पैशांची बचत करायची असा आपण अनेकवेळा विचार करतो. पण काही केल्या आपले पैसे शिल्लकच राहात नाही. गृहिणी सगळ्यात चांगली बचत करू शकतात असे म्हटले जाते. "नोटबंदीच्यावेळी अनेक घरात पुरुषांपेक्षा महिलांकडे अधिक रक्कम असल्याचे पाहायला मिळाले. अनेक महिला बचत करताना त्याची कल्पना आपल्या पतीला देखील येऊ देत नाही. पण गरज लागल्यास ते पैसे घरातच खर्च होतात. त्यामुळे अशाप्रकारे बचत करण्यात काहीच गैर नाही'' अशा मुंबईत राहाणाऱ्या स्वप्ना मोरे सांगतात. 
"पैसे बाजूला ठेवल्यानंतर त्याविषयी विसरून जायचं, केवळ दर महिन्याला त्यात पैसे टाकत जायचे. अनेक वर्षांनंतर तुमच्याकडे खूपच चांगली रक्कम जमा होते'' असे शारदा कर्णिक सांगतात. गृहिणी कशाप्रकारे पैसे वाचवतात हे प्रत्येकाने शिकणे गरजेचे आहे. दैनंदिन आयुष्यात आपल्या मिळकतीतील शंभर-दोनशे रुपये तरी बाजूला ठेवले तरी आपल्याकडे चांगलाच पैसा शिल्लक राहू शकतो. गृहिणी अनेकवेळा तर बँकेत पैसे टाकण्याऐवजी घरातच पैसे ठेवणे पसंत करतात. 
जाणून घ्या गृहिणी कशाप्रकारे करतात बचत...
पैसे ठेवण्याच्या विविध जागा प्रत्येक गृहिणीची पैसे जमा करून ठेवण्याची जागा ही वेगवेगळी असते. एखादी स्त्री एका विशिष्ट ठिकाणी पैसे ठेवते. म्हणजे दुसरी पण स्त्री तिथेच पैसे ठेवेल असे होत नाही. काही महिलांना घरातील पैसे गादीखाली किंवा किचनमध्ये ठेवण्याची सवय असते. अनेक घरामध्ये गृहिणीला घर चालवण्यासाठी ठरावीक रक्कम दिली जाते. पण त्या रक्कमेतून देखील थोडे तरी पैसे वाचवण्याचा ते प्रयत्न करतात. .
काही कुटुंबात घर चालवण्यासाठी महिन्याभराचे पैसे गृहिणीला दिले जातात तर काहींना दिवसाला ठरावीक पैसे दिले जातात. पण गृहिणी त्या पैशातून देखील काही टक्के पैसे वाचवतात आणि ते किचनमधील एखाद्या कडधान्याच्या डब्ब्यात, कपड्याखाली, गादीखाली ठेवतात आणि घरात काही संकट आल्यावर ते पैसे लगेचच देतात. संकटकाळी घरातील कोणत्याही व्यक्तीपेक्षा गृहिणीकडून अधिक पैसे निघतात असे म्हटले जाते.
पिग्गी बँक
आपल्याला असलेली बचतीची सवय ही घरातील सगळ्यांनाच असली पाहिजे असे काही गृहिणींचे म्हणणे असते. त्यामुळे काही गृहिणी घरात एक पिग्गी बँंक ठेवतात आणि त्या पिग्गी बँकेत स्वतः दररोज पैसे टाकतात. पण त्याचसोबत घरातील सगळ्या मंडळींना देखील थोडे तरी पैसे टाकायला सांगतात. यातून वर्षाकाठी ठरावीक रक्कम तरी जमा होते. ही रक्कम तुम्ही घरातील कोणत्याही गोष्टीसाठी वापरू शकता.
बँक अकाऊंट अनेक महिला घरात पैसे ठेवण्यासोबतच बँकेत देखील अकाऊंट काढतात. घरात जमा केलेल्या पैशांवर कोणतेही व्याज मिळत नाही. पण बँकेतील पैशांद्वारे तुम्हाला चांगले व्याज मिळते याची त्यांना चांगली कल्पना असते. त्यामुळे काही महिला दरमहिन्याला ठरावीक रक्कम तरी बचत खात्यात टाकण्याचा प्रयत्न करतात. तसेच रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) अकाऊंट काढतात. या अकाऊंटमध्ये ते ठरावीक रक्कम दर महिन्याला भरतात. बचत खात्याच्या तुलनेत रिकरिंग डिपॉझिट अकाऊंटमध्ये व्याज चांगले मिळते.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            