घरांच्या वाढत्या किंमतीमुळे मालमत्ता खरेदी करणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. देशातील प्रमुख शहरांमधील घरांच्या किंमतीत गेल्या वर्षभरात प्रचंड वाढ झाली आहे. या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य नोकरदारवर्गाला घर खरेदी परवडत नाहीये. दिल्ली, अहमदाबाद, पुण्यासह देशातील प्रमुख शहरांमधील मालमत्तेच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बांधकाम व्यवसायिकांची प्रमुख संस्था असलेल्या क्रेडाईच्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आले आहे.
घरांच्या वाढत्या किंमतीचा गृहकर्ज व मालमत्ता खरेदीवर देखील मोठा परिणाम होणार आहे. तुम्ही देखील घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी या वाढत्या किंमतीचा नक्की काय परिणाम होऊ शकतो, त्याबाबत जाणून घ्यायला हवे.
घराच्या किंमतीत 10 टक्क्यांनी वाढ
देशातील प्रमुख 8 शहरांमधील घराच्या किंमतीत 2024 च्या पहिल्या तिमाहीत जवळपास 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या शहरांमध्ये बंगळुरू, पुणे, अहमदाबाद, दिल्ली-एनसीआरचा समावेश आहे. क्रेडाई, कॉलिअर्स इंडिया व लायसेस फोराजच्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.
घराच्या सर्वाधिक वाढत्या किंमतीमध्ये बंगळुरू शहर टॉपवर आहे. रिपोर्टनुसार, बंगळुरूमधील घराच्या किंमतीत मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी प्रती चौरस फूट जागेसाठी 8,748 रुपये मोजावे लागत होते. आता याचसाठी 10,377 रुपये मोजावे लागत आहेत.
पुण्यातील घरांच्या किंमतीतही प्रचंड वाढ
रिपोर्टनुसार, देशातील प्रमुख शहरांमधील घरांच्या किंमतीत जानेवारी ते मार्च या तिमाहीत 2 ते 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या शहरांमध्ये पुण्याचा देखील समावेश आहे. मागील वर्षभरात पुण्यातील घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
पायाभूत सुविधा, आलिशान घरे यामुळे घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच, चलनवाढ व गृहकर्जाच्या दर यामुळे भविष्यातही मालमत्तेच्या किंमतीत वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
गृहकर्ज-मालमत्ता खरेदीवर काय परिणाम होणार?
घराच्या वाढत्या किंमतीचा मालमत्ता खरेदी व गृहकर्जावर देखील याचा परिणाम पाहायला मिळातो. वाढलेल्या किंमतीमुळे घर खरेदी करताना जास्त डाउन पेमेंट भरावे लागू शकते. हा घर खरेदी करताना सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो.
याशिवाय, वाढलेल्या किंमतीमुळे गृहकर्जही जास्त काढावे लागते. जास्त कर्जाचा थेट परिणाम तुमच्या जमाखर्चावर होतो. यामुळे पगारातील जास्तीत जास्त रक्कम ही गृहकर्जाचे हफ्ते फेडण्यास खर्च होऊ शकते व यामुळे बचत कमी होईल. वाढलेल्या किंमतीमुळे कमी उत्पन्न असणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वतःचे पहिले घर खरेदी करतानाही अनेक आर्थिक अडचणी येऊ शकतात.