संपूर्ण परतावा चाळीस टक्के असेल. म्हणजेच तीन वर्षात चाळीस टक्के हा परतावा असेल. परंतु वार्षिक आधारावर त्याची गणना केल्यास त्याच्या वार्षिक परताव्याची सरासरी 13.33 टक्के राहील.

एकूण परतावा (Total Return)

एखाद्या म्युच्युअल फंड योजनेत एक लाख रुपये गुंतवणूक केल्याचे गृहित धरताना त्याची प्रति एनएव्ही 20 रुपये असेल तर त्याला पाच हजार युनीट मिळतील. त्यानंतर एका वर्षात हा एनएव्ही 22 रुपये झाला असेल तर गुंतवणुकीची रक्कम ही 1.10 लाख रुपये होईल. याचाच अर्थ भांडवलात दहा हजाराची वाढ झाली. यानुसार भांडवली नफा हा दहा हजार रुपये आहे. या योजनेवर वार्षिक 2 रुपये प्रति युनीट लाभांश मिळत असेल तर गुंतणुकीवर मिळालेला परतावा दहा हजार + दहा हजार रुपये (लाभांश+ भांडवली नफा) असा एकूण 20 हजार रुपये असेल. यानुसार हा परतावा 20 टक्के मानला जाईल.

परिपूर्ण परतावा (absolute return)

अ‍ॅब्सोल्युट रिटर्न देखील पॉइंट टू पॉइंट रिटर्नप्रमाणेच असतो. यात गुंतवणुकीची सुरवात करणे आणि स्वीच करणे यादरम्यान मिळणार्‍या परताव्याचे आकलन केले जाते. गुंतवणुकीचा कालावधी एक वर्षापेक्षा कमी असेल तर त्याचे आकलन पॉइंट टू पॉइंट म्हणजेच गुंतवणुकीची तारीख आणि गुंतवणूक काढण्याची तारीख यादरम्यानच्या आधारावर केली जाते. गुंतवणुकीचा कालावधी हा अधिक असल्यास त्याचा परतावा वार्षिक आधारावर केला जातो. यासाठी एक उदाहरण पाहू. उदा. काही काळापूर्वी अडीच लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले असतील आणि ती रक्कम आता चार लाख रुपये झाली असेल तर अशावेळी अ‍ॅब्सोल्यूट रिटर्न 60 टक्के राहिल.

पॉइंट टू पॉइंट रिटर्न (point-to-point return)

पॉइंट टू पॉइंट रिटर्नचा अर्थ असा की, गुंतवणुकीची सुरूवात आणि थांबवण्याचा निर्णय यादरम्यानच्या कालावधीत किती वाढ झाली, यास पॉइंट टू पॉइंट रिटर्न असे म्हणतात. मग यातून कितीही रक्कम काढली असेल किंवा गुंतवलेली का असेना, त्याचे पॉइंट टू पॉइंट रिटर्ननुसार आकलन केले जाते. गुंतवणूक कधीही सुरू केलेली का असेना आणि कधीही पैसे काढलेले का असेना, या कालावधीत मिळालेल्या परताव्याला ‘पॉइंट टू पॉइंट’ रिटर्न म्हणतात.

ट्रेलिंग रिटर्न (Trailing returns)

या प्रकारच्या परताव्याचे आकलन म्युच्युअल फंड स्कीमच्या मागील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी केला जातो. गुंतवणुकीच्या कालावधीपासून ते परिपक्वता या कालावधीचे आकलन करत भविष्यातील संभाव्य परताव्याचा अंदाज बांधला जातो.

रोलिंग रिटर्न (Rolling returns) 

रोलिंग रिटर्न या प्रकाराद्वारे म्युच्युअल फंडच्या कामगिरीचे चांगल्या पद्धतीने विश्लेषण करता येते. ते एका विशिष्ट कालावधीत योजनेच्या वार्षिक परताव्याची माहिती देतात. रोलिंग रिटर्नचा कालावधी हा दररोज, साप्ताहिक किंवा मासिक असू शकतो.

कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी त्या योजनेतील मूळ संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडमधील परताव्याचे विविध प्रकार आपण समजून घेतले. त्याआधारे तुम्ही कोणत्याही फंडाचा परफॉर्मन्स अभ्यासून त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता.