मागील सुमारे दोन दशकांपासून बिसलरी म्हणजेच 'मिनरल वॉटर' असे समीकरण तयार झाले आहे. मग ती कोणत्याही कंपनीने तयार केलेली पाण्याची बाटली असो, तिला बिसलेरीच म्हटले जाते. ही या ब्रँडची ताकद आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला बिसलेरी मिनरल वॉटर मिळेल. मात्र, हा ब्रँड असा अचानक मोठा झाला नाही. अनेक वर्ष मेहनत करत भारतीय बाजारात बिसलेरीने अढळ स्थान निर्माण केले. पाहूया या लेखात बिसलरी ब्रँडच्या यशाची कहाणी.
Table of contents [Show]
इटालियन ब्रँड बिसलेरी
इटालियन उद्योजक सिग्नोर फेलीस या पेशाने केमिस्ट असलेल्या व्यक्तीने 20 नोव्हेंबर 1851 साली वेरोलानुवोवा शहरात बिसलेरी कंपनी सुरू केली. सुरुवातीला ही बाटलीबंद पाणी तयार करणारी कंपनी नव्हती. कंपनी सुरुवातीच्या काळात सोडा आणि अल्कोहलची निर्मिती करायची. तिच्या उत्पादनांची विक्री फक्त इटलीमध्येच व्हायची. 1921 साली फेलीस यांच्या मृत्यूनंतर त्यांचे निकटवर्तीय डॉक्टर रोसी यांच्याकडे कंपनीचा ताबा आला.
भारतीय बाजारामध्ये प्रवेश
डॉ. रोसी आणि त्यांचे भारतीय मित्र खुस्रो सुंतोक यांनी 1965 मध्ये बिसलेरी भारतामध्ये नेण्याचा विचार केला. मात्र, यावेळी सोडा किंवा अल्कहोल नाही तर स्वच्छ पाणी बाटलीबंद करुन विकण्याची कल्पना त्यांना सुचली. मुंबईजवळील ठाणे येथे त्यांनी पहिला निर्मिती प्रकल्प सुरू केला. त्या काळात भारतामध्ये पाणी सगळीकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. मात्र, असं असलं तरीही स्वच्छ पाणी मिळण दुरापास्त होते. तसेच पाणी विकत घेऊन पिण्याची मानसिकता भारतीयांमध्ये अजिबात नव्हती. त्यामुळे बिसलरी पाणी फक्त आलिशान हॉटेलमध्ये मिळायचे. उच्चभ्रू नागरिक वगळता सर्वसामान्य भारतीयांपर्यंत बिसलेरी पोहचलीच नव्हती. कंपनी तोट्यात सुरू होती. त्यामुळे रोसी यांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला.
भारतीय उद्योजकाने विकत घेतली
पारले उद्योग समूहाचे मालक जयंतीलाल चौहान यांनी 1969 साली 4 लाख रुपये किंमतीला बिसलेरी कंपनी विकत घेतली. पारले उद्योग समूहाला या व्यवसायात संधी दिसली. त्यांनी बिसलेरी सोबतच इतरही शितपेये बनवण्यास सुरुवात केली. सर्वसामान्य नागरिकांना आकर्षीत करण्यासाठी बिसलेरीने जाहिरातीवर भर दिला. तसेच भारतीय मानसिकता ओळखून किंमतही कमी ठेवली. नंतर काही वर्षांतच बिसलेरी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचली. 1991 साली झालेल्या भारतात झालेल्या आर्थिक सुधारणानंतर देशात नवनवे उद्योग येऊ लागले. भारतीयांचे उत्पन्न वाढू लागले. याचा फायदा बिसलेरीलाही झाला.
2006 साली बिसलेरीचं नवं रुप
जुन्या पद्धतीचे पॅकेजिंग, कलर आणि उत्पादनाची ओळख एका नव्या रुपात आणण्यासाठी कंपनीने हिरवा रंग निवडला. बिसलेरीच्या बाटल्या हिरव्या रंगाच्या पॅकेजिंगमध्ये येवू लागल्या. स्पर्धकांपेक्षा वेगळे उठून दिसण्यासाठी त्यांना याची मदत झाली. बिसलेरीने भारताची विविधता ओळखून विविध भाषांमध्येही अनेक जाहिरातींचे कँपेन चालवले आहे. त्याचा फायदा कंपनीला मोठ्या प्रमाणात झाला.
60 % बाजारपेठ ताब्यात
पाणी विक्रीच्या या व्यापारात बिसलरीचा वाटा ६० टक्के आहे. लहान दुकाने, टपरी, छोटी मोठी हॉटेल्स, विमानतळ, सार्वजनिक ठिकाणी आपली उत्पादने उपलब्ध राहतील यासाठी कंपनीने मार्किटिंगचा प्रभावी वापर केला. सध्या बिसलेरीचे भारतात 122 प्रकल्प असून देशभर 5 हजारांपेक्षा जास्त डिस्ट्रिब्यूटर आहेत. 2022 या चालू वर्षात कंपनीची उलाढाल सुमारे अडीच हजार कोटींच्या घरात आहे. तर दोनशे कोटींपेक्षा जास्त नफा मिळवला आहे.