भारताकडे जी-20 परिषदेचे अध्यक्षपद 1 डिसेंबर 2022 पासून पुढील एक वर्षासाठी आले आहे. त्यामुळे 2023 वर्षातील सर्व परिषदांची जबाबदारी भारताकडे आली आहे. या परिषदेच्या उद्घाटनाची बैठक राजस्थानमधील उदयपूरमध्ये सुरू आहे. 20 देशांचे प्रमुख या बैठकीला आले आहेत. तसेच संपूर्ण देशभरात जी-20 परिषदेच्या 200 बैठका होणार आहेत. त्यामुळे हॉलेट व्यवसायाला खऱ्या अर्थाने 'अच्छे दिन' आले आहेत. उदयपूरमध्ये जी-20 समुहाची बैठक टाटा ग्रुपच्या ताज हॉटेलमध्ये होत आहे. मात्र, शहरातील इतर सर्वच हॉटेलमधील बुकिंग फुल्ल झाली आहे.
एरवी पर्यटकांनी हॉटेल्स बुक असतात. मात्र, G-20 बैठकीच्या निमित्ताने शहरातील सर्व हॉटेल्स विविध देशांचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसाठी बुक आहेत. जी-20 समूह देशातील प्रमुख, अधिकारी, माध्यम प्रतिनिधी, उद्योग व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधी यांच्या सुमारे 200 बैठका पुढील वर्षी देशभरात होणार आहेत. त्यासाठी अनेक हॉटेल्समध्ये आधीच बुकींग सुरू झाले आहे.
Table of contents [Show]
भारतातील प्रमुख हॉटेल ब्रँड्स
टाटा ग्रुपकडे मालकी असलेला ताज ग्रुप हा भारतातील आघाडीचा हॉटेल व्यवसायातील कंपनी आहे. ओबेरॉय ग्रुप, ला मॅरेडियन, आयटीसी हॉटेल्स, लिला हॉटेल्स, जेडब्ल्यू मॅरियट, हयात, लेमन ट्री हॉटेल्स या काही आघाडीच्या हॉटेल कंपनी भारतात कार्यरत आहेत. यांच्यासह इतर अनेक स्पर्धकही आहेत. टायर-1 आणि टायर-2 शहरांमध्ये या कंपन्यांची विविध पंचतारांकित हॉटेल्स आहेत.
प्रमुख शहरातील हॉटेल्सची मागणी वाढणार
पुढील वर्षभर देशातील दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता, बंगळुरु यासह अनेक शहरांमध्ये बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. यातील अनेक बैठका ह्या पंचतारांकित हॉटेल्समध्येच आयोजित केल्या जातील. त्यामुळे या शहरांतील हॉटेल्सला चांगली मागणी असेल. या बैठकीला 20 देशांच्या प्रमुख, अधिकारी यांच्यासह जागतिक स्तरावरील अनेक संस्थांचे प्रतनिधीही उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्र, आंतराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना, जागतिक आरोग्य संघटनेचेही प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भारतामध्ये पुढील वर्षी सेवा क्षेत्रासोबतच हॉटेल व्यवसाय तेजीत राहणार आहे. परिषदेच्या निमित्ताने भारतात येणाऱ्यांचे आदरातिथ्य भारताला करावे लागणार आहे.
महाराष्ट्रात कुठे होणार जी-20 च्या बैठका
जी -२० च्या एकूण बैठकांपैकी 14 बैठका महाराष्ट्रात होतील. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या महानगरांमध्ये या बैठका होणार आहेत. 13 ते 16 डिसेंबर या कालावधीत मुंबईमध्ये परिषदेच्या विकास कार्य गटाची बैठक होणार आहे. त्यानंतर पुणे येथे 16 आणि 17 जानेवारीला पायाभूत सुविधा कार्यगटाची तर औरंगाबाद येथे 13 व 14 फेब्रुवारीला बैठक होणार आहे. 21 आणि 22 मार्चला नागपूर येथे रिग साईड इव्हेंट होणार आहे. त्यानंतर मुंबईत 28 आणि 30 मार्च 15 ते 23 मे आणि 5 आणि 6 जुलै, 15 व 16 सप्टेंबर 2023 या कालावधीत विविध बैठका होतील. पुणे येथे 12 ते 14 जून, 26 ते 28 जून या कालावधीत बैठका होणार आहेत. या परिषदेच्या आखणी व नियोजनाकरिता चार अधिकाऱ्यांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.
कोणत्या विषयांवर होतील बैठका
थिंक टँक, महिला परिषद, युथ परिषद यांसारख्या अनेक परिषदा आणि आरोग्य, कामगार, अर्थ, पर्यावरण, शिक्षण, ऊर्जा, वातावरण बदल, साथीचे आजार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विविध बैठका होणार आहेत. 'वसुवैध कुटुंम्बकम' ही पुढील वर्षाचे जी-20 परिषदेचे ब्रीदवाक्य असणार आहे. युक्रने युद्ध, मंदी या विषयांवरही बैठका होतील.