Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI payments : यूपीआय पेमेंट्समधलं प्रीपेड वॉलेट नेमकं कसं काम करतं?

UPI payments : यूपीआय पेमेंट्समधलं प्रीपेड वॉलेट नेमकं कसं काम करतं?

UPI payments : यूपीआय पेमेंट्समध्ये असलेलं प्रीपेड वॉलेटही व्यवहारासाठी चांगला पर्याय आहे. यूपीआय पेमेंट्स सध्या लोकप्रिय झालं आहे. बँकेसह विविध अॅपही यूपीआय सक्षम आहेत, ज्या माध्यमातून आपण पेमेंट्स करत असतो. यूपीआय अॅपमध्ये दोन प्रकारे पेमेंट्स होतात. यूपीआयमध्ये क्यूआर कोड स्कॅन आणि दुसरा पर्याय प्रीपेड वॉलेटचा असतो. या दोन्हींची कार्यपद्धती जाणून घेऊ...

ग्राहकांना शुल्क नाही

यूपीआय क्यूआर कोड स्कॅन  (UPI QR code scan) करून पेमेंट करता येतं. या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यातून पैसे डेबिट होतात आणि व्यापाऱ्याच्या खात्यात जमा होतात. पेमेंट्सचा हा पहिला पर्याय आहे. तर अॅपच्या खासगी वॉलेटमध्ये तुम्ही तुमच्या खात्यातून किंवा क्रेडिट कार्डवरून पैसे जोडू शकता आणि पेमेंट करू शकता. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (National Payments Corporation of India) आता यूपीआयवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPIs) किंवा प्रीपेड वॉलेटच्या इंटरऑपरेबिलिटीला परवानगी दिलीय. त्यामुळे यूझर्स यूपीआय कोड स्कॅन करून आपल्या वॉलेटमधून व्यापाऱ्यास थेट पेमेंट करू शकतात. मात्र यासाठी अट आहे. व्यापाऱ्यानं या सुविधेची निवड केली आहे, की नाही, हेही पाहावे लागते. कारण नवीन नियमानुसार 2000पेक्षा अधिकच्या व्यवहारांवर 1.1 टक्के इंटरचेंज अधिभार व्यापाऱ्याला भरावा लागतो. हे शुल्क ग्राहकांनी भरायचे नसते. दरम्यान, यूपीआय पेमेंट्सवर शुल्क आकारण्याचं वृत्त आल्यानंतर एनपीसीआयनं स्पष्टीकरण दिलंय. यूपीआय पेमेंट्स विनामूल्य असल्याचं सांगण्यात आलंय. 

इंटर ऑपरेबल यूपीआय इकोसिस्टमचा भाग बनण्याची परवानगी

एनपीसीआयनं आता पीपीआय वॉलेट्सना इंटर ऑपरेबल यूपीआय इकोसिस्टमचा भाग बनण्याची परवानगी दिलीय. एनसीपीआयनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे, की सुरू केलेले इंटरचेंज शुल्क हे केवळ पीपीआय व्यापारी व्यवहारांसाठी लागू आहे. ग्राहकांना यात कोणतेही शुल्क नाही. यूपीआय रेल्वेमध्ये पीपीआय वॉलेट्ससाठी इंटरऑपरेबिलिटी वापरून अशा प्रकारच्या व्यवहारात स्रोत आणि गंतव्यस्थान म्हणून बँक खाती बदलतील. सध्या यूपीआय हे दोन बँक खात्यांमधले व्यवहार करण्यासाठी एक माध्यम म्हणून वापरले जाते. पीपीआय इंटरऑपरेबिलिटीसह, ग्राहक आणि व्यापारी यूपीआय वापरून व्यवहार सुरू करण्यासाठी किंवा सेटल करण्यासाठी त्यांच्या पीपीआय वॉलेटचा वापर करू शकतात, असं सांगण्यात आलंय.

प्रीपेड वॉलेट कसं काम करतं? 

प्रीपेड वॉलेटच्या निमित्तानं ग्राहकांना पेमेंटचा एक पर्याय उपलब्ध झालाय. तुम्ही आता कोणत्याही यूपीआय अॅपवर बँक खाती, रुपे (RuPay) क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड वॉलेट वापरू शकता. डिजिटल वॉलेट आणि यूपीआयची इंटरऑपरेबिलिटी ही ग्राहकांना व्यापार्‍यांशी व्यवहार करताना अधिक फ्लेक्सिबिलिटी देईल. यामुळे फक्त ऑफर केल्या जाणार्‍या सेवांची गुणवत्ता सुधारत नाही तर डिजिटल पेमेंट क्षेत्रात अधिक नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देईल, असं  इन सोल्यूशन ग्लोबल लिमिटेडचे मुख्य रणनीती आणि परिवर्तन अधिकारी सचिन कॅस्टेलिनो यांनी सांगितलं आहे.

काय करावं?

यूपीआयच्या माध्यमातून प्रीपेड वॉलेटसह पेमेंट करायचे असल्यास, पहिल्यांदा तुमच्या बँक खात्यातून किंवा क्रेडिट कार्डमधून वॉलेटमध्ये पैसे लोड करावे लागतील. वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरले तर अतिरिक्त शुल्क आकारण्यात येतं. एकदा तुम्ही वॉलेटमध्ये पैसे जोडले, की तुम्ही कोणत्याही व्यापाऱ्याकडे पेमेंटसाठी यूपीआय क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तो पेमेंटचा स्रोत म्हणून निवडू शकता.

असा निवडा वॉलेटचा पर्याय

  • तुमच्या बँक खात्यातून किंवा क्रेडिट कार्डमधून तुमच्या वॉलेटमध्ये पैसे लोड करा
  • कोणताही यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करा
  • अॅप तुम्हाला डेबिट पर्याय दर्शवेल - बँक खाते किंवा वॉलेट. वॉलेट निवडा आणि पेमेंट करा.

लोकांचा कल काय?

ऑनलाइन किंवा विशेषत: आपल्या मोबाइलमधून यूपीआय अॅपद्वारे पेमेंट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र हे पेमेंट करताना क्यूआर कोड स्कॅन करून बँक खात्यामधून पेमेंट करण्याचाच प्रघात आहे. पेमेंट करण्यासाठी प्रीपेड वॉलेट ग्राहकांमध्ये फारसं काही पसंतीला उतरलेलं नाही. एनपीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार व्यवहारांची सर्वात पसंतीची पद्धत म्हणजे पेमेंट करण्यासाठी कोणत्याही यूपीआय अॅपमध्ये बँक खातं लिंक करून पेमेंट करणं होय. एकूण यूपीआय व्यवहारांपैकी 99.9 टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार याच पद्धतीनं होतात. या बँक खाते ते खाते व्यवहारांवर ग्राहक आणि व्यापाऱ्यांना कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. इंटरचेंज शुल्क मात्र फक्त पीपीआय व्यापारी व्यवहारांसाठी लागू आहे, ग्राहकांना यात शुल्क आकारलं जात नाही.