भारतात विवाहाला पवित्र बंधन मानले जाते. त्यामुळे घटस्फोटाची प्रकरणं खूपच कमी पाहायला मिळतात. याशिवाय, कमी घटस्फोटाचे आणखी एक कारण म्हणजे सामाजिक दृष्टीकोन. भारतात दर एक हजार लग्नांमागे फक्त 13 घटस्फोट होतात.
घटस्फोटाची कारणे वेगवेगळी असली तरीही प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा पोटगी (alimony) असतो. पोटगीच्या रक्कमेवरून अनेकदा वाद झाल्याचे देखील पाहायला मिळते. पोटगीची रक्कम ठरविण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. पोटगीची रक्कम नक्की कशी ठरते व या रक्कमेवर कर भरावा लागतो का? याबाबत जाणून घेऊया.
पोटगीची रक्कम कशी ठरते?
पती-पत्नी विभक्त होताना दिली जाणारी रक्कम ही पोटगी असते. घटस्फोटात प्रामुख्याने महिलेला आर्थिक मदत म्हणून पोटगी दिली जाते. मात्र, पती दिव्यांग असल्यास अथवा कमविण्यास सक्षम नसल्यास तो देखील पोटगीसाठी पात्र असतो.
हिंदू विवाह कायदा 1955 च्या तरतूदीनुसार पोटगी दिली जाते. प्रामुख्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार अथवा दोन्ही पक्षकारांच्या संमतीने पोटगीची रक्कम ठरते.
याशिवाय, लग्नाचा कालावधी, पती-पत्नीच्या नावावरील संपत्ती, दोघांचे उत्पन्न, वय-राहणीमान, त्यांच्या अवलंबुन असलेली मुलं व इतरांची संख्या, मुलांचे वय व त्यांचे शिक्षण अशा सर्व गोष्टींचा विचार करून पोटगीचा प्रकार व रक्कम निश्चित केली जाते.
पोटगीच्या रक्कमेवर कर भरावा लागतो का?
सर्वसाधारणपणे पोटगीची रक्कम ही दोन पद्धतीने दिली जाते. एक म्हणजे एकरकमी पद्धतीने व दुसरी पद्धत म्हणजे एक/ तीन महिन्याच्या टप्याटप्प्याने दिलेली पोटगी. पोटगी देण्याच्या पद्धतीवरूनच कर भरावा लागतो की नाही हे ठरत असते. महत्त्वाचे म्हणजे पोटगी देणाऱ्याला कोणतीही सवलत मिळत नसते.
एकरकमी पोटगी – आयकर कायदा 1961 मध्ये पोटगीवरील कराविषयी कोणतीही तरतूद नाही. एकरकमी पोटगीला कॅपिटल रिसिप्ट म्हणून ग्राह्य धरले जाते. त्यामुळे ही रक्कम उत्पन्न मानली जात नाही व यावर करही भरावा लागत नाही.
परंतु, पोटगी म्हणून मिळालेली रक्कम एखाद्या ठिकाणी गुंतवल्यास त्यातून मिळणाऱ्या परताव्यावर कर भरावा लागतो. याशिवाय, संपत्ती खरेदी करून भाड्याने दिल्यास त्या कमाईवर देखील कर भरावा लागेल.
टप्याटप्याने दिलेली पोटगी - पोटगीची रक्कम टप्याटप्याने दिल्यास रेवेन्यू रिसिप्ट समजली जाते. ही रक्कम उत्पन्न म्हणून ग्राह्य धरली जाते व यावर कर आकारला जातो.
पोटगी म्हणून पैशांव्यतिरिक्त दिलेली संपत्ती
पोटगीमध्ये केवळ पैशांचाच उल्लेख नसतो, तर संपत्तीच्या मालकीबाबत देखील न्यायालय निर्णय देऊ शकते. पती-पत्नी असताना एकमेकांच्या नावावर केलेली मालमत्ता ही ‘भेट’ समजली जाते. आयकर कायदा 1961 च्या कलम 56 (ii) नुसार नातेवाईकाने भेट दिलेल्या संपत्ती करपात्र नसते. मात्र, घटस्फोटानंतर जर संपत्ती पत्नीच्या नावावर केल्यास अशा प्रकरणात संपत्ती मिळालेल्या व्यक्तीला कर भरावा लागतो.
याशिवाय, पती-पत्नी असताना अशा संपत्तीतून झालेली कमाई दोघांच्या उत्पन्नात जोडली जाते. मात्र, घटस्फोटानंतर संपत्तीतून झालेली कमाई ही संपत्ती ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्याच्या उत्पन्नाशी जोडली जाते.